Thursday, February 14, 2013

बेबीज डे आऊट

“श्वेता ,हे घे तुझं प्रोग्रेस कार्ड ..उद्या मम्मीला घेऊन ये .तू फक्त ड्राइंगमधे आणि वर्क एक्सपिरियन्स मधे पास  झालीयस ...बाकी फेल आहेस ...आय मस्ट टाक टू युअर ममा ...!”डिसोझा टिचर श्वेता बेबीवर जोरात खेकसली ...तशी ती एकदम दचकली ... टिचरच्या ओरडण्या पेक्षा मम्मी कशी भडकेल हे आठवून ती जास्त भेदरली ..

“मिस, मम्मी नको ..बाबाला घेऊन येऊ ..?ती बिचकत म्हणाली  .

“ नो श्वेता, मम्माशीच बोलावं लागेल मला !” डिसोझा टिचरने बेबीचं प्रपोजल  झटकून टाकलं  ....
सिनियर केजी संपवून बेबी जशी पूर्णवेळ पहिलीच्या वर्गात आली तशी ही शाळा म्हणजे बाबाने सांगितलेल्या गोष्टीतील बंद किल्ला आणि डिसोझा टिचर म्हणजे मुलाना मटामटा खाऊन टाकणारी  दुष्ट चेटकीण वाटायला लागली . तिला लिहायला आवडत नव्हतं गणितं नकोसं वाटत असे ...फक्त ड्राइंग आणि वर्क एक्सपिरियंसच्या टिचर आवडायच्या... पण त्या थोडावेळच येत .

सकाळीच मम्मा ओरडली होती“...बेबी ,आज प्रोग्रेस कार्ड मिळेल ..बघू काय दिवे लावलेत ते ....!जर फेल झालीस तर टीवी एकदम बंद ... तुला हास्टेलमधेच टाकते की नाही बघ ...!उठ सूठ कार्टून बघत असते कार्टी ....आमच्या बँकेतल्या शिपायाच्या मुलाला  दहावीला  90 टक्के मार्क मिळाले ...ज्याच्याकडे नसतं ना त्यालाच कळतं .... !”

बेबी मात्र शाळेत येईपर्यंत टक्के ...टक्के बडबडत येत होती ...तिला हा शब्द खूप आवडला होता ..ती मामाकडे गुहागरला सुटीला गेली तेव्हा तिथल्या वाडीतल्या रेशमाबरोबर ती खेळायची तेव्हा “ का ग रेश्मा टक्का दिला ...?कोण म्हणतो टक्का दिला..?.बेबी म्हणते टक्का दिला ...?का ग बेबी टक्का दिला ?कोण म्हणतो टक्का दिला..?हा मस्त खेळ आठवला ..

पण आता हातातलं रिपोर्ट कार्ड तिला गोष्टीतल्या राक्षसा वाटायला लागलं ...तिला शाळा सुटुच नये वाटायला लागलं ...ड्राइंगची सोनम टीचर वर्गात आली तिनं बेबीचें ड्राइंग सर्वाना दाखवलं खूप कौतुक केलं तेव्हा बेबीला वाटलं सोनम टीचरला घरी घेऊन जावं आणि सांगावं “आमच्या  मम्मीला हे सगळं सांगा ना मिस..!”

पण तिला माहित होतं मम्मी फक्त रेड लाईनच बघणार ...बाबाचं तिच्यापुढं काही चालणार नाही ...त्या पेक्षा शाळेतच लपून बसुयात का ? नको रे बाबा ...दार बंद होईल ना ... !त्यापेक्षा शाळेच्या मागच्या बागेत बसू ...?पण रिक्षावाले काका शोधत राहतील ना ...!लपून बसु या ..पण आज शाळा हाफ डे आहे आणि बँकही अर्धीच ..म्हणजे आणायला मम्मीच येणार ...बापरे ...!”आता तिला जास्तच भीती वाटू  लागली ..चेटकिणीच्या जागची डिसोझा जाऊन तिथं  मम्मी आली ..तिला अजून धडधडायला व्हायला लागलं..

शाळा सुटताच...ती मागच्या गेटने लोंढ्यातून बाहेर पडली कडेकडेने घराच्या विरुद्ध दिशेने चालायला लागली ..घराकडे निघाली असती तर मम्मीनं  तिला शोधून काढलंच असतं ..आणि प्रोग्रेस कार्ड एका झटक्यात काढून  घेतलं असतं ...बापरे ....बेबी आठवून एकदम दचकली..तिच्या बाजूने एक काका जात होते ...ते एकदम  थांबले..

“काय झालं बाळा ! काय नाव तुझं... रस्ता चुकलीस का ?”श्वेता देशमुख तुझं नाव ना ...ते युनिफार्मवर चिकटवलेला बॅज वाचू लागले . ”बेबी, माहित नसलेल्या कुणालाही आपलं नाव नाही सांगायचं...!कुणाशीही बोलायचं  नाही  .लोक पळवून नेतात !आणि डोळे ,हात कापून भीक मागायला बसवतात ..!”तिला  कामवाल्या मीनाताईंनी सांगितलेलं आठवलं  ,,तशी ती पुढे जोरात पळाली आणि बाजुच्या कार्पोरेशनच्या बागेत शिरली ..एका झाडाजवळ जाऊन बसली..
....

 एवढ्यात तिथे एक पेरूवाला आला..मस्त पेरू होते ...पण तिच्याजवळ पैसेच नव्हते ना .....कशाला रस्त्यावरचे पेरू खायचे ...?पोटात दुखायला लागलं म्हणजे ? ...तिनं स्वतःला समजावलं...

एवढ्यात तिथं दोनतीन टारगट पोरं आली आणि पत्त्यांचा डाव मांडून बसली ..हरणारा पैसे देत होता ....’किती मस्त आहे हा खेळ ...पैसेच पैसे ...कितीही पेरू खा !’बेबी मनात म्हणते ....तेवढ्यात त्यांचे जोरजोरात भांडण मारामारी सुरु झाली ...बेबी तिथून पळाली आणि घसरगुंडीजवळ येऊन बसली ..पाठीला दप्तर लावूनच तीन चार वेळा वर खाली गेली ...दप्तर   कुणी नेले असते म्हणजे ! बरं होईल .....रिपोर्ट कार्डची पीडा तरी जाईल असे तिला क्षणभर वाटले पण मम्मी दूसरे नक्की मिळवेल आणि मग अजून भरपूर ओरडेल याचीही तिला खात्री होती ..

आईच्या ओरडण्या पेक्षा बाबा कट्टी घेईल याचे तिला जास्त वाईट वाटत होते ...आता संध्याकाळ व्हायला आली होती बेबी फिरून आणि खेळून कंटाळली...तिथल्याच एका गच्च झुडुपाजवळच्या बाकड्यावर दप्तर पोटाजवळ घट्ट  पकडून बसली ...हळूहळू पेंगू लागली ...तिथेच मुटकुळं करून झोपली ..

कुणाच्या तरी ओरडण्यानं तिला जाग आली .तिला कुणीतरी पटकन कुशीत घेतलं होतं ..तिनं डोळे किलकिले केले...आणि दचकली ... चेटकीणच होती ...“अग शोनू कुठंकुठं शोधायचं रे बबडू तुला ?....टिचर ओरडली माझ्या पिल्लाला ?आपण टीचरला सांगू पुढच्या परीक्षेत खूप अभ्यास करून छान मार्क आणू म्हणून !”
बेबीला कळेना... चेटकिणी रडतात म्हणून बाबानी ,सांगितलं नव्हतं .तिनं लख्ख डोळे उघडले ..टार्चच्या प्रकाशात बघते तर काय चेटकीण नव्हतीच ती तर तिची लाडकी मम्मा होती ....!आणि ती अजूनच तिच्या कुशीत शिरली ... 



स्वाती ठकार
(08-07-2011..14.20)










Saturday, January 19, 2013

जाड रवी

"स्वाती ,तुझ्याकडं ती जाड रवी आहे ती कुठून आणलीस ग?मलाही तशी हवीय  !खूप शोधली पण अशी मिळतच नाही ..डाळ मस्त  घोटली जाते तिनं " असे म्हणत डाळ घोटायला शेजारीण माझी जाड रवी घेऊन गेली .खरंच होतं ...त्या  रवीचा दांडा  जाडजूड असला तरी  ती अखंड होती आणि खालची घुसळण धारदार होती ..लोणी ही मस्त निघत असे .डाळ एकदम एकजीव घोटली जायची . शेजारीण निघून गेली ...मी मात्र रवीच्याच विचारात रमले .

अशीच एक रवी आईकडं होती ..माझ्या बाबानं (तुकाराम सुतारनं ) तिला जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी बनवून दिली होती...दरवेळी माहेरी जायची तेव्हा माझा डोळा त्या रवीवर असायचा ..आई काही दाद देत नसे वर जखमेवर मीठ चोळत म्हणायची ," तुकारामनंच करावी अशी रवी !तो होता तेव्हाच चार-पाच बनवून घ्यायला पाहिजे होत्या .."आईच्या माघारी भावजयीकडून ती रवी मागून आणणं प्रशस्त वाटत नव्हतं .


आई गेल्यावर वडिलांसोबत माहेरी गेले होते .तेव्हा त्याना मी म्हटलं ,"काका, मला अशीच रवी बनवून हवीय .आता बाबाच्यात कोण सुतारकाम करतय ?त्यानी घरी निरोप धाडला .त्याचा धाकटा मुलगा अण्ण्या (नाव अर्जून...माझ्याहून आठेक वर्षानं लहान ) आला ...डोळे दारू पिऊन तारवटलेले. याच अण्ण्याला मी लहानपणी कडेवर घेऊन फिरत असे ..मधे बराच काळ तो दिसला नव्हता ..मला बघितल्यावर  मला' नमस्कार अक्का!' म्हणत हात जोडले.


तेवढ्यात आमचा वाटेकरी(शेतातला शेतकरी ) ,भाऊ ,आणि अण्ण्याचं चांगलंच जुंपलं ...एकंदर  मतितार्थ हा कि हे सुतार माजलेत .धान्य न्यायला वेळेवर येतात .काही काम सांगितलं तर मात्र टाळमटाळ ...अण्ण्याचं म्हणणं असं कि सुतारकाम करणं फार अवघड झालंय ...परवडत नाही ...एवढं ऐकल्यावर मी रवीचा नादच सोडला ...

जाता जाता त्यानं काकाना त्याला बोलावण्याचं  कारण विचारलं ..
घरातली रवी त्याच्या हातात देत मीच उत्तर दिलं " बाबारे ,ताईला ही  रवी जशी बाबानं बनवून दिली होती ..अगदी तश्शीच मला हवी होती...राहू दे घे ...सुतारकाम महाग झालंय... तुला तुझ्या कामात कुठं वेळ असतो .....? "कसला राजबिंडा पोरगा होता आणि काय अवतार झाला होता ...मलाच गलबललं." काय अवतार करून घेतलायस रे अण्ण्या ?कसला साजरा होतास ...आणि काय ध्यान झालंय आता तुझं ! "मी किंचित त्राग्यानं म्हणाले  पण सूरात त्राग्यापेक्षा  हळवेपणा जास्त असावा ...

तो गेल्यावर वडील सांगत होते ...गावातील सुतारकाम करणारी ही मुलं ट्रॅक्टर  यंत्र शेती,मिक्सर ग्राईंडर आल्यामुळं   गावात काम कमी झाल्यानं शहरात गेली .काहीजण  कंपन्यात काम करत होती ,काही फर्निचर करणाऱ्यांकडं असिस्टंट म्हणून ...व्यसनं लागली ..गिरण्या बंद पडल्या ...लोखंडी ,पावडर कोटेड फर्निचर वाढलं ..ही पोरं परत गावी आली ....जुने कसब उरले नाही ...व्यसन सुटायचे नाही ...ना घर के ना घाटके अशी स्थिती झाली .....मी विषण्णपणे हसत म्हणाले "य़ांत्रिकीकरणाचे दुष्परिणाम असा साहित्यसंमेलनातील परिसंवादाचा विषय होऊ शकेल नाही !"


मी रवीबद्दल विसरूनच गेले ..दोनेक दिवसानी मी गावाला निघाले ...सामान घेऊन बाहेर पडत होते  तेवढ्यात अण्ण्याची पिंकी धावत रवी घेऊन आली ....आणि धापा टाकतच म्हणाली " आत्या ,आमच्या  बाबानं तुला हे द्यायला सांगितलंया ...!" काका पैसे द्यायला लागले तर म्हणाली " आमच्या बाबानं ह्याचे पैशे घिऊ नको म्हून सांगितलया मला !  "म्हणून माझ्या भाच्यांसोबत खेळायला ती पळाली .
आईकडच्या  रवीपेक्षा ही खूपच सुबक देखणी तरी दणकट होती ...तिला ड्रीलने भोक पाडून अडकवायचीही त्यानं सोय केली होती ..मी काकाना म्हटलं आज ताई(आई ) असायला हवी होती ...मस्त चिडवता आलं असतं ...भाऊही आश्चर्य व्यक्त करत म्हणाला " भारी आहेस घे बाई तू ...ह्या अण्ण्यानं एवढी झकास रवी ती सुद्धा एक पैसा न घेता कशी काय बनवली कुणास ठाऊक ?" मी म्हटलं ,"जाऊ दे रे ....त्याची काय अडचण असते ते आपल्याला काय कळणार ? त्यांच्या वाटचं धान्य कोणत्याही अपेक्षे शिवाय त्याना दिलं जाऊ दे एवढं मात्र मनापासून वाटतं !"

आजही रवीच्या निमित्तानं राहून राहून  अनेक प्रश्न मनात  उठतात .. वाटतं ..का बरं त्यानं बनवली रवी माझ्यासाठी ?लहानपणीचे जुने दिवस त्यालाही आठवले असतील का ? त्याच्या बाबाचे आणि माझे भावनिक नाते त्याला आठवले कि  माझ्या त्या वेळच्या काळजीच्या शब्दानी हेलावला ? काहीही असो या निमित्ताने क्षणभर का होईना मीही हळवी होते हे मात्र खरे ...

स्वाती ठकार ...04.02.2012....1.15

महात्मा गांधी नावाचा महामिष्किल म्हातारा ☺☺☺

       मला गांधीना बघायचा योग आला नाही .पण बालपणीचा काळ गांधी द्वेष आणि ऐकीव बातमीवर गांधी विरोधात  पांडित्य पोसण्यात गेला.घरी वडील पक्के गांधीवादी आणि आई पक्की हिंदुत्ववादी (गांधी द्वेष्टी ) .मी हुबळीला शिकत असताना गांधींविरोधात  शेखी मारत होते .आमच्या शिक्षकानी मला गांधी कसे होते हे गांधी सहवासातील व्यक्तिंकडून जाणून घे असे सांगितले आणि रेड्डी म्हणून एक वयस्क गृहस्थ होते.त्यांच्याकडे शनिवारी जायची ड्युटी लागली .
       राव काका म्हणून माणसाचा बंगला होता .तिथे राव ,रेड्डी आणि भट असे तीन म्हातारे गांधीजीनी लोकाना पाठवलेली आणि लोकानी गांधीजीना पाठवलेली पत्रं होती त्यांचं संकलन करून पुस्तक काढण्याच्या कामाला सुरवात केली होती .तेच हल्लीचे 100च्या वर गांधी खंड आहेत .मी बापडी गांधी समजून घ्यायला गेले होते .त्या तीनही म्हाताऱ्यानी गांधी कसे आहेत हे न सांगता पोत्यातली पत्रं माझ्यापुढं ओतली आणि  भाषावार सॉर्टिंग करायला सांगितलं .

   पत्रं वाचताना उमजत गेलेले गांधी आणि ऐकलेले तथाकथित बुद्धीवाद्यानी व्याख्यानातून उलगडून दाखवलेले गांधी यात जमीन अस्मानांचं अंतर होतं .मनाशी नवीनच संघर्ष सुरु झाला .पत्रातून दिसणारे गांधी तसेच या माणसानी वर्णन केलेले गांधी म्हणजे एक महामिष्किल म्हातारा .ज्याची विनोदबुद्धी अफलातून आहे .लहानमुलांच्याही पत्राला त्यानी फार सुंदर उत्तर दिले होते .

   रेड्डी काकानी सांगितलेले दोन किस्से अफलातून आहेत .ते स्वतः शाळकरी वयाचे असताना आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई  किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. 

एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने  शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये.  

वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल . 

असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ  राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रातीला येण्याची धमकी देऊन जात .असे होते गांधी .मी हल्ली गांधीविरोधातील लिखाण वाचून चिडत नाही .समर्थनार्थ युक्तीवादही करत नाही .कारण स्वतः गांधीजी जरी असते तरी त्यानीही बोळक्या दातातून मिष्किलपणे हसू सांडत म्हटलं असतं ,सचमुच मैं बहुत बुरा हूँ ...कुछ करना पडेगा ।
    स्वाती ठकार

सो स्वीट ना ...


“ मेघु ,आज संध्याकाळी शाळेतून येताना काळे काकुंच्या बागेतनं सोळा सोळा पत्री ,दुर्वा ,आघाडा  घेऊन ये .. हो आणि उद्या घरी ताईची मंगळागौर आहे.तिच्या सासरची मंडळी येतील संध्याकाळपर्यंत ..उद्या शाळेला येणार नाही म्हणून सांग पाटील मॅडमना ...संध्याकाळी हळदीकुंकवाला ही यायला सांग त्याना..काळे काकूना पण सांग ग ! ” वाळलेल्या कपड्यांचा भलामोठा गठ्ठा मेघनाच्या कॉटवर  आणून टाकत आई म्हणाली .

“ ए आई , हे सगळं ताईच्या खोलीत नेऊन टाक .आणि हो ..मी उद्या दांडी आजिबात मारणार नाही .उद्या गणिताची टेस्ट घेणार आहेत सर ....नवीन सर आहेत.. व्हेरी स्ट्रिक्ट  ..तुझं काय जातंय दांडी मार म्हणायला ! ” मेघना फणफणली.

तिला आईनं सांगितलेल्या कामातलं खरंतर एकही काम करायचं नव्हतं ....सगळे नुसते ताईच्या मागं मागं !..ही ताई पण पहिल्या पासून अशीच. कायम सगळं आयतं मिळवायची ..स्वार्थी आहे अगदी .स्वतःचं काही म्हणजे काही देणार  नाही.. मेकप बॉक्सला हातही लावू देत नाही ..स्वतःला करीना कपूर समजते .. मेघना मनात फणफणत होती .तसं तिचं आणि ताईचं कधीच जमलं नाही ..मोठ्या मानसीला छोटा भाऊ हवा होता पण झाली भांडकुदळ बहीण आणि मेघनाला मोठा दादा हवा होता पण आधीच ही बया आलेली ....त्यात वयात सात आठ वर्षाचं अंतर .कायम ताई मोठी म्हणून दादागिरी ...तरी बरं बाबा मेघुचे खूप लाड करायचे .मस्ती करायचे .तिच्याशी खेळायचे ..पण त्यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्टी असायची तेव्हाच .पेपरचे गठ्ठे तपासायला आले की ती ते रुममध्ये गुडुप व्हायचे .

फक्त एवढ्याच कारणासाठी तिला ताईचा राग येत नव्हता .ताईनं तिचा सगळा प्लॅन ओम् फस केला होता . तिच्या रागाचं मुख्य कारण हे होतं की काळे काकुंच्या हँडसम  अमितवर तिचं प्रेम असताना तिनं त्याला सोडून आडदांड काळुंद्ऱ्या जिजूशी लग्न केलं . कितीतरी वेळा त्यांच्या नोटसची देवाण घेवाण तिनंच केली होती .जिजूशी लग्न का केलं? तर म्हणे अमित कंपनीत साधा इंजिनीअर आहे आणि जिजू असिस्टंट मॅनेजर! हे काय कारण झालं ..अरे ,झाला असता ना अमितपण मोठा मॅनेजर ..हिला मुळी धीरच नाही .

पूअर अमित,इतका स्वीट चॅप ,  ताईच्या लग्नानंतर  गेला अमेरिकेला .तिथेच राहणार आहे असं काळे काकू म्हणत होत्या .त्यानाही त्याची खूप आठवण येत होती ..बिचारा एकुलता एक मुलगा इतका दूर गेला .सगळं ताईमुळं झालं .प्रेमभंग फार वाईट रे बाबा !
खरंतर मेघुलाच  लग्न करायचं होतं त्याच्याशी... पण ताईचं प्रेम होतं म्हणून तिनं इतका मोठा त्याग केला होता .खरंतर आताही ती त्याला प्रपोज करू शकत होती. पण तिला सज्ञान व्हायला अजून तीन चार  वर्ष तरी लागणार होती .आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली  हल्ली तिला नवीन आलेले गणिताचे संजू सर खूप आवडायला लागले  होते . कसले  हँडसम आहेत .. पण ...सो बोरींग.... सारखं ऋचाच्या हुशारीचं कौतुक करतात .

कालच स्पोर्टस् च्या तासाला  ते मेघुला उद्देशून हेडसराना म्हणाले होते ,” सर ही मुलगी रनिंगमध्ये एकदम छान आहे ..पण गणिताकडे आजिबात लक्ष देत नाही !” तेव्हाच मेघूनं ठरवलं आपले बाबा एवढे  मॅथ्सचे प्रोफेसर आणि आपण एवढे मठ्ठ ...आजिबात नाही ...आता मॅथ्स नंबर वन करायचं ...स्पोर्टस् मधे तर आहोतच ...मग काय !ऋचा आऊट… मेघू इन! मेघू, यू आर ग्रेट ! स्वतःची पाठ थोपटत ती गाणं गुणगुणत किचनमधे आली .बाबानी भुवया उंचावत खुणेनं विचारलं ,”आज काय स्पेशल !”
पण तिनं आपलं गुपित कुण्णालाच सांगायचं नाही असं ठरवलं होतं ...तेवढ्यात टेबलावरच काडवाती करत असलेली आज्जी खुद्कन हसली .मेघुनं जरा रागानंच तिच्याकडं पाहिलं ..
“ आज ताई येणार आहे ना ...प्रयोग वहीत आकृत्या काढून द्यायला ...मग काय आमचा गृहपाठ पूर्ण झालाच म्हणून समजा ! ”  ही आज्जी पण ना ...मेघू वैतागली पण लगेच तिनं  जीभ आपल्या दाताखाली ढकलत ,गाल फुगवत ,डोळे मिचकावले .
“अरेच्चा ,हे आपल्या कसं लक्षात आलं नाही !”
“ए आई ,मी शाळेतून आल्यावर कपड्यांच्या घड्या करते ..आणि हो येताना पत्रीही आणते हं हळदीकुंकवाचं अजून कुणाला सांगायचंय का ?नंतर  त्रास द्यायचा नाही.खूप अभ्यास आहे हं मला ! ”म्हणत आईनं करून ठेवलेला पोळी भाजीचा रोल तोंडात कोंबला .
“ अग सावकाश खा !”म्हणत  मागून आलेल्या आईचं काहीच ऐकून न घेता सायकल वर टांग मारली .

“ ही पोरगी म्हणजे एक तुफान आहे रे बाबा ! मी लिहून देते तुम्हाला ही एक ही काम धड करणार नाही !”
“नक्की करेल ”....बाबा
“बघाच तुम्ही .” .....आई
“अर्धवट नक्की करेल! तीनचार प्रकारच्या पत्री आणेल आणि एखादं आमंत्रण नक्की देईल ”… आजी  पदराआड खिदळत म्हणाली ...


----------------------------------------------------------------------------------------------------

“काय ग आणली का पत्री वगैरे ! ”सायकल दाणकन आपटून घरात शिरणाऱ्या मेघुच्या मागे मागे जात आईनं विचारलं ..
“तुझं तूच आण सगळं ..मी काही काम करणार नाही  तुझं !”म्हणतं ती ताडताड खोलीत निघून गेली आणि खोलीचं दार  धाडकन लावलं ...उशीत डोकं खुपसलं आणि मुसमुसू लागली ..तसंच कारण होतं ना ! तिला वर्गात  मोनूनं सांगितलं कि संजू सर फक्त दोन महिनेच शिकवणार आहेत .ते युपीएससी परिक्षेत पास झालेत ...त्यांचा साखरपुडा झालेला आहे . ते लग्न करूनच ट्रेनिंगला जाणार आहेत “ हेच करायचं होतं तर आले कशाला शिकवायला !”
“ काय म्हणतात तुझे संजू सर !” आजीनं विचारताच ..ती एकदम भडकली ,या आजीला ना काही म्हणजे काही सागितलं नाही पाहिजे .
“माझे कुठलं ...माझे म्हणे ...आणि हे बघ सारखं चिडवायचं नाही हं मला ...काही खास नाहीत एवढे ते ... हो आणि ते आता  जाणार आहेत बरं का ! काढून टाकणारेत त्याना दोन महिन्यात ..जोग सरच छान शिकवत होते ..तेच आम्हाला गणित शिकवणार आहेत ..”
तिन्हीसांज होता होता ताईच्या सासरचे सगळे आले .जिजू रात्री येणार होते ..घरात एकदम धमाल सुरू झाली .मेघूनं शहाण्यासारखं सगळं सामान नीट लावलं ..काळे काकूनी सदुकडून दूर्वा पत्री काढून ठेवली होती . सायकलला टांग मारून तिला फक्त घेऊन यायची होती .

सगळे खूप आनंदात होते... पण ते तिच्यापासून काहीतरी लपवत होते .स्वयंपाक घरात खूसखूस सुरू होती  ..ताईचे तर केवढे लाड सुरू होते ...

मेघुच्या खोलीत ताई आली तेव्हा मेघू आईनं केलेल्या कपड्यांच्या घड्या टेबलावर नीट रचत होती .ताई मेघू जवळ आली .आपल्या पर्समधलं नवं कोरं मेकअप कीट तिला काढून दिलं आणि म्हणाली ,” हे जिजूनं खास तुझ्यासाठी आणलंय दिल्लीहून! ” तिचा गालगुच्चा घेत ताई म्हणाली.
“ आता एकदम गुड गर्ल व्हायचं बरं का !तू मावशी होणारेस ..कळलं का बाई ! ”
मेघु बघतच राहिली ..आत्ता तिला कळालं ताई का फार्मात आहे ते !. अरेच्चा म्हणजे मी मावशी होणार तर  !..तिनं ताईच्या पोटाला अलगद हात लावला आणि दोघी  खुदु खुदु हसायला लागल्या .
“ ए ताई मी पटकन माझ्या सासरी जाऊन दुर्वा पत्री घेऊन  येते ” तिच्या कानाशी कुजबुजली तसा ताईनं नाटकीपणानं कपाळाला हात लावला  आणि हसायला लागली .

काळे काकुंकडे ओल्या नारळाच्या करंज्या खाऊन,छान गप्पा मारल्या .त्याना दारात छान रांगोळी काढून दिली.भांडी सेल्फवर लावून दिली .काकूनी प्रेमानं तिच्या गालावरून आपली बोटं फिरवून कपाळावर नेऊन कडाकडा मोडली .तशीही  मेघूच  ताईपेक्षा काकूंची लाडकी होती . त्याना हळदी कुकंवाचं सांगून फुलं  पत्री वगैरे सामान घेऊन ती आनंदानं घरी आली .आज काकू किती  खुश होत्या ..!अमित दिवाळीत महिनाभर सुट्टी काढून येणार होता ना !

रात्री ताईजवळ झोपलेल्या  मेघूच्या स्वप्नात  जिजू ,थोडं काळं थोडं गोरं गुबगुबीत बाळ ,आई ,बाबा ,सगळे आलटून पालटून येत होते ...हो आणि अमेरिकेहून तिला खास मागणी घालायला अमितही आला होता जीजूपेक्षाही छान छान गिफ्टस् घेऊन   ...
स्वप्नात ....

सो स्वीट ना !
स्वाती ठकार (दि.31-12-12 ...दुपार 12.45)





Wednesday, December 15, 2010

संपली माझी गोष्ट

एकदा अशाच एका संस्कारवर्गात प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते .काय मजा आली म्हणून सांगू !सगळी बालप्रजा ही आदल्या वर्षी बाल गटात वय बसत नसल्याने शाळांनी नाकारलेली आणि संस्कार वर्गाने संस्कार करण्यासाठी आनंदाने स्वीकारलेली होती .लहानमुले मला जरा जास्तच आवडत असल्याने प्रमुख पाहुणी पेक्षा त्यांच्या हालचाली निवांत पणे न्याहाळाव्यात म्हणून जरा आधीच जाऊन बसले .वर्गाचे दार बंद होते .संचालिका यायच्या होत्या .मी तिथेच एका झाडाजवळ बसले.

मला संचालीकेशिवाय कोणीच व्यक्तीशः ओळखत नसल्याने मी निवांत पणे बालगोपाळ पाहू लागले .कुणी सॉक्सशी चाळे करत होता .कुणी खिशातून आणलेले पिक्सो ,बारक्या गाड्या मित्रांना दाखवत होता .इवल्याशा चिमण्या मस्त चिवचिवत होत्या .आलेले पालक आपापल्या बाळांना आवरायचा शिस्त लावायचा प्रयत्न करत होते .ही बाळं त्यांच्या भोवती ही धुडगूस घालत होती .तेवढ्यात बाई आल्या आणि मुलं एकदम चिडीचूप झाली ...आता मात्र संस्कार धो धो वाहायला लागले .

बाईनी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मुलांचे विविध गुण दर्शन सुरु झाले .हे गुणदर्शन म्हणजे उपस्थित पालकांना वर्षभरात आपला मुलगा किती गुणवान झाला आणि शिक्षकांना याची देही याची डोळा आपण पेरलेले संस्कार उगवताना ,फोफावताना बघण्याची संधी !

बाई म्हणाल्या ,"चला बरं गोष्ट कोण सांगणार ? आपण कितीतरी गोष्टी शिकलोय कि नाही ? अदिती, अथर्व ,ख़ुशी कोण येतं बरं गोष्ट सांगायला ?चल चिन्मय,तू सांग बरं गोष्ट !"

चिन्मय कसाबसा उठला ...उठला कसला ! त्याच्या आईने त्याला ढकललाच ..चिन्मय नावाची ही अडीच पावणेतीन फुटी मूर्ती ! पिवळा आडव्या रेघांचा टी शर्ट, हिरवी इलास्टिक ची चड्डी पोटावर गच्च बसलेली ,त्यातही कडक इन शर्ट केला होता साहेबांनी ! उठताना अडखळत उठला पण नंतर सावरून आमच्या बाजूला उभा राहीला .हाताची घडी घालून विवेकानंदांची पोज घेतली .सगळीकडे नजर फिरवली आणि गोष्ट सांगू लागला ....

" उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या .एकीचे नाव सुनीती आणि दुसरीचे नाव सुरुची .सुनीती चांगली होती ,दयाळू होती.सुरुची दुष्ट होती ...पण पट्टराणी होती ना ssssssss! ( हा ना जरा जास्तच लांब होता ) एकदा काय झालं !(बालप्रजेच्या डोळ्यात उत्कंठा तुडुंब भरली होती ) सुनितीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम राजा उत्तानपाद च्या मांडीवर बसले होते .तेवढ्यात सुरुची तिथे आली आणि तिनं ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढून लांब ढकललं आणि ओरडली ,"तू राजाच्या मांडीवर आज्जिबात बसायचं नाही .तिथंफक्त माझा उत्तम बसणार !".सगळी चिमणी प्रजा गोष्ट मन लाऊन ऐकत होती. निवेदनाप्रमाणे चेहऱ्यावरचे भावही बदलत होते

" राजाला खूप वाईट वाटलं... ध्रुव त्याचा मुलगा होता ना!...पण काय करणार ? सुरुची पट्टराणी हो ना ssss ! " चिन्मयची आई च्या डोळ्यात लेकाचे कौतुक मावत नव्हते.कदाचित लेक गुणवत्ता यादीत आल्याचे एखादे सुप्त स्वप्न ही पाहत असावी बिचारी !चिन्मयची कथा धोधो वाहत होती

"ध्रुव रडत रडत आईकडे गेला ...आणि मग त्यानं काय केलं एक कावड घेतली आणि आपल्या आईबाबांना तिच्यात बसवलं आणि तो काशी यात्रेला निघाला ." स्टोरी ने अब बढिया टर्न लिया .आई टीचर अस्वस्थ झाल्या ...बाकीचे पालक खुदुखुदू हसू लागले .पण बालप्रजेची उत्सुकता कायम होती .टीचर चिन्मयची चड्डी ओढू लागली .पण मी थांबवलं त्यानं .बाकीच्या मुलांच्या सोबत मलाही ही नवी गोष्ट ऐकायची होती ना !...त्याला निवांत पणे मी गोष्ट सांगू दिली ....

"कावड मध्ये बसलेले आईबाबा त्याला म्हणाले ,बाळ आम्हाला पाणी देशील का रे ..तो हो बाबा म्हणाला ...मुलानो तुमच्या आईबाबांनी तुमच्याकडे पाणी मागितलंतर तुम्हीही हो म्हणायचं .आणि तांब्यात पाणी भरून भांडं आणायचं म्हणजे पाणी वाया जात नाही " टीचरने सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी बाहेर पडत होती .मुलांनी लांबलचक होकारार्थी मन हलवली .

" तो तांब्या घेऊन नदीकडे गेला .त्यानं तांब्या पाण्यात बुडवला.डूब डूब असा आवाज आला .तेवढ्यात पलीकडून सुssssई करत बाण आला आणि त्याच्या पोटात घुसला " बाण पोटात घुसल्याची खात्री झाल्यावर चिन्मय गोष्ट पुढे नेऊ लागला ....

" आई ग ss! तो ओरडलेले पाहून राजा दशरथ आला आणि त्याला पडलेले पाहून रडू लागला ,"अरेरे हे मी काय केले रे बाळ!" रडू नका महाराज तिकडे माझे आई वडील आहेत त्यानं पाणी द्या ! एवढे म्हणून तो मेला ." ही नवी गोष्ट सर्व बालप्रजा मन लाऊन लक्ष देऊन ऐकत होती .चिन्मयची आई मात्र अस्वस्थ झाली .मला त्याचा आवेश खूप आवडला होता आणि बालप्रजेला वेगळी नवी गोष्ट !

"राजा दशरथ पाण्याचा तांब्या घेऊन आईबाबांच्या कडे गेला .बाबांनी रागाने त्याला विचारले , कुठे आहे तुझा देव ? तो नम्रपणे म्हणाला ,बाबा तो सगळी कडे आहे ..! बाबांनी रागाने विचारले .त्या भिंतीत आहे ? या खांबात आहे ?"

एक प्रचंड खसखस पालकात पसरली .मलाही हसू आवरेना टीचर आणि चिन्मयची आई हसण्याचा प्रयत्न करत होत्या .टीचरने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी एका दमात सांगत होता बिचारा !

आलेल्या व्यत्ययाने बारकी मुलं नाराज झाली .एवढ्या सॉलिड गोष्टीला खुळ्यासारखे हसतात काय ? हाच भाव त्यांच्या डोळ्यात होता .ही नवीन गोष्ट त्याना भलतीच आवडली होती ..मला पण हं! चिन्मयने हातवारे करत मोठ्यांना शांत बसवले आणि गोष्ट सांगू लागला पण तेवढ्यात त्याची नजर आईच्या डोळ्यांकडे गेली आणि गोष्ट राजधानी एक्प्रेस ने पुढे सरकली ." त्याच्या बाबांनी खांबाला जोरात लाथ मारली.नरसिंह आला त्याने बाबांना आपल्या मांडीवर झोपवले ..आणि पोट फाडले ..आणि दुष्ट राजा मेला ...आणि संपली माझी गोष्ट !" म्हणत चिन्मय महर्षी मला आणि टीचरला नमस्कार करून जागेवर विराजमान झाले .

दुष्ट राणी पासून सुरु झालेली गोष्ट दुष्ट राजा मेल्यावर संपली .माझा दिवस सत्कारणी लागला .गोष्टींचं मस्त कोलाज पाहिलं नंतर भाषणात मी त्याच्या उत्स्फूर्त पणाचे,सभाधीटपणाचे कौतुक केले.आता घरी वर्गात नवीन गोष्ट सुरु होणार हेही लक्षात आले जरी चिन्मय म्हणाला असेल 'संपली माझी गोष्ट !

स्वाती ठकार( हा लेख 24-09-2007 च्या सकाळच्या मुक्तपीठ मध्ये प्रकाशित )

खरच संपली का गोष्ट !!!


मिनकी............... !

आजकाल कालवणात मीठ टाकले कि नाही ,चहात साखर किती टाकली हे आठवत नाही पण लहानपणाच्या घटना अजूनही स्पष्ट आठवतात .शाळेतले दिवस ,मैत्रिणी ,शिक्षक ,सणातल्या गमती वगैरे कालची गोष्ट असल्यासारख्या आठवतात .

आई वडील गावातच शिक्षक होते .वयाच्या ४५ व्या दिवशीच शाळेत गेले मी! बेबी सीटर वगैरे चोचले नव्हते. घरी हि सांभाळणारे कोणी नव्हते.त्यामुळे आईच्या बाजूला दुपट्या वर पडून अभ्यास करायची .असो .आमचे गाव चिकोडी तालुक्यातले खडकलाट (सुलोचना बाईंचे गाव हि त्याची खास ओळख )मालगुडी डेज सारखे खडकलाट डेज अशी मालिका होऊ शकेल .वडिलांची मुलामुलींची संताजी विद्या मंदिर हि ब्रिटीश कालीन शाळा गावाबाहेर होती .आणि आईची मुलींची शाळा गावात न .वा .जोशी , या सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या जुन्या घरी भरायची .

मी चार वर्षाची होईपर्यंत कधी सकाळी वडिलांच्या शाळेत तर दुपारी आईच्या शाळेत असा माझा दिनक्रम होता .गावाबाहेरची वडिलांची शाळा मला खूप आवडायची .कारण तिथून गाड्या ,म्हशी बैलगाड्या आणि गावाचे तळे दिसायचे .पटावर नाव नसल्याने वर्गात बसायची सक्ती नव्हती .त्यामुळे बाहेर खेळत रहायची जे काही कानावर पडेल ते तोंड पाठ करायची .लहानपणापासूनची सवय ना !..त्यामुळे पाढे, अभ्यास ,पशुपक्षांचे आवाज याबरोबरच अस्सल शिव्याही पाठ झाल्या .अर्थाची चिंता ऐकणार्याला असल्याने घरच्यांची काळजी वाढली .त्यावेळी विद्यार्थ्यांना पटावर आणण्यासाठी गावात सक्तीची गणती असायची .किमान कोट्याला मुली कमी पडतात या नावाखाली आईने माझे नाव एक वर्ष आधीच तिच्या शाळेत घातले .आणि माझी गावातल्या तिच्या शाळेच्या कोंडवाड्यात रवानगी झाली .

शाळा सुरु झाल्यावरही मी हट्टाने बाबांच्या शाळेत जात होते पण वर्षाच्या मध्यावर आईने फर्मान काढले 'उद्यापासून तू गावातल्या शाळेतच यायचे .'मी मनाविरुद्ध आईच्या शाळेत जाऊ लागले .तिथे एका खोलीत दोन वर्ग भरत.दुसरी आणि चौथी एका वर्गात ....तिसरी आणि पाचवी एका वर्गात ..पहिली आणि ऑफिस जवळ जवळ . आईकडे पहिली आणि ती हेड मिस्ट्रेस असल्याने ऑफिस ची ही जबाबदारी होती .त्यावेळी बेंच वगैरे भानगड नव्हती .खाली प्रत्येकाने आपले बसकर अंथरून त्यावरच बसायचे .आई शिस्तप्रिय हेड मिस्ट्रेस म्हणून प्रसिद्ध होती.आज त्या शाळेचे स्थलांतर गावाबाहेरनव्या मोठ्या इमारतीत झाले आहे .आईला जाऊन सहा वर्षे होतील पण अजूनही ती शाळा सिंधू ताईंची शाळा म्हणूनच ओळखली जाते ...असो ,

आईच्या आदेशानुसार मी त्या शाळेत जायला तर लागले पण मन रमत नव्हतं.माझ्या एका बाजूला अदिती हरदास बसायची. ती भराभर बाराखड्या लिहायची .दुसऱ्या बाजूला मीनाक्षी नाईक बसायची हि सावकाश कोरून लिहायची .दोघी आईच्या लाडक्या विद्यार्थिनी ! मी कायम संभ्रमात असायची कि भराभर बाराखडी लिहू कि कोरून सुंदर लिहू ? दोन्हीही जमायचं नाही आणि मी किती बुद्धू आहे असं वाटायचं!खरतर तोंडी अभ्यासात वाघ होते .पहिली ते सातवीच्या सगळ्या कविता पाढे तोंडपाठ ! प्रश्नांची उत्तरे ही पटावर नसताना देखील तोंडपाठ होती . वयाच्या चाळीसाव्या दिवसापासून शाळेत गेल्यावर काय होणार !लेखी अभ्यासात मात्र गाडी मागे .या शाळेतल्या मैत्रिणींशी गट्टी जमायची होती .

एक दिवस लिखाणावरून आईने खूप तासले.( वय वर्ष पाच )खेळाच्या सुट्टीत एका दगडावर गप्प बसलेले पाहून मीनाक्षी माझ्याजवळ आली .तिला सगळे मिनकी म्हणत.ती माझी समजूत काढू लागली "अग पतिम( प्रतिमा चा अपभ्रंश !)तुला सुदिक झ्याक लिवायला इल .तू केवडी ल्हान हैस आनी कविता किती छान म्हन्तीस,मला शिकीव कि ग !"आणि मला कळलंच नाही त्यानंतर ही मोठ्या डोळ्यांची,नाजूक चणीची ,सावळी,रेखीव मिनकी इतकी जिवाभावाची सखी झाली .उठता बसता शाळेत बाहेर मला तीच हवीशी वाटू लागली .त्यानंतर मात्र मी मिनकी मुळेच आईच्या शाळेत छान रमले .

मी माझ्या घरातील दोन भावांच्या नंतरची एकटी आणि धाकटी लाडकी लेक .ती तिच्या घरातली पाच बहिणी आणि एक भाऊ यांची मोठी ताई !आमच्या वयात जेमतेम एकदीड वर्षाचा फरक असूनही ती मात्र अकाली एकदम पोक्त झाली .खेळताना सुद्धा कायम सोबत दोन तीन भावंडे असायची .तिसरीत तिचं खेळणं पूर्ण बंद झालं.चौथीत तिची शाळा बंद करण्याचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला आणि मी घरात रडून घर डोक्यावर घेतलं. माझ्या आई वडिलांनी तिच्या वडिलांना सांगितलं कि गावातल्या आईच्या शाळेत तिला पाचवी पर्यंत शिकू दे !तिचं पाचवी पर्यंतच शिक्षण कोणत्याही क्षणी बंद व्हायच्या मार्गावर होतं.तिच्या सोबत तिची भावंडेही शाळेत येत .घरकाम ,भावंडाना सांभाळतही ती अभ्यासात खूपच हुशार ,एकपाठी होती .

आईची शाळा पाचवी वरून सहावी पर्यंत वाढली .मिनकी आता फक्त पटावर उरली होती .पण तिला शाळेत बोलवायला मी रोज जायची .सुगीच्या दिवसात ही १०-११ वर्षाची पोरगी आई वडील शेतात कामाला गेल्यावर सगळ्यांचा स्वयंपाक ,धुणी भांडी आवडीने करत घरात थांबायची .एरवी घरात इकडची काडी तिकडेही न करणारी मी , तिने शाळेत यावे म्हणून तिला मदत करायची .तिला चुलीवर भाकरी करताना पाहणे मला खूप आवडायचे .पिटुकल्या हाताने भाकरी थापायची ,तव्यात टाकायची ,तव्यातली भाकरी निखाऱ्यापुढे ठेवायची ! एक लयबद्ध क्रिया होती . परात ,तवा आणि समोरच्या निखाऱ्या पुढच्या तिन्ही भाकरी ती लीलया हाताळायची .त्यावेळी असं वाटायचं शाळेत जाण्यापेक्षा घरकाम करणे मस्त !तिला सगळी भावंडं खूप छळायची.पण ती अजिबात वैतागायची नाही .एक सव्वा वर्षाच्या अंतरावरची ही भावंडे म्हणजे वैताग होता .पण ती कधी कुणावर ओरडायची नाही कि हात ही उचलला नाही .उलट तिला त्रास देताना पाहून मलाच त्यांना बदडून काढावे वाटे .

सहावीनंतर शिक्षण बंद झालं .शिक्षण थांबल्याचे दुखः नाही. जे आयुष्य वाट्याला आले ते तिने आनंदाने स्वीकारले ..भगवद्गीता वाचताना वीतरागी ,स्थितप्रज्ञ माणसाचे जे वर्णन आहे ते तिला तंतोतंत लागू होत होते .आईच्या शाळेत असताना कानडी केंद्र शाळा माळावरच्या शाळेच्या बाजूला होती .अंदाजपत्रक ,कागदपत्रे तिथून तालुक्याला जात. ती पोचवायला मी आणि मिनकी जायचो .पहिली दुसरीत असताना ती मला जपून न्यायची .रस्त्यात बैलगाडी गाडी आली कि मला घट्ट पोटाशी धरून ठेवायची आणि वर म्हणायची ," पतिम ! तू लई भेकरी(वेंधळी) हैस बाई ! कुटं तर गाडीखाली गिडीखाली आलीस म्हंजे! "

जाताना वाटेत मोठे तळे लागायचे .विश्रांतीसाठी तळ्याच्या काठाला बसायचो .पायाला मासे गुळगुळ करायचे गुदगुल्या व्हायच्या .मी पाण्यात पाय सोडून बसायची तेवढ्यात ती एक दगड स्वच्छ धुवून त्यावर खिशातून आणलेली चिंच तिखट मीठ गुळ दुसऱ्या स्वच्छ केलेल्या दगडाने वाटून त्याची अळोळी बळोळी बनवून समोरच्यांच्या परसात रचलेल्या कडब्यातील गुळगुळीत धाटाला लावून लोलीपोप सारखे माझ्या हातात द्यायची (त्यातही मोठा भाग मला द्यायची छोटा स्वताला ठेवायची )एकदा मी पाण्यात उतरून जवळच्या रुमालात मासा पकडू लागले .मासा काही मिळाला नाही पण एक चप्पल सटकले .चप्पल काढण्यात बराच वेळ गेला .आम्हाला शोधायला आईने दोन मुली पाठवल्या .त्यांनी आईला चोख रिपोर्ट दिला . मिनकीने कितीही मध्यस्ती केली तरी मार मात्र मलाच बसला .शाळा सुटताना माझा हात हातात घेऊन मिनकी कळवळून म्हणाली "येवड्या ल्हान पोरीला ताई कसं मारतात ग बाई !,मार खाताना रडू यायचं नाही पण तिच्या जवळ घेण्यानं रडू यायचं आणि खरच लहान असल्या सारखं वाटायचं !

सातवीला माळावरच्या शाळेत मिनकीशिवाय बसणं बरेच दिवस मला जड गेलं.मी नववीत असताना तिचं लग्न तिच्या धाकट्या मामांशी झालं .माझी दहावी संपता संपता तिला मुलगी झाल्याचही कळलं.मी बारावीत असताना एकदा बाजारात ती आणि तिची आई भेटल्या. तिच्या कडेवर तिची बारकी मुलगी आणि आईच्या कडेवर तिची मोठी मुलगी होती .ती माझ्याशी पूर्वीच्याच आपुलकीनं बोलत होती .मला मात्र ती एकदम परकी वाटायला लागली .एक तुटलेपण जाणवत होतं .

मी इंजिनियरिंग करण्यासाठी हुबळीला गेले .नोकरी लागली एकविसाव्या वर्षी लग्न झाले .मिनकी आता फक्त बातम्यात उरली होती .माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा तिला नात झाल्याचे कळाले.वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती आजी झाली होती .तिच्यावर ताईपण,आईपण आणि आजीपणही नियतीने अकाली लादले होते आणि तिनेही ते बिनबोभाट स्वीकारले होते ..

गावी गेले असता आईकडून कळाले ,तिच्या एका लेकीला पहिला मुलगा झाला.तेव्हा यल्लम्माचा नवस फेडायला सगळे सौन्दत्तीला गेले होते .रात्री गाडी चुकली म्हणून सगळे रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहून तिथेच झोपले. एक ट्रक भरधाव तिथून गेला .जाताना झोपलेल्या मिनकीला आणि तिच्या एका लेकीला जागीच चिरडून गेला .माझा गळा भरून आला .कशाला यल्लम्माला नवस बोलला असेल तिने ?फेडायला फक्त मुलगी जावयाला दिवसा उजेडी का नाही पाठवलं? गाडी तिच्याच अंगावरून का गेली ? इतक्या छान मुलीला का इतकं क्रूर मरण आलं? एक ना अनेक प्रश्न मनात थैमान घालून गेले .

मला गाडीपासून वाचवणाऱ्या ,"लईच बाई भेकरी तू !" म्हणणाऱ्या मिनकीचा जीव असा जावा यासारखे दुर्दैव कोणते !.........

स्वाती ठकार (व्यक्तिचित्र -चिंतन आदेश मध्ये प्रकाशित )

Wednesday, September 15, 2010

असतील नसतील तेवढे सगळे पुतळे क्रशर मधून काढावेत .....ती सामग्री लोकोपयोगी बांधकामासाठी वापरावी .पुतळ्यांची जागा मोकळी करावी ..पक्षांची सोय नवीन झाडे लावून आणि जगवून करावी . हे सर्व लोकोत्तर आत्मे संतुष्ट होतील ...(फक्त मायावतींच्या पुतळ्यांचा निर्णय त्यांच्या नंतर घ्या ).मंडळी तुम्हाला काय वाटते?

या ही पुढे जावून मला असे वाटते कि जर पुतळे क्रशर मधून काढताना जर समर्थक आडवे येत असतील तर ती कारवाई शासनाने ताबडतोब थांबवावी आणि त्या त्या समर्थकांच्या ताब्यात ते पुतळे द्यावेत जयंती पुण्यतिथी ऐवजी हे पुतळे रोज समर्थकांनी धुवून काढावेत..त्यांच्या देखभालीचा खर्चही समर्थकांना उचलावयास लावावा .तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्या समर्थकांच्या वर सोपवावी सोबत इशाराही द्यावा कि सुरक्षा नीट ठेवावी .हलगर्जीपणा झाल्यास तो समर्थकांवर अजामीनपात्र गुन्हा ठरेल .तसेच समाज कंटकानी पुतळ्याची विटंबना केल्यास त्या घटकांच्या सोबत या समर्थकानाही तितकेच जबाबदार धरावे. यातून वाचणारा खर्च देशावर झालेले परकीय कर्ज भागविण्यासाठी वापरावा .