Friday, June 25, 2010

वट पूजा आणि न संपणारे प्रश्न .......
१)हे नक्की ठरवले पाहिजे कि ही पूजा पर्यावरण रक्षणा साठी करायची कि पतीने पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी करायची ?
-जर पर्यावरणासाठी करायची असेल तर ती स्त्री आणि पुरुष दोघांनी योग्य प्रकारे करायला हवी .नुसते एक दिवस बायकांनी वडाला दोरा गुंडाळून आणि पाणी घालून कसे काय पर्यावरणाचे रक्षण होणार /.
-जर पत्नीने पतीच्या रक्षणासाठी करायची असेल तर ही रूढी एकतर्फी का ?
-आज पती पत्नी दोघेही तितक्याच सक्षमतेने ,एकमेका साह्य करू या उक्तीनुसार जगत आहेत .एखादा आधुनिक सत्यवान अत्यवस्थ असतो तेव्हा स्वताची किडनी देवून आधुनिक सावित्री त्याचे प्राण वाचवते.तसेच एखादा दारुडा सत्यवान आपल्या बायका मुलांना मारत असतो तेव्हा तीच सावित्री रण रागिणी होऊन त्याला झाडूने ,चप्पल ने बडवून काढते .पण हे व्रत मात्र नटून सजून करते हे मी कितीतरी कामवाल्यांच्यात पहिले आहे .हे चित्र सर्व कामवाल्यांच्यात दिसते.मला नेहमी प्रश्न पडतो कि एकदिवस सुटी घेवून हौस ,मौज करणे, नटणे ,मिरवणे, गोड धोड करणे ,रोजच्या तणावपूर्ण जीवनात हा थोडासा बदल ...एवढ्या साठी ते रूढी पाळणे तर नसते ना !-एखादी वट पूजा करत नसेल तर त्याचा अर्थ तिला नवर्याच्या प्राणांचे मोल नाही असा घ्यायचा का ?या सर्व घटनाकडे आपण कसे पाहणार ?
२) जर सावित्री सत्यवान मिथक साक्ष मानून ही परंपरा असेल तर आज त्याचे स्वरूप आणि आकलन योग्य होणे गरजेचे आहे .अश्व पतीने अल्पायु मुलगा आणि गुणी मुलगी यात गुणी मुलीची निवड केली तिला वर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले .तिच्या प्रत्येक वैचारिक मुद्द्याचेयोग्य समर्पक उतार दिले .तिला एखाद्या मुलाप्रमाणेच सर्व सुविधा दिल्या . वैधव्य येणार हे माहित असूनही तिला आवडला होता तोच साथीदार निवडू दिला .आपल्या कन्येच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला .यातील किती गोष्टींचा समाज अवलंब करतो .तेजस्वी सावित्रीच्या तेजाचे संवर्धन सत्यवान आणि त्याचे आईवडील जितक्या आत्मीयतेने करतात तितके आजचे सासू सासरे करतात काय ?आई..आजी करते म्हणून मी करते ...मला आवडते म्हणून मी करते ...तेवढीच एक दिवस वडाची पूजा ही होते आणि ऑक्सिजन ही मिळतो ही वाक्ये हेतू साध्य करतात का मुलभूत प्रश्न आहे.फुल्यांच्या सावित्रीने वट पूजा कधीच केली नाही किंबहुना बुद्धीनिष्ठ महात्मा फुल्यांनी ती करू दिली नाही ..पण ती सावित्री पुराणातील सावित्री इतकीच पतीशी समरस होती ..यावर कधी आपण विचार करतो का
३) आजची पिढी या सर्व घटना कडे बुद्धिनिष्ठ विचाराने पाहते .एखादी मुलगी नक्की विचारेल या सर्व रूढी मुलीनाच का आहेत ?पालक काय उत्तर देणार ?
4) योगी अरविन्दांची महाकाव्यातली सावित्री आजच्या या सावित्री मध्ये कुठेच दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल .गोवर्धन पूजा ही श्रीकृष्णाने सुरु करून दिलेली बुद्धिवादी पूजा . अनेक अंधश्रद्धांचे श्रीकृष्णाने जीवनात खंडन केले आहे.(अर्थात त्यावर दुसरी नोट होऊ शकेल )

स्वाती ठकार (२५ जून २०१० ,१३.३० )