September 5, 2013 at 4:06pm
आज शिक्षक दिन .जेवढे शिक्षक आयुष्यात आले त्या सर्व खाष्ट, प्रेमळ,तिरसट ,मारकुट्या,हुशार शिक्षकाना आठवू लागले ...अंकगणित रूळ मारून  शिकवणारे खराडे गुरुजी ..इंग्रजीचा पाया पक्का करून उत्तमोत्तम  इंग्रजी साहित्याची ओळख करून देणारे घेणारे कांबळे सर..कुसुमाग्रजांची अहि नकुल  शिकवताना एकाचवेळी साप आणि मुंगुस अभिनयाने डोळ्यापुढे उभे करणारे वामन कुलकर्णी सर,मधल्या सुट्टील लपाछपी खेळताना सरांच्या कपाटामागे लपल्यावर(तिथं शोधायला यायला सगळे घाबरायचे ),’काsssर्टे  म्हणत ’मांजरासारखी मला उचलून बाहेर काढणारे  हेडसर ...सगळ्यांवर धावती नजर गेली .जुन्या आठवणीनी हसू आलं .

खरंतर शाळा माझ्या नशीबात जन्मापासूनच पुजलेली होती ..आई वडील दोघेही गावात शिक्षक ..माझ्या दुर्दैवाने तेव्हा सहा महिने मॅटर्निटी लीव्हचे लाड नव्हते. तिसऱ्या महिन्यापासून मला आणि माझ्या भावाना  आईच्या शेजारी, पोत्यावर अंथरलेल्या दुपट्यावर पडून, इच्छा असो वा नसो ...ही आवडते मज मनापासुनी शाळा ऐकावं लागलं ...बोलायला लागले तशी मीही बे एके बे गाऊ लागले .( अक्कल नसतानाही पहिलीत जायच्या आधी शाळेतल्या पोरींबरोबर सुरात म्हणून तीसपर्यंत पाढे पाठ )..


वडिलांची शाळा गावाबाहेर ..आणि आईची शाळा गावात .....वडिलांच्या शाळेजवळ म्हशी, तळं बकऱ्या ,मोठे मैदान आणि आईच्या शाळेजवळ शेजारच्या घरांमधे होणारी भांडणं ,शाळेत येणारी मांजरं –बकऱ्या ,(शेजारी धनगराचं घर होतं ) ...एकंदर सुरुवातीला दोन्हीकडं मज्जा होती.पण नंतर अधिकृतपणे शाळेत भरती होईपर्यंत आठवड्याचे तीनचार  दिवस गावाबाहेर वडिलांच्या शाळेतच...


वडिलांची खूपच सवय होती ..जन्मल्या जन्मल्या त्यांच्या हातात गेले होते ना ! भास्कर काका पोहायला शिकवायला आमच्या विहिरीत घेऊन गेला तेव्हा विहिरीत वरून फेकत असताना काकांच्या (वडिलांच्या )समोर त्याला काकांची शपथ घातली ..त्यानीही डोळे मिचकावत ,मान हलवत त्याला फेक म्हणून खुण केली ..


भांडणं ,रुसणं गमती जमती सगळ्या काकांशीच (वडिल )जास्त . चित्रकार ,कवी असे अनेक गुण त्यांच्यात होते...सहनशीलता ,संवेदनशीलता ,जिव्हाळा ,माणुसकी ओतप्रोत भरलेली होती .ते प्रखर गांधीवादी ,विनोबाभक्त सर्वोदयी विचारांचे होते .न बोलता सतत काम करत राहायचे ...बायकांची कामं पुरुषांची कामं असा भेद भाव नव्हता .स्वच्छता करताना कोणत्याही गोष्टीची त्याना घाण वाटत नसे.


त्याना स्वतःला दलित मुलीशी लग्न करायचं होतं,जातिभेद तोडायचा होता  असं खाजगीत त्यानी एकदा सांगितलं होतं ..पण त्यांचा  सजातीय (शाखाही तीच ) विवाह झाला ...    त्यानी मलाही सांगितलं होतं ..तुला कुठल्याही जातीचा मुलगा आवडला तरी तू खुशाल लग्न कर ...मी करून देईन ...माझ्याही पदरी तेच   मी प्रथमेशलाही (माझा धाकटा ) हेच सांगितलंय .


एकाद्या मुलासारखं वडिलानी वाढवलं ..वडिल -शिक्षक तर ते छान होतेच पण अत्यंत जवळचे माझे मित्र होते ...कोणतेही गुपित ,अंतर्मनात सलणाऱ्या जखमांबद्दल त्याना सांगावं आणि निवांत व्हावं ...


त्यानी मला लहानपणापासूनच निर्णय स्वातंत्र्य दिलं ...एक काळ असा आला कि अपयशाची मालिका खंडितच होत नव्हती ...विलक्षण नैराश्य आलं होतं ..त्यावेळी त्यानीच धैर्य दिलं ...त्यांच्याचमुळे हे मी शिकले की शैक्षणिक पात्रता हा व्यक्तिमत्वाचा एखादा भाग होऊ शकतो ..माणूस म्हणून घडताना अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शाळेत शिकवल्या जात नाहीत.माणूस त्या निसर्गाकडून ,समाजाकडून शिकतो ..शिकणं जितकं महत्वाचं आहे तितकंच जे शिकतो ते योग्यप्रकारे वापरणंही महत्वातचं ..


माणूस चांगला किंवा वाईट नसतो ...तो परिस्थितीनुसार चांगलं वाईट वागतो ...बऱ्याचदा चांगलं किंवा वाईट हे व्यक्तिसापेक्ष असतं ...चांगल्या माणसाशी कुणीही चांगलं वागेल वाईट माणसाशी चांगलं वागाल तर तुम्ही ग्रेट ..हे त्यानीच सांगितलं .त्यानी मला फ्राईड वाचायला सांगितला....हिंदी मराठी उत्तमोत्तम साहित्याबद्दल सांगितलं ...साहित्यिकांची माहिती दिली ..हार्मोनियमची ओळख त्यांच्यामुळेच झाली ...सर्व कलांचा आस्वाद घे ही त्यांचीच शिकवण .शाळकरी वयातच माझ्या हातात कुसुमाग्रजांचे विशाखा ,बोरकरांची चांदणवेल दिली...


माझ्यात जे काही कवितेचे बीज आहे ते त्यांचंच देणं ..शेवटच्या काळात ते काही काळ माझ्याकडं होते ..आपली मतं ठामपणे मांडावी ..विजनवासात जावं लागलं तरी चालेल पण साहित्यिक क्षेत्रात शिरत आहेस तर  तडजोडी करू नकोस.. सतत लोक आणि पुस्तकं वाचत रहा ... लोकाना हवं ते देण्यापेक्षा आतून जे स्फूरतं तेच लिही...हे त्यांचे सल्ले आजही सोबत घेऊन वावरते .     

ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं तो माणूस थकत चाललेला बघवत नाही ...शेवटी सर्व काही अंथरुणावर होतं ...त्याना खूप संकोचल्यासारखं होत होतं ..मी म्हणायची ,“ तुम्ही नाही का आमचं केलंत तसंच आम्हीही करतो !”



सर्वजण मनापासून करत होतो ....त्यानी मला शेवटच्या दिवसात माझ्या सासूबाईंचं सर्व काही  करताना पाहिलं होतं ..मला म्हणाले ,“मी तुला सासूचं करताना बघितलय तिथं नवऱ्याची आई ,मुलांची आजी ही भावना होती ..माझं तर तू विलक्षण जिव्हाळ्यानं मनापासून करतेस ..पण लक्षात ठेव कुणाही अडलेल्याचं मग नातं असो वा नसो इतक्याच मनापासून करावं ...फार मोठं पुण्य आहे ते !”


शेवटच्या काळात त्याना माझी होणारी घालमेल बघवत नव्हती ...त्यातच ठकारांची सोलापूरला बदली झाली ..वडिलाना  सोडून घराबाहेर जाणं ..कार्यक्रम करणं सगळं बंदच केलं होतं ..जरा सुद्धा नजरेआड होऊ देत नव्हते ..

एक दिवस मला त्यानी समोर बसवलं आणि म्हणाले ,“हे बघ प्रतिम ,तू किती नशीबवान आहेस तुला चाळीशीपर्यंत आई मिळाली.... 45 वर्षापर्यंत वडिल तुझ्या सोबत आहेत ..माझी मात्र  बघ तिसऱ्या वर्षी आई आणि सोळाव्या वर्षी वडिल गेले .मी काय केलं असेल ? सुदैवाने तुम्ही मुलं सुना जावई सगळे इतकं मनापासून करता आहात ..आता कसलीच इच्छा उरली नाही ... मला खडकलाटला (मूळ गावी )जायचंय माझी नाळ आणि अस्थी तिथंच पडू देत .” 17 जुलै 2009 ला गावी नेले ..30 जुलैला शेवटपर्यंत नामस्मरण करत त्यानी देह ठेवला ..

काळ सगळ्या जखमा भरून काढतो हे अगदी खरंय ...पण आजही एखादी छान चाल सुचली ,शब्द सुचले कि मागून  तर्जनी आणि अंगठा जुळवून ,ओठ दुमडून डोळे,डोळे चमकवत ‘ मस्तच ग ! ’ अशी प्रतिक्रिया देणारे काका नाहीत हे वास्तव उदास करून जातं ..लाडक्या नातवांची लग्नं झाली ..आम्हाला नातवंडं झाली ... हे सुख बघायला ते नाहीत हे सतत जाणवतं ..

आज हर्ष (नातू ) ला हाताळताना त्यानी मला मांडीवर घेऊन म्हटलेली गाणीच ओठी येतात ..बडबडगीताच्या ध्वनीवर इतका छान तो हसतो ..कदाचित मीही तशीच हसत असेन...माझ्या लहानपणी स्वतःच्या नाकाचं माप घेऊन ते म्हणायचे ,”माझं नाक एवढं ..तुझं नाक केवढं बघू!” आणि माप घेतानाच हळूच नाकाच्या  शेंड्याला चिमटा घेऊन म्हणायचे “एsssवढंसंच!” आणि दोघे खदखदून हसायचो ...माझ्या दोन्ही मुलांसोबत हाच खेळ मी केलाय...आणि तेच खदखून हसणं अनुभवलंय ... कदाचित आज उद्या हर्षचं नाक अलगद पकडून मीही  म्हणेन ,”माझं नाक एवढं ...तुझं नाक एवढंसंच “! तोही कदाचित तसाच खदखदून हसेल.      
   
स्वाती ठकार (5.9.13...3.57)