Wednesday, December 15, 2010

संपली माझी गोष्ट

एकदा अशाच एका संस्कारवर्गात प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते .काय मजा आली म्हणून सांगू !सगळी बालप्रजा ही आदल्या वर्षी बाल गटात वय बसत नसल्याने शाळांनी नाकारलेली आणि संस्कार वर्गाने संस्कार करण्यासाठी आनंदाने स्वीकारलेली होती .लहानमुले मला जरा जास्तच आवडत असल्याने प्रमुख पाहुणी पेक्षा त्यांच्या हालचाली निवांत पणे न्याहाळाव्यात म्हणून जरा आधीच जाऊन बसले .वर्गाचे दार बंद होते .संचालिका यायच्या होत्या .मी तिथेच एका झाडाजवळ बसले.

मला संचालीकेशिवाय कोणीच व्यक्तीशः ओळखत नसल्याने मी निवांत पणे बालगोपाळ पाहू लागले .कुणी सॉक्सशी चाळे करत होता .कुणी खिशातून आणलेले पिक्सो ,बारक्या गाड्या मित्रांना दाखवत होता .इवल्याशा चिमण्या मस्त चिवचिवत होत्या .आलेले पालक आपापल्या बाळांना आवरायचा शिस्त लावायचा प्रयत्न करत होते .ही बाळं त्यांच्या भोवती ही धुडगूस घालत होती .तेवढ्यात बाई आल्या आणि मुलं एकदम चिडीचूप झाली ...आता मात्र संस्कार धो धो वाहायला लागले .

बाईनी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मुलांचे विविध गुण दर्शन सुरु झाले .हे गुणदर्शन म्हणजे उपस्थित पालकांना वर्षभरात आपला मुलगा किती गुणवान झाला आणि शिक्षकांना याची देही याची डोळा आपण पेरलेले संस्कार उगवताना ,फोफावताना बघण्याची संधी !

बाई म्हणाल्या ,"चला बरं गोष्ट कोण सांगणार ? आपण कितीतरी गोष्टी शिकलोय कि नाही ? अदिती, अथर्व ,ख़ुशी कोण येतं बरं गोष्ट सांगायला ?चल चिन्मय,तू सांग बरं गोष्ट !"

चिन्मय कसाबसा उठला ...उठला कसला ! त्याच्या आईने त्याला ढकललाच ..चिन्मय नावाची ही अडीच पावणेतीन फुटी मूर्ती ! पिवळा आडव्या रेघांचा टी शर्ट, हिरवी इलास्टिक ची चड्डी पोटावर गच्च बसलेली ,त्यातही कडक इन शर्ट केला होता साहेबांनी ! उठताना अडखळत उठला पण नंतर सावरून आमच्या बाजूला उभा राहीला .हाताची घडी घालून विवेकानंदांची पोज घेतली .सगळीकडे नजर फिरवली आणि गोष्ट सांगू लागला ....

" उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या .एकीचे नाव सुनीती आणि दुसरीचे नाव सुरुची .सुनीती चांगली होती ,दयाळू होती.सुरुची दुष्ट होती ...पण पट्टराणी होती ना ssssssss! ( हा ना जरा जास्तच लांब होता ) एकदा काय झालं !(बालप्रजेच्या डोळ्यात उत्कंठा तुडुंब भरली होती ) सुनितीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम राजा उत्तानपाद च्या मांडीवर बसले होते .तेवढ्यात सुरुची तिथे आली आणि तिनं ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढून लांब ढकललं आणि ओरडली ,"तू राजाच्या मांडीवर आज्जिबात बसायचं नाही .तिथंफक्त माझा उत्तम बसणार !".सगळी चिमणी प्रजा गोष्ट मन लाऊन ऐकत होती. निवेदनाप्रमाणे चेहऱ्यावरचे भावही बदलत होते

" राजाला खूप वाईट वाटलं... ध्रुव त्याचा मुलगा होता ना!...पण काय करणार ? सुरुची पट्टराणी हो ना ssss ! " चिन्मयची आई च्या डोळ्यात लेकाचे कौतुक मावत नव्हते.कदाचित लेक गुणवत्ता यादीत आल्याचे एखादे सुप्त स्वप्न ही पाहत असावी बिचारी !चिन्मयची कथा धोधो वाहत होती

"ध्रुव रडत रडत आईकडे गेला ...आणि मग त्यानं काय केलं एक कावड घेतली आणि आपल्या आईबाबांना तिच्यात बसवलं आणि तो काशी यात्रेला निघाला ." स्टोरी ने अब बढिया टर्न लिया .आई टीचर अस्वस्थ झाल्या ...बाकीचे पालक खुदुखुदू हसू लागले .पण बालप्रजेची उत्सुकता कायम होती .टीचर चिन्मयची चड्डी ओढू लागली .पण मी थांबवलं त्यानं .बाकीच्या मुलांच्या सोबत मलाही ही नवी गोष्ट ऐकायची होती ना !...त्याला निवांत पणे मी गोष्ट सांगू दिली ....

"कावड मध्ये बसलेले आईबाबा त्याला म्हणाले ,बाळ आम्हाला पाणी देशील का रे ..तो हो बाबा म्हणाला ...मुलानो तुमच्या आईबाबांनी तुमच्याकडे पाणी मागितलंतर तुम्हीही हो म्हणायचं .आणि तांब्यात पाणी भरून भांडं आणायचं म्हणजे पाणी वाया जात नाही " टीचरने सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी बाहेर पडत होती .मुलांनी लांबलचक होकारार्थी मन हलवली .

" तो तांब्या घेऊन नदीकडे गेला .त्यानं तांब्या पाण्यात बुडवला.डूब डूब असा आवाज आला .तेवढ्यात पलीकडून सुssssई करत बाण आला आणि त्याच्या पोटात घुसला " बाण पोटात घुसल्याची खात्री झाल्यावर चिन्मय गोष्ट पुढे नेऊ लागला ....

" आई ग ss! तो ओरडलेले पाहून राजा दशरथ आला आणि त्याला पडलेले पाहून रडू लागला ,"अरेरे हे मी काय केले रे बाळ!" रडू नका महाराज तिकडे माझे आई वडील आहेत त्यानं पाणी द्या ! एवढे म्हणून तो मेला ." ही नवी गोष्ट सर्व बालप्रजा मन लाऊन लक्ष देऊन ऐकत होती .चिन्मयची आई मात्र अस्वस्थ झाली .मला त्याचा आवेश खूप आवडला होता आणि बालप्रजेला वेगळी नवी गोष्ट !

"राजा दशरथ पाण्याचा तांब्या घेऊन आईबाबांच्या कडे गेला .बाबांनी रागाने त्याला विचारले , कुठे आहे तुझा देव ? तो नम्रपणे म्हणाला ,बाबा तो सगळी कडे आहे ..! बाबांनी रागाने विचारले .त्या भिंतीत आहे ? या खांबात आहे ?"

एक प्रचंड खसखस पालकात पसरली .मलाही हसू आवरेना टीचर आणि चिन्मयची आई हसण्याचा प्रयत्न करत होत्या .टीचरने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी एका दमात सांगत होता बिचारा !

आलेल्या व्यत्ययाने बारकी मुलं नाराज झाली .एवढ्या सॉलिड गोष्टीला खुळ्यासारखे हसतात काय ? हाच भाव त्यांच्या डोळ्यात होता .ही नवीन गोष्ट त्याना भलतीच आवडली होती ..मला पण हं! चिन्मयने हातवारे करत मोठ्यांना शांत बसवले आणि गोष्ट सांगू लागला पण तेवढ्यात त्याची नजर आईच्या डोळ्यांकडे गेली आणि गोष्ट राजधानी एक्प्रेस ने पुढे सरकली ." त्याच्या बाबांनी खांबाला जोरात लाथ मारली.नरसिंह आला त्याने बाबांना आपल्या मांडीवर झोपवले ..आणि पोट फाडले ..आणि दुष्ट राजा मेला ...आणि संपली माझी गोष्ट !" म्हणत चिन्मय महर्षी मला आणि टीचरला नमस्कार करून जागेवर विराजमान झाले .

दुष्ट राणी पासून सुरु झालेली गोष्ट दुष्ट राजा मेल्यावर संपली .माझा दिवस सत्कारणी लागला .गोष्टींचं मस्त कोलाज पाहिलं नंतर भाषणात मी त्याच्या उत्स्फूर्त पणाचे,सभाधीटपणाचे कौतुक केले.आता घरी वर्गात नवीन गोष्ट सुरु होणार हेही लक्षात आले जरी चिन्मय म्हणाला असेल 'संपली माझी गोष्ट !

स्वाती ठकार( हा लेख 24-09-2007 च्या सकाळच्या मुक्तपीठ मध्ये प्रकाशित )

खरच संपली का गोष्ट !!!


मिनकी............... !

आजकाल कालवणात मीठ टाकले कि नाही ,चहात साखर किती टाकली हे आठवत नाही पण लहानपणाच्या घटना अजूनही स्पष्ट आठवतात .शाळेतले दिवस ,मैत्रिणी ,शिक्षक ,सणातल्या गमती वगैरे कालची गोष्ट असल्यासारख्या आठवतात .

आई वडील गावातच शिक्षक होते .वयाच्या ४५ व्या दिवशीच शाळेत गेले मी! बेबी सीटर वगैरे चोचले नव्हते. घरी हि सांभाळणारे कोणी नव्हते.त्यामुळे आईच्या बाजूला दुपट्या वर पडून अभ्यास करायची .असो .आमचे गाव चिकोडी तालुक्यातले खडकलाट (सुलोचना बाईंचे गाव हि त्याची खास ओळख )मालगुडी डेज सारखे खडकलाट डेज अशी मालिका होऊ शकेल .वडिलांची मुलामुलींची संताजी विद्या मंदिर हि ब्रिटीश कालीन शाळा गावाबाहेर होती .आणि आईची मुलींची शाळा गावात न .वा .जोशी , या सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या जुन्या घरी भरायची .

मी चार वर्षाची होईपर्यंत कधी सकाळी वडिलांच्या शाळेत तर दुपारी आईच्या शाळेत असा माझा दिनक्रम होता .गावाबाहेरची वडिलांची शाळा मला खूप आवडायची .कारण तिथून गाड्या ,म्हशी बैलगाड्या आणि गावाचे तळे दिसायचे .पटावर नाव नसल्याने वर्गात बसायची सक्ती नव्हती .त्यामुळे बाहेर खेळत रहायची जे काही कानावर पडेल ते तोंड पाठ करायची .लहानपणापासूनची सवय ना !..त्यामुळे पाढे, अभ्यास ,पशुपक्षांचे आवाज याबरोबरच अस्सल शिव्याही पाठ झाल्या .अर्थाची चिंता ऐकणार्याला असल्याने घरच्यांची काळजी वाढली .त्यावेळी विद्यार्थ्यांना पटावर आणण्यासाठी गावात सक्तीची गणती असायची .किमान कोट्याला मुली कमी पडतात या नावाखाली आईने माझे नाव एक वर्ष आधीच तिच्या शाळेत घातले .आणि माझी गावातल्या तिच्या शाळेच्या कोंडवाड्यात रवानगी झाली .

शाळा सुरु झाल्यावरही मी हट्टाने बाबांच्या शाळेत जात होते पण वर्षाच्या मध्यावर आईने फर्मान काढले 'उद्यापासून तू गावातल्या शाळेतच यायचे .'मी मनाविरुद्ध आईच्या शाळेत जाऊ लागले .तिथे एका खोलीत दोन वर्ग भरत.दुसरी आणि चौथी एका वर्गात ....तिसरी आणि पाचवी एका वर्गात ..पहिली आणि ऑफिस जवळ जवळ . आईकडे पहिली आणि ती हेड मिस्ट्रेस असल्याने ऑफिस ची ही जबाबदारी होती .त्यावेळी बेंच वगैरे भानगड नव्हती .खाली प्रत्येकाने आपले बसकर अंथरून त्यावरच बसायचे .आई शिस्तप्रिय हेड मिस्ट्रेस म्हणून प्रसिद्ध होती.आज त्या शाळेचे स्थलांतर गावाबाहेरनव्या मोठ्या इमारतीत झाले आहे .आईला जाऊन सहा वर्षे होतील पण अजूनही ती शाळा सिंधू ताईंची शाळा म्हणूनच ओळखली जाते ...असो ,

आईच्या आदेशानुसार मी त्या शाळेत जायला तर लागले पण मन रमत नव्हतं.माझ्या एका बाजूला अदिती हरदास बसायची. ती भराभर बाराखड्या लिहायची .दुसऱ्या बाजूला मीनाक्षी नाईक बसायची हि सावकाश कोरून लिहायची .दोघी आईच्या लाडक्या विद्यार्थिनी ! मी कायम संभ्रमात असायची कि भराभर बाराखडी लिहू कि कोरून सुंदर लिहू ? दोन्हीही जमायचं नाही आणि मी किती बुद्धू आहे असं वाटायचं!खरतर तोंडी अभ्यासात वाघ होते .पहिली ते सातवीच्या सगळ्या कविता पाढे तोंडपाठ ! प्रश्नांची उत्तरे ही पटावर नसताना देखील तोंडपाठ होती . वयाच्या चाळीसाव्या दिवसापासून शाळेत गेल्यावर काय होणार !लेखी अभ्यासात मात्र गाडी मागे .या शाळेतल्या मैत्रिणींशी गट्टी जमायची होती .

एक दिवस लिखाणावरून आईने खूप तासले.( वय वर्ष पाच )खेळाच्या सुट्टीत एका दगडावर गप्प बसलेले पाहून मीनाक्षी माझ्याजवळ आली .तिला सगळे मिनकी म्हणत.ती माझी समजूत काढू लागली "अग पतिम( प्रतिमा चा अपभ्रंश !)तुला सुदिक झ्याक लिवायला इल .तू केवडी ल्हान हैस आनी कविता किती छान म्हन्तीस,मला शिकीव कि ग !"आणि मला कळलंच नाही त्यानंतर ही मोठ्या डोळ्यांची,नाजूक चणीची ,सावळी,रेखीव मिनकी इतकी जिवाभावाची सखी झाली .उठता बसता शाळेत बाहेर मला तीच हवीशी वाटू लागली .त्यानंतर मात्र मी मिनकी मुळेच आईच्या शाळेत छान रमले .

मी माझ्या घरातील दोन भावांच्या नंतरची एकटी आणि धाकटी लाडकी लेक .ती तिच्या घरातली पाच बहिणी आणि एक भाऊ यांची मोठी ताई !आमच्या वयात जेमतेम एकदीड वर्षाचा फरक असूनही ती मात्र अकाली एकदम पोक्त झाली .खेळताना सुद्धा कायम सोबत दोन तीन भावंडे असायची .तिसरीत तिचं खेळणं पूर्ण बंद झालं.चौथीत तिची शाळा बंद करण्याचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला आणि मी घरात रडून घर डोक्यावर घेतलं. माझ्या आई वडिलांनी तिच्या वडिलांना सांगितलं कि गावातल्या आईच्या शाळेत तिला पाचवी पर्यंत शिकू दे !तिचं पाचवी पर्यंतच शिक्षण कोणत्याही क्षणी बंद व्हायच्या मार्गावर होतं.तिच्या सोबत तिची भावंडेही शाळेत येत .घरकाम ,भावंडाना सांभाळतही ती अभ्यासात खूपच हुशार ,एकपाठी होती .

आईची शाळा पाचवी वरून सहावी पर्यंत वाढली .मिनकी आता फक्त पटावर उरली होती .पण तिला शाळेत बोलवायला मी रोज जायची .सुगीच्या दिवसात ही १०-११ वर्षाची पोरगी आई वडील शेतात कामाला गेल्यावर सगळ्यांचा स्वयंपाक ,धुणी भांडी आवडीने करत घरात थांबायची .एरवी घरात इकडची काडी तिकडेही न करणारी मी , तिने शाळेत यावे म्हणून तिला मदत करायची .तिला चुलीवर भाकरी करताना पाहणे मला खूप आवडायचे .पिटुकल्या हाताने भाकरी थापायची ,तव्यात टाकायची ,तव्यातली भाकरी निखाऱ्यापुढे ठेवायची ! एक लयबद्ध क्रिया होती . परात ,तवा आणि समोरच्या निखाऱ्या पुढच्या तिन्ही भाकरी ती लीलया हाताळायची .त्यावेळी असं वाटायचं शाळेत जाण्यापेक्षा घरकाम करणे मस्त !तिला सगळी भावंडं खूप छळायची.पण ती अजिबात वैतागायची नाही .एक सव्वा वर्षाच्या अंतरावरची ही भावंडे म्हणजे वैताग होता .पण ती कधी कुणावर ओरडायची नाही कि हात ही उचलला नाही .उलट तिला त्रास देताना पाहून मलाच त्यांना बदडून काढावे वाटे .

सहावीनंतर शिक्षण बंद झालं .शिक्षण थांबल्याचे दुखः नाही. जे आयुष्य वाट्याला आले ते तिने आनंदाने स्वीकारले ..भगवद्गीता वाचताना वीतरागी ,स्थितप्रज्ञ माणसाचे जे वर्णन आहे ते तिला तंतोतंत लागू होत होते .आईच्या शाळेत असताना कानडी केंद्र शाळा माळावरच्या शाळेच्या बाजूला होती .अंदाजपत्रक ,कागदपत्रे तिथून तालुक्याला जात. ती पोचवायला मी आणि मिनकी जायचो .पहिली दुसरीत असताना ती मला जपून न्यायची .रस्त्यात बैलगाडी गाडी आली कि मला घट्ट पोटाशी धरून ठेवायची आणि वर म्हणायची ," पतिम ! तू लई भेकरी(वेंधळी) हैस बाई ! कुटं तर गाडीखाली गिडीखाली आलीस म्हंजे! "

जाताना वाटेत मोठे तळे लागायचे .विश्रांतीसाठी तळ्याच्या काठाला बसायचो .पायाला मासे गुळगुळ करायचे गुदगुल्या व्हायच्या .मी पाण्यात पाय सोडून बसायची तेवढ्यात ती एक दगड स्वच्छ धुवून त्यावर खिशातून आणलेली चिंच तिखट मीठ गुळ दुसऱ्या स्वच्छ केलेल्या दगडाने वाटून त्याची अळोळी बळोळी बनवून समोरच्यांच्या परसात रचलेल्या कडब्यातील गुळगुळीत धाटाला लावून लोलीपोप सारखे माझ्या हातात द्यायची (त्यातही मोठा भाग मला द्यायची छोटा स्वताला ठेवायची )एकदा मी पाण्यात उतरून जवळच्या रुमालात मासा पकडू लागले .मासा काही मिळाला नाही पण एक चप्पल सटकले .चप्पल काढण्यात बराच वेळ गेला .आम्हाला शोधायला आईने दोन मुली पाठवल्या .त्यांनी आईला चोख रिपोर्ट दिला . मिनकीने कितीही मध्यस्ती केली तरी मार मात्र मलाच बसला .शाळा सुटताना माझा हात हातात घेऊन मिनकी कळवळून म्हणाली "येवड्या ल्हान पोरीला ताई कसं मारतात ग बाई !,मार खाताना रडू यायचं नाही पण तिच्या जवळ घेण्यानं रडू यायचं आणि खरच लहान असल्या सारखं वाटायचं !

सातवीला माळावरच्या शाळेत मिनकीशिवाय बसणं बरेच दिवस मला जड गेलं.मी नववीत असताना तिचं लग्न तिच्या धाकट्या मामांशी झालं .माझी दहावी संपता संपता तिला मुलगी झाल्याचही कळलं.मी बारावीत असताना एकदा बाजारात ती आणि तिची आई भेटल्या. तिच्या कडेवर तिची बारकी मुलगी आणि आईच्या कडेवर तिची मोठी मुलगी होती .ती माझ्याशी पूर्वीच्याच आपुलकीनं बोलत होती .मला मात्र ती एकदम परकी वाटायला लागली .एक तुटलेपण जाणवत होतं .

मी इंजिनियरिंग करण्यासाठी हुबळीला गेले .नोकरी लागली एकविसाव्या वर्षी लग्न झाले .मिनकी आता फक्त बातम्यात उरली होती .माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा तिला नात झाल्याचे कळाले.वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती आजी झाली होती .तिच्यावर ताईपण,आईपण आणि आजीपणही नियतीने अकाली लादले होते आणि तिनेही ते बिनबोभाट स्वीकारले होते ..

गावी गेले असता आईकडून कळाले ,तिच्या एका लेकीला पहिला मुलगा झाला.तेव्हा यल्लम्माचा नवस फेडायला सगळे सौन्दत्तीला गेले होते .रात्री गाडी चुकली म्हणून सगळे रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहून तिथेच झोपले. एक ट्रक भरधाव तिथून गेला .जाताना झोपलेल्या मिनकीला आणि तिच्या एका लेकीला जागीच चिरडून गेला .माझा गळा भरून आला .कशाला यल्लम्माला नवस बोलला असेल तिने ?फेडायला फक्त मुलगी जावयाला दिवसा उजेडी का नाही पाठवलं? गाडी तिच्याच अंगावरून का गेली ? इतक्या छान मुलीला का इतकं क्रूर मरण आलं? एक ना अनेक प्रश्न मनात थैमान घालून गेले .

मला गाडीपासून वाचवणाऱ्या ,"लईच बाई भेकरी तू !" म्हणणाऱ्या मिनकीचा जीव असा जावा यासारखे दुर्दैव कोणते !.........

स्वाती ठकार (व्यक्तिचित्र -चिंतन आदेश मध्ये प्रकाशित )