Wednesday, December 15, 2010

संपली माझी गोष्ट

एकदा अशाच एका संस्कारवर्गात प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते .काय मजा आली म्हणून सांगू !सगळी बालप्रजा ही आदल्या वर्षी बाल गटात वय बसत नसल्याने शाळांनी नाकारलेली आणि संस्कार वर्गाने संस्कार करण्यासाठी आनंदाने स्वीकारलेली होती .लहानमुले मला जरा जास्तच आवडत असल्याने प्रमुख पाहुणी पेक्षा त्यांच्या हालचाली निवांत पणे न्याहाळाव्यात म्हणून जरा आधीच जाऊन बसले .वर्गाचे दार बंद होते .संचालिका यायच्या होत्या .मी तिथेच एका झाडाजवळ बसले.

मला संचालीकेशिवाय कोणीच व्यक्तीशः ओळखत नसल्याने मी निवांत पणे बालगोपाळ पाहू लागले .कुणी सॉक्सशी चाळे करत होता .कुणी खिशातून आणलेले पिक्सो ,बारक्या गाड्या मित्रांना दाखवत होता .इवल्याशा चिमण्या मस्त चिवचिवत होत्या .आलेले पालक आपापल्या बाळांना आवरायचा शिस्त लावायचा प्रयत्न करत होते .ही बाळं त्यांच्या भोवती ही धुडगूस घालत होती .तेवढ्यात बाई आल्या आणि मुलं एकदम चिडीचूप झाली ...आता मात्र संस्कार धो धो वाहायला लागले .

बाईनी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मुलांचे विविध गुण दर्शन सुरु झाले .हे गुणदर्शन म्हणजे उपस्थित पालकांना वर्षभरात आपला मुलगा किती गुणवान झाला आणि शिक्षकांना याची देही याची डोळा आपण पेरलेले संस्कार उगवताना ,फोफावताना बघण्याची संधी !

बाई म्हणाल्या ,"चला बरं गोष्ट कोण सांगणार ? आपण कितीतरी गोष्टी शिकलोय कि नाही ? अदिती, अथर्व ,ख़ुशी कोण येतं बरं गोष्ट सांगायला ?चल चिन्मय,तू सांग बरं गोष्ट !"

चिन्मय कसाबसा उठला ...उठला कसला ! त्याच्या आईने त्याला ढकललाच ..चिन्मय नावाची ही अडीच पावणेतीन फुटी मूर्ती ! पिवळा आडव्या रेघांचा टी शर्ट, हिरवी इलास्टिक ची चड्डी पोटावर गच्च बसलेली ,त्यातही कडक इन शर्ट केला होता साहेबांनी ! उठताना अडखळत उठला पण नंतर सावरून आमच्या बाजूला उभा राहीला .हाताची घडी घालून विवेकानंदांची पोज घेतली .सगळीकडे नजर फिरवली आणि गोष्ट सांगू लागला ....

" उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या .एकीचे नाव सुनीती आणि दुसरीचे नाव सुरुची .सुनीती चांगली होती ,दयाळू होती.सुरुची दुष्ट होती ...पण पट्टराणी होती ना ssssssss! ( हा ना जरा जास्तच लांब होता ) एकदा काय झालं !(बालप्रजेच्या डोळ्यात उत्कंठा तुडुंब भरली होती ) सुनितीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम राजा उत्तानपाद च्या मांडीवर बसले होते .तेवढ्यात सुरुची तिथे आली आणि तिनं ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढून लांब ढकललं आणि ओरडली ,"तू राजाच्या मांडीवर आज्जिबात बसायचं नाही .तिथंफक्त माझा उत्तम बसणार !".सगळी चिमणी प्रजा गोष्ट मन लाऊन ऐकत होती. निवेदनाप्रमाणे चेहऱ्यावरचे भावही बदलत होते

" राजाला खूप वाईट वाटलं... ध्रुव त्याचा मुलगा होता ना!...पण काय करणार ? सुरुची पट्टराणी हो ना ssss ! " चिन्मयची आई च्या डोळ्यात लेकाचे कौतुक मावत नव्हते.कदाचित लेक गुणवत्ता यादीत आल्याचे एखादे सुप्त स्वप्न ही पाहत असावी बिचारी !चिन्मयची कथा धोधो वाहत होती

"ध्रुव रडत रडत आईकडे गेला ...आणि मग त्यानं काय केलं एक कावड घेतली आणि आपल्या आईबाबांना तिच्यात बसवलं आणि तो काशी यात्रेला निघाला ." स्टोरी ने अब बढिया टर्न लिया .आई टीचर अस्वस्थ झाल्या ...बाकीचे पालक खुदुखुदू हसू लागले .पण बालप्रजेची उत्सुकता कायम होती .टीचर चिन्मयची चड्डी ओढू लागली .पण मी थांबवलं त्यानं .बाकीच्या मुलांच्या सोबत मलाही ही नवी गोष्ट ऐकायची होती ना !...त्याला निवांत पणे मी गोष्ट सांगू दिली ....

"कावड मध्ये बसलेले आईबाबा त्याला म्हणाले ,बाळ आम्हाला पाणी देशील का रे ..तो हो बाबा म्हणाला ...मुलानो तुमच्या आईबाबांनी तुमच्याकडे पाणी मागितलंतर तुम्हीही हो म्हणायचं .आणि तांब्यात पाणी भरून भांडं आणायचं म्हणजे पाणी वाया जात नाही " टीचरने सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी बाहेर पडत होती .मुलांनी लांबलचक होकारार्थी मन हलवली .

" तो तांब्या घेऊन नदीकडे गेला .त्यानं तांब्या पाण्यात बुडवला.डूब डूब असा आवाज आला .तेवढ्यात पलीकडून सुssssई करत बाण आला आणि त्याच्या पोटात घुसला " बाण पोटात घुसल्याची खात्री झाल्यावर चिन्मय गोष्ट पुढे नेऊ लागला ....

" आई ग ss! तो ओरडलेले पाहून राजा दशरथ आला आणि त्याला पडलेले पाहून रडू लागला ,"अरेरे हे मी काय केले रे बाळ!" रडू नका महाराज तिकडे माझे आई वडील आहेत त्यानं पाणी द्या ! एवढे म्हणून तो मेला ." ही नवी गोष्ट सर्व बालप्रजा मन लाऊन लक्ष देऊन ऐकत होती .चिन्मयची आई मात्र अस्वस्थ झाली .मला त्याचा आवेश खूप आवडला होता आणि बालप्रजेला वेगळी नवी गोष्ट !

"राजा दशरथ पाण्याचा तांब्या घेऊन आईबाबांच्या कडे गेला .बाबांनी रागाने त्याला विचारले , कुठे आहे तुझा देव ? तो नम्रपणे म्हणाला ,बाबा तो सगळी कडे आहे ..! बाबांनी रागाने विचारले .त्या भिंतीत आहे ? या खांबात आहे ?"

एक प्रचंड खसखस पालकात पसरली .मलाही हसू आवरेना टीचर आणि चिन्मयची आई हसण्याचा प्रयत्न करत होत्या .टीचरने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी एका दमात सांगत होता बिचारा !

आलेल्या व्यत्ययाने बारकी मुलं नाराज झाली .एवढ्या सॉलिड गोष्टीला खुळ्यासारखे हसतात काय ? हाच भाव त्यांच्या डोळ्यात होता .ही नवीन गोष्ट त्याना भलतीच आवडली होती ..मला पण हं! चिन्मयने हातवारे करत मोठ्यांना शांत बसवले आणि गोष्ट सांगू लागला पण तेवढ्यात त्याची नजर आईच्या डोळ्यांकडे गेली आणि गोष्ट राजधानी एक्प्रेस ने पुढे सरकली ." त्याच्या बाबांनी खांबाला जोरात लाथ मारली.नरसिंह आला त्याने बाबांना आपल्या मांडीवर झोपवले ..आणि पोट फाडले ..आणि दुष्ट राजा मेला ...आणि संपली माझी गोष्ट !" म्हणत चिन्मय महर्षी मला आणि टीचरला नमस्कार करून जागेवर विराजमान झाले .

दुष्ट राणी पासून सुरु झालेली गोष्ट दुष्ट राजा मेल्यावर संपली .माझा दिवस सत्कारणी लागला .गोष्टींचं मस्त कोलाज पाहिलं नंतर भाषणात मी त्याच्या उत्स्फूर्त पणाचे,सभाधीटपणाचे कौतुक केले.आता घरी वर्गात नवीन गोष्ट सुरु होणार हेही लक्षात आले जरी चिन्मय म्हणाला असेल 'संपली माझी गोष्ट !

स्वाती ठकार( हा लेख 24-09-2007 च्या सकाळच्या मुक्तपीठ मध्ये प्रकाशित )

खरच संपली का गोष्ट !!!


मिनकी............... !

आजकाल कालवणात मीठ टाकले कि नाही ,चहात साखर किती टाकली हे आठवत नाही पण लहानपणाच्या घटना अजूनही स्पष्ट आठवतात .शाळेतले दिवस ,मैत्रिणी ,शिक्षक ,सणातल्या गमती वगैरे कालची गोष्ट असल्यासारख्या आठवतात .

आई वडील गावातच शिक्षक होते .वयाच्या ४५ व्या दिवशीच शाळेत गेले मी! बेबी सीटर वगैरे चोचले नव्हते. घरी हि सांभाळणारे कोणी नव्हते.त्यामुळे आईच्या बाजूला दुपट्या वर पडून अभ्यास करायची .असो .आमचे गाव चिकोडी तालुक्यातले खडकलाट (सुलोचना बाईंचे गाव हि त्याची खास ओळख )मालगुडी डेज सारखे खडकलाट डेज अशी मालिका होऊ शकेल .वडिलांची मुलामुलींची संताजी विद्या मंदिर हि ब्रिटीश कालीन शाळा गावाबाहेर होती .आणि आईची मुलींची शाळा गावात न .वा .जोशी , या सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या जुन्या घरी भरायची .

मी चार वर्षाची होईपर्यंत कधी सकाळी वडिलांच्या शाळेत तर दुपारी आईच्या शाळेत असा माझा दिनक्रम होता .गावाबाहेरची वडिलांची शाळा मला खूप आवडायची .कारण तिथून गाड्या ,म्हशी बैलगाड्या आणि गावाचे तळे दिसायचे .पटावर नाव नसल्याने वर्गात बसायची सक्ती नव्हती .त्यामुळे बाहेर खेळत रहायची जे काही कानावर पडेल ते तोंड पाठ करायची .लहानपणापासूनची सवय ना !..त्यामुळे पाढे, अभ्यास ,पशुपक्षांचे आवाज याबरोबरच अस्सल शिव्याही पाठ झाल्या .अर्थाची चिंता ऐकणार्याला असल्याने घरच्यांची काळजी वाढली .त्यावेळी विद्यार्थ्यांना पटावर आणण्यासाठी गावात सक्तीची गणती असायची .किमान कोट्याला मुली कमी पडतात या नावाखाली आईने माझे नाव एक वर्ष आधीच तिच्या शाळेत घातले .आणि माझी गावातल्या तिच्या शाळेच्या कोंडवाड्यात रवानगी झाली .

शाळा सुरु झाल्यावरही मी हट्टाने बाबांच्या शाळेत जात होते पण वर्षाच्या मध्यावर आईने फर्मान काढले 'उद्यापासून तू गावातल्या शाळेतच यायचे .'मी मनाविरुद्ध आईच्या शाळेत जाऊ लागले .तिथे एका खोलीत दोन वर्ग भरत.दुसरी आणि चौथी एका वर्गात ....तिसरी आणि पाचवी एका वर्गात ..पहिली आणि ऑफिस जवळ जवळ . आईकडे पहिली आणि ती हेड मिस्ट्रेस असल्याने ऑफिस ची ही जबाबदारी होती .त्यावेळी बेंच वगैरे भानगड नव्हती .खाली प्रत्येकाने आपले बसकर अंथरून त्यावरच बसायचे .आई शिस्तप्रिय हेड मिस्ट्रेस म्हणून प्रसिद्ध होती.आज त्या शाळेचे स्थलांतर गावाबाहेरनव्या मोठ्या इमारतीत झाले आहे .आईला जाऊन सहा वर्षे होतील पण अजूनही ती शाळा सिंधू ताईंची शाळा म्हणूनच ओळखली जाते ...असो ,

आईच्या आदेशानुसार मी त्या शाळेत जायला तर लागले पण मन रमत नव्हतं.माझ्या एका बाजूला अदिती हरदास बसायची. ती भराभर बाराखड्या लिहायची .दुसऱ्या बाजूला मीनाक्षी नाईक बसायची हि सावकाश कोरून लिहायची .दोघी आईच्या लाडक्या विद्यार्थिनी ! मी कायम संभ्रमात असायची कि भराभर बाराखडी लिहू कि कोरून सुंदर लिहू ? दोन्हीही जमायचं नाही आणि मी किती बुद्धू आहे असं वाटायचं!खरतर तोंडी अभ्यासात वाघ होते .पहिली ते सातवीच्या सगळ्या कविता पाढे तोंडपाठ ! प्रश्नांची उत्तरे ही पटावर नसताना देखील तोंडपाठ होती . वयाच्या चाळीसाव्या दिवसापासून शाळेत गेल्यावर काय होणार !लेखी अभ्यासात मात्र गाडी मागे .या शाळेतल्या मैत्रिणींशी गट्टी जमायची होती .

एक दिवस लिखाणावरून आईने खूप तासले.( वय वर्ष पाच )खेळाच्या सुट्टीत एका दगडावर गप्प बसलेले पाहून मीनाक्षी माझ्याजवळ आली .तिला सगळे मिनकी म्हणत.ती माझी समजूत काढू लागली "अग पतिम( प्रतिमा चा अपभ्रंश !)तुला सुदिक झ्याक लिवायला इल .तू केवडी ल्हान हैस आनी कविता किती छान म्हन्तीस,मला शिकीव कि ग !"आणि मला कळलंच नाही त्यानंतर ही मोठ्या डोळ्यांची,नाजूक चणीची ,सावळी,रेखीव मिनकी इतकी जिवाभावाची सखी झाली .उठता बसता शाळेत बाहेर मला तीच हवीशी वाटू लागली .त्यानंतर मात्र मी मिनकी मुळेच आईच्या शाळेत छान रमले .

मी माझ्या घरातील दोन भावांच्या नंतरची एकटी आणि धाकटी लाडकी लेक .ती तिच्या घरातली पाच बहिणी आणि एक भाऊ यांची मोठी ताई !आमच्या वयात जेमतेम एकदीड वर्षाचा फरक असूनही ती मात्र अकाली एकदम पोक्त झाली .खेळताना सुद्धा कायम सोबत दोन तीन भावंडे असायची .तिसरीत तिचं खेळणं पूर्ण बंद झालं.चौथीत तिची शाळा बंद करण्याचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला आणि मी घरात रडून घर डोक्यावर घेतलं. माझ्या आई वडिलांनी तिच्या वडिलांना सांगितलं कि गावातल्या आईच्या शाळेत तिला पाचवी पर्यंत शिकू दे !तिचं पाचवी पर्यंतच शिक्षण कोणत्याही क्षणी बंद व्हायच्या मार्गावर होतं.तिच्या सोबत तिची भावंडेही शाळेत येत .घरकाम ,भावंडाना सांभाळतही ती अभ्यासात खूपच हुशार ,एकपाठी होती .

आईची शाळा पाचवी वरून सहावी पर्यंत वाढली .मिनकी आता फक्त पटावर उरली होती .पण तिला शाळेत बोलवायला मी रोज जायची .सुगीच्या दिवसात ही १०-११ वर्षाची पोरगी आई वडील शेतात कामाला गेल्यावर सगळ्यांचा स्वयंपाक ,धुणी भांडी आवडीने करत घरात थांबायची .एरवी घरात इकडची काडी तिकडेही न करणारी मी , तिने शाळेत यावे म्हणून तिला मदत करायची .तिला चुलीवर भाकरी करताना पाहणे मला खूप आवडायचे .पिटुकल्या हाताने भाकरी थापायची ,तव्यात टाकायची ,तव्यातली भाकरी निखाऱ्यापुढे ठेवायची ! एक लयबद्ध क्रिया होती . परात ,तवा आणि समोरच्या निखाऱ्या पुढच्या तिन्ही भाकरी ती लीलया हाताळायची .त्यावेळी असं वाटायचं शाळेत जाण्यापेक्षा घरकाम करणे मस्त !तिला सगळी भावंडं खूप छळायची.पण ती अजिबात वैतागायची नाही .एक सव्वा वर्षाच्या अंतरावरची ही भावंडे म्हणजे वैताग होता .पण ती कधी कुणावर ओरडायची नाही कि हात ही उचलला नाही .उलट तिला त्रास देताना पाहून मलाच त्यांना बदडून काढावे वाटे .

सहावीनंतर शिक्षण बंद झालं .शिक्षण थांबल्याचे दुखः नाही. जे आयुष्य वाट्याला आले ते तिने आनंदाने स्वीकारले ..भगवद्गीता वाचताना वीतरागी ,स्थितप्रज्ञ माणसाचे जे वर्णन आहे ते तिला तंतोतंत लागू होत होते .आईच्या शाळेत असताना कानडी केंद्र शाळा माळावरच्या शाळेच्या बाजूला होती .अंदाजपत्रक ,कागदपत्रे तिथून तालुक्याला जात. ती पोचवायला मी आणि मिनकी जायचो .पहिली दुसरीत असताना ती मला जपून न्यायची .रस्त्यात बैलगाडी गाडी आली कि मला घट्ट पोटाशी धरून ठेवायची आणि वर म्हणायची ," पतिम ! तू लई भेकरी(वेंधळी) हैस बाई ! कुटं तर गाडीखाली गिडीखाली आलीस म्हंजे! "

जाताना वाटेत मोठे तळे लागायचे .विश्रांतीसाठी तळ्याच्या काठाला बसायचो .पायाला मासे गुळगुळ करायचे गुदगुल्या व्हायच्या .मी पाण्यात पाय सोडून बसायची तेवढ्यात ती एक दगड स्वच्छ धुवून त्यावर खिशातून आणलेली चिंच तिखट मीठ गुळ दुसऱ्या स्वच्छ केलेल्या दगडाने वाटून त्याची अळोळी बळोळी बनवून समोरच्यांच्या परसात रचलेल्या कडब्यातील गुळगुळीत धाटाला लावून लोलीपोप सारखे माझ्या हातात द्यायची (त्यातही मोठा भाग मला द्यायची छोटा स्वताला ठेवायची )एकदा मी पाण्यात उतरून जवळच्या रुमालात मासा पकडू लागले .मासा काही मिळाला नाही पण एक चप्पल सटकले .चप्पल काढण्यात बराच वेळ गेला .आम्हाला शोधायला आईने दोन मुली पाठवल्या .त्यांनी आईला चोख रिपोर्ट दिला . मिनकीने कितीही मध्यस्ती केली तरी मार मात्र मलाच बसला .शाळा सुटताना माझा हात हातात घेऊन मिनकी कळवळून म्हणाली "येवड्या ल्हान पोरीला ताई कसं मारतात ग बाई !,मार खाताना रडू यायचं नाही पण तिच्या जवळ घेण्यानं रडू यायचं आणि खरच लहान असल्या सारखं वाटायचं !

सातवीला माळावरच्या शाळेत मिनकीशिवाय बसणं बरेच दिवस मला जड गेलं.मी नववीत असताना तिचं लग्न तिच्या धाकट्या मामांशी झालं .माझी दहावी संपता संपता तिला मुलगी झाल्याचही कळलं.मी बारावीत असताना एकदा बाजारात ती आणि तिची आई भेटल्या. तिच्या कडेवर तिची बारकी मुलगी आणि आईच्या कडेवर तिची मोठी मुलगी होती .ती माझ्याशी पूर्वीच्याच आपुलकीनं बोलत होती .मला मात्र ती एकदम परकी वाटायला लागली .एक तुटलेपण जाणवत होतं .

मी इंजिनियरिंग करण्यासाठी हुबळीला गेले .नोकरी लागली एकविसाव्या वर्षी लग्न झाले .मिनकी आता फक्त बातम्यात उरली होती .माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा तिला नात झाल्याचे कळाले.वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती आजी झाली होती .तिच्यावर ताईपण,आईपण आणि आजीपणही नियतीने अकाली लादले होते आणि तिनेही ते बिनबोभाट स्वीकारले होते ..

गावी गेले असता आईकडून कळाले ,तिच्या एका लेकीला पहिला मुलगा झाला.तेव्हा यल्लम्माचा नवस फेडायला सगळे सौन्दत्तीला गेले होते .रात्री गाडी चुकली म्हणून सगळे रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहून तिथेच झोपले. एक ट्रक भरधाव तिथून गेला .जाताना झोपलेल्या मिनकीला आणि तिच्या एका लेकीला जागीच चिरडून गेला .माझा गळा भरून आला .कशाला यल्लम्माला नवस बोलला असेल तिने ?फेडायला फक्त मुलगी जावयाला दिवसा उजेडी का नाही पाठवलं? गाडी तिच्याच अंगावरून का गेली ? इतक्या छान मुलीला का इतकं क्रूर मरण आलं? एक ना अनेक प्रश्न मनात थैमान घालून गेले .

मला गाडीपासून वाचवणाऱ्या ,"लईच बाई भेकरी तू !" म्हणणाऱ्या मिनकीचा जीव असा जावा यासारखे दुर्दैव कोणते !.........

स्वाती ठकार (व्यक्तिचित्र -चिंतन आदेश मध्ये प्रकाशित )

Wednesday, September 15, 2010

असतील नसतील तेवढे सगळे पुतळे क्रशर मधून काढावेत .....ती सामग्री लोकोपयोगी बांधकामासाठी वापरावी .पुतळ्यांची जागा मोकळी करावी ..पक्षांची सोय नवीन झाडे लावून आणि जगवून करावी . हे सर्व लोकोत्तर आत्मे संतुष्ट होतील ...(फक्त मायावतींच्या पुतळ्यांचा निर्णय त्यांच्या नंतर घ्या ).मंडळी तुम्हाला काय वाटते?

या ही पुढे जावून मला असे वाटते कि जर पुतळे क्रशर मधून काढताना जर समर्थक आडवे येत असतील तर ती कारवाई शासनाने ताबडतोब थांबवावी आणि त्या त्या समर्थकांच्या ताब्यात ते पुतळे द्यावेत जयंती पुण्यतिथी ऐवजी हे पुतळे रोज समर्थकांनी धुवून काढावेत..त्यांच्या देखभालीचा खर्चही समर्थकांना उचलावयास लावावा .तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्या समर्थकांच्या वर सोपवावी सोबत इशाराही द्यावा कि सुरक्षा नीट ठेवावी .हलगर्जीपणा झाल्यास तो समर्थकांवर अजामीनपात्र गुन्हा ठरेल .तसेच समाज कंटकानी पुतळ्याची विटंबना केल्यास त्या घटकांच्या सोबत या समर्थकानाही तितकेच जबाबदार धरावे. यातून वाचणारा खर्च देशावर झालेले परकीय कर्ज भागविण्यासाठी वापरावा .



Friday, June 25, 2010

वट पूजा आणि न संपणारे प्रश्न .......
१)हे नक्की ठरवले पाहिजे कि ही पूजा पर्यावरण रक्षणा साठी करायची कि पतीने पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी करायची ?
-जर पर्यावरणासाठी करायची असेल तर ती स्त्री आणि पुरुष दोघांनी योग्य प्रकारे करायला हवी .नुसते एक दिवस बायकांनी वडाला दोरा गुंडाळून आणि पाणी घालून कसे काय पर्यावरणाचे रक्षण होणार /.
-जर पत्नीने पतीच्या रक्षणासाठी करायची असेल तर ही रूढी एकतर्फी का ?
-आज पती पत्नी दोघेही तितक्याच सक्षमतेने ,एकमेका साह्य करू या उक्तीनुसार जगत आहेत .एखादा आधुनिक सत्यवान अत्यवस्थ असतो तेव्हा स्वताची किडनी देवून आधुनिक सावित्री त्याचे प्राण वाचवते.तसेच एखादा दारुडा सत्यवान आपल्या बायका मुलांना मारत असतो तेव्हा तीच सावित्री रण रागिणी होऊन त्याला झाडूने ,चप्पल ने बडवून काढते .पण हे व्रत मात्र नटून सजून करते हे मी कितीतरी कामवाल्यांच्यात पहिले आहे .हे चित्र सर्व कामवाल्यांच्यात दिसते.मला नेहमी प्रश्न पडतो कि एकदिवस सुटी घेवून हौस ,मौज करणे, नटणे ,मिरवणे, गोड धोड करणे ,रोजच्या तणावपूर्ण जीवनात हा थोडासा बदल ...एवढ्या साठी ते रूढी पाळणे तर नसते ना !-एखादी वट पूजा करत नसेल तर त्याचा अर्थ तिला नवर्याच्या प्राणांचे मोल नाही असा घ्यायचा का ?या सर्व घटनाकडे आपण कसे पाहणार ?
२) जर सावित्री सत्यवान मिथक साक्ष मानून ही परंपरा असेल तर आज त्याचे स्वरूप आणि आकलन योग्य होणे गरजेचे आहे .अश्व पतीने अल्पायु मुलगा आणि गुणी मुलगी यात गुणी मुलीची निवड केली तिला वर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले .तिच्या प्रत्येक वैचारिक मुद्द्याचेयोग्य समर्पक उतार दिले .तिला एखाद्या मुलाप्रमाणेच सर्व सुविधा दिल्या . वैधव्य येणार हे माहित असूनही तिला आवडला होता तोच साथीदार निवडू दिला .आपल्या कन्येच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला .यातील किती गोष्टींचा समाज अवलंब करतो .तेजस्वी सावित्रीच्या तेजाचे संवर्धन सत्यवान आणि त्याचे आईवडील जितक्या आत्मीयतेने करतात तितके आजचे सासू सासरे करतात काय ?आई..आजी करते म्हणून मी करते ...मला आवडते म्हणून मी करते ...तेवढीच एक दिवस वडाची पूजा ही होते आणि ऑक्सिजन ही मिळतो ही वाक्ये हेतू साध्य करतात का मुलभूत प्रश्न आहे.फुल्यांच्या सावित्रीने वट पूजा कधीच केली नाही किंबहुना बुद्धीनिष्ठ महात्मा फुल्यांनी ती करू दिली नाही ..पण ती सावित्री पुराणातील सावित्री इतकीच पतीशी समरस होती ..यावर कधी आपण विचार करतो का
३) आजची पिढी या सर्व घटना कडे बुद्धिनिष्ठ विचाराने पाहते .एखादी मुलगी नक्की विचारेल या सर्व रूढी मुलीनाच का आहेत ?पालक काय उत्तर देणार ?
4) योगी अरविन्दांची महाकाव्यातली सावित्री आजच्या या सावित्री मध्ये कुठेच दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल .गोवर्धन पूजा ही श्रीकृष्णाने सुरु करून दिलेली बुद्धिवादी पूजा . अनेक अंधश्रद्धांचे श्रीकृष्णाने जीवनात खंडन केले आहे.(अर्थात त्यावर दुसरी नोट होऊ शकेल )

स्वाती ठकार (२५ जून २०१० ,१३.३० )

Tuesday, January 19, 2010

प्रिय बाबा !



काही माणसं वादळ होण्याची गर्जना करतात
पण साधी वावटळ ही होत नाहीत ,
काही जण वादळ होण्याचा , झंजावाती वेगाने वाहण्याचा संकल्प करतात
पण कालौघात स्वताच उन्मळून पडतात
काहीना वादळ ही व्हायचं नसतं आणि कोसळायचही नसतं ,
कडे कडेने दहाजण चालून गेलेल्या वाटेवरून
काठी टेकत चाचपडत चालत राहतात ..
'न पडता एकदाचे पार पडलो बुवा!' ....या समजुतीत !
तत्ववेत्याच्या अविर्भावात आपले शहाणपण
जगाला सांगतात हे खुळे...पांगळे!
पण बाबा ! तुम्ही वादळं थेट अंगावर घेत
त्यांना जीवलगाप्रमाणे कडकडून भिडत,त्यांना सोबत घेवून चालत राहिलात
वा !...ते चालणं काय डौलदार होतं...नुसतं बघत राहावं!!
त्या चालीत होता सत-असत ,नित्य -अनित्य ,सुख- दुक्ख
आशा -निराशा,हास्य- वेदनेचा ,प्रेम- पीडेचा
स्वानुभूत ठोक ताळेबंद ....
बघता बघता तुम्हीच महाकाय वादळ झालात
आणि आम्हाला 'किमान छोटीशी झुळूक तरी व्हा रे !'
म्हणत हेलकावे देत राहिलात
बाबा ! मी झुळूक झाले.. आता वादळही व्हायचय मला
पण हेलकावा देणारे तुम्ही मात्र ...
दूरस्थ तार्यात जाऊन गम्मत पहात बसलात !
आता मी कशी काय होणार वादळ ..!


Friday, January 15, 2010

काकू, मी वेडी नाही ना हो !


काकू मी वेडी नाही ना हो !..ही अदिती मला वेडी म्हणते .....साडे तीन वर्षाची अनुष्का किंचाळत माझी साक्ष घेत होती .
"हो काकू ती वेडीच आहे..."अदिती खात्रीलायक बातमी पुरवत होती .
हा सगळा सीन चालू होता तिसर्या आणि चौथ्या मजल्याच्या जिन्यावर .तिथे फारशी वर्दळ नसते .कारण इमारत पाच मजली असल्याने लिफ्ट चा वापर होत असतो .मग या छोट्या मुली जिन्यावर भातुकली पासून सर्व खेळ मांडत असतात .आणि मी अधून मधून त्यांच्यात घुसत असते. त्यानाही आता माझी सवय झाली आहे .मग शाळेच्या गमती जमती, गाणी ,रुसवे फुगवे सारं त्या माझ्याशी शेअर करतात .
आजही बहुदा काहीतरी झालं असावं.
सांगा ना काकू ! मी वेडी आहे का हो ! अनुष्का अदितीच्या अगावर धावून जात म्हणाली .आता सूर त्राग्या ऐवजी रडवेला झाला.
मी तिला माझ्याकडे ओढून घेत म्हटलं," छे ...छे ..अनुष्का तर एकदम शहाणी आहे ." ती माझ्या कुशीत घुसून आता मुसमुसू लागली .
"अजि....बात नाही काकू !....ती अगदी वेडी आहे.असं टीचरच म्हणाली ....म्हणाली की नाही .मी खोटं बोलतेय ग अनुष्का !.. "अदिती गुरकावून म्हणाली .तिला अनुष्काचं असं माझ्या पोटाशी बिलगणं अजिबात आवडलं नव्हतं .ही लहान मुलं फार पझेसिव असतात .
मी हळूच खुण करून अदितीला विचारलं 'काय झालं? ' तिने दिलेला तपशील असा होता.त्यांच्या वर्गात त्यांना काही तोंडी प्रश्न विचारले होते .अनुष्काने दिलेली उत्तरे अशी होती .
स्वयंपाक कोण करतं?
आजी .
तुला जेवायला कोण भरवतं?
बाबा
तुझा अभ्यास कोण घेतं?
आजी .
अंघोळीला कोण घालतं? तुला नटवतं कोण ?
बाबा .
तुला खेळणी कपडे कोण आणतं?
आई .
तुला बागेत ,फिरायला कोण नेतं?
आई .
अदिती मधेच म्हणाली," काकू ,टीचर हिला करेक्ट उत्तर सांगत होती .पण ही ऐकतच नव्हती.म्हणते कशी बाबाच जेवण भरवतात आणि अंघोळीला घालतात .टीचर राईट असते न काकू ! ही टीचरचं ऐकतच नव्हती ..आहे की नाही काकू ही वेडी !"
खरं तर अनुष्काने बरोबर उत्तरे दिली होती .तिची आई सकाळी लवकर कामावर जायची आणि तिला यायला उशीर व्हायचा .बाबा उशिरा जायचा आणि लवकर यायचा .त्यामुळे छोट्या अनुष्काकडे आई पेक्षा आजी आणि बाबा जास्त लक्ष द्यायचे .तिची आई ती कसर तिच्या सुट्टीच्या दिवशी तिला बागेत नेवून,तिचे भरपूर लाड करून भरून काढायची .
"अहो काकू,असं वेड्यासारखा उत्तर देतात का पण ! " अदितीच्या दातातून तिचा मुद्दा काही सुटत नव्हता .
अनुष्का मला म्हणाली ,"काकू, आजी सांगते ,खोटं बोललं की देव पाप देतो .खोटं बोलायचं नसतं ना !"
मी टीचर चूक की आजी आजी चूक की अनुष्का चूक हे उत्तर देण्याच्या फंदात न पडता .अनुष्का खरं बोलल्यामुळे तिला पाप लागणार नाही ! असा पलायनवादी सूर काढून वातावरण शांत केलं. थोड्याच वेळात त्यांचा वाद मिटला आणि त्या छान खेळू लागल्या .माझ्या डोक्यात मात्र प्रश्नांचे मोहोळ उठले .स्त्री कामासाठी बाहेर पडू लागली .तिच्या कामाच्या स्वरुपात कालानुरूप बदल होत चालले आहेत तरी समाजाची मानसिकता का बदलत नाही ? शिक्षण व्यवस्थेत बदल का होत नाहीत ?अनुष्काने दिलेले उत्तरही बरोबर असू शकते हे कधी व्यवस्था स्वीकारणार ?..... मंडळी तुम्हाला काय वाटते ?...स्वाती ठकार

Wednesday, January 13, 2010

का लागतात काही नेत्यांना बुआ आणि बाबा !

आजकाल राजकीय नेते आणि बाबा यांच्या स्नेह संबंधावर बरेच जण उघड बोलू लागले आहेत .हे चांगलेच आहे .पुरोगामी महाराष्ट्राने जादूटोणा चमत्कार याला खरं तर कधीच थारा दिला नाही .फुले, शाहू ,आणि ज्या राज्यावर गांधींचे मनापासून प्रेम होते. तेथे संतानी भागवत धर्माचा प्रसार केला .बारकाईने पाहिल्यास एकेश्वरवाद संतानी रुजवला .सर्व संतानी चमत्कार आणि भोंदू पणाला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले .मग संतांच्या जीवनाला चमत्कार कुणी चिकटवले ?
हे तथाकथित बुद्धीजीविनी चिकटवले. असे का बरे व्हावे?सुरुवातीला संताना विरोध करून पहिला ? पण न संतानी भूमिका बदलली न त्यांच्या अनुयायांनी ! साध्या सोप्या बोली भाषेत अध्यात्म उलगडून दाखवणारे संत समाजाला भावले .जी दारे बंद होती ती भक्तीची जी दारे बहुजन समाजासाठी बंद होती ती संतानी धाडधाड उघडली .स्वताचा उद्धार स्वत करा ही संतांची शिकवण होती त्यांनी चमत्काराऐवजी स्वसाधना ,कर्मयोग आणि अनुभूती प्रमाण मानली .संतांच्या शिकवणी मुळे समाजाचे एकाच वेळी रंजन आणि प्रबोधन दोन्ही होत होते . त्यामुळे संत लोकप्रिय झाले .समाज शक्तीचा दबदबा सर्वकालीन आहे.तेव्हा त्यांची लोकप्रियता आणि प्रभाव मिटवू न शकल्याने त्यांच्या मागे चमत्कार चिकटवून ,त्यांना देवत्व बहाल करून त्यांच्या मूळ शिकवणीपासून लोकांना दूर नेण्यासाठी हि कारस्थाने सुरु झाली आणि ती काही अंशी यशस्वीही झाली.
परंतु महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय भागवत धर्माला चिकटून राहिला .मग काही बुद्धीजीविनी संतांची वाटणी करून घेतली आणि त्यांच्यावर वास्तवतेच्या नावाखाली चिखलफेक केली . दरम्यान या बुद्धीजीविंच्या प्रमाणे राजकारण्यांना ही लोकशाही व्यवस्थेत लोकमताची आवश्यकता वाटू लागली आणि मग बुवा आणि बाबांचा उगम झाला .श्रीलाल शुक्ल या हिंदी लेखकाने त्यांच्या राग दरबारी या संग्रहात निवडणुका जिंकण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत .त्यातील एक प्रकार म्हणजे या बुवा आणि बाबांची मदत .
हे बुवा आणि बाबा भगवतगीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधिष्ठित पद्धतीने मांडून सर्व सिद्धांत स्वताच्या सोयीनुसार मोडून तोडून निरुपण करतात .भक्त यांच्या जाळ्यात अडकतात .अशा बुवा आणि बाबांचे चेले मग गावोगावी बाबांचे गुणगान गावू लागतात .मग काही नेते यांच्याशी सुत जमवतात .आणि श्रद्धेचा बाजार सुरु होतो . काही काळ लोकोपयोगी कामे होतात .जागा शासनाची ,खर्च लोकांचा ,कार्यकर्ते लोकातूनच येतात मग कार्यकर्त्यांची वर्गवारी होते .कष्टाळू ,भावूक कार्यकर्ते हरकामे होतात .बलदंड कार्यकर्ते विरोध करणाऱ्यांच्या अंगावर सोडता येतात.
तुम्ही म्हणाल नेत्यांचा संबंध कसा काय येतो ?निवडणुकीच्या आधी या बुवा, बाबांच्या सत्संगात हे नेते कपडे उचलण्या पासून सर्व कामे करतात .भक्त भारावून जातात. नेता आपल्या श्रद्धास्थानाची किती सेवा करतो ! मग हा बुवा चमत्कार (हात चलाखी ) करून ईश्वराचा प्रसाद म्हणून एखादी चेन किंवा अंगठी या नेत्याला देतो .माग चेले खाजगीत प्रचार करतात कि करतात ईश्वराने हा नेता निवडला .भावूक लोक फसतात .अर्थात ज्यांना लोकमत मिळत नाही असेच नेते अशा भानगडी करतात .महाराष्ट्रात हे लोण आजकाल फार पसरत चालले आहे .ही बाब मात्र चिंतेची आहे .काही नेते, खेळाडू , अभिनेते, अन्य कलाकार हा झटपट लोकप्रियतेचा मार्गअंगिकारू पाहतात . कठोर साधनेने यश मिळते हे सत्य त्यांच्यापासून कोसभर दूर असते हेच खरे .....स्वाती ठकार

Saturday, January 9, 2010

मुझे भी कुछ कहना है !



मैं दो बच्चों की माँ हूँ . बच्चों की परवरिश के दौरान मैंने भी वो सारी कठिनाइयाँ उठाई है .उन सारे तनावों का सामना किया जो कमाऊ माएँ कराती है .मैं कोलेज में पढ़ाती थी और मेरा अपना बड़ा बच्चा ढंग से नहीं पढ़ता था .स्कूल का नाम लेते ही उसके पेट में दर्द शुरू होता था .एक बार उसने पूरा पेपर खाली छोड़ दिया .वजह पूछने पर बताया ,वह खिड़की के पास बैठा था .पेड़ की टहनी खिड़की के पास थी .उस टहनी पर एक बड़ी चिड़िया छोटी चिड़िया के ऊपर बैठ गयी थी .बेचारी वो छोटीवाली मर जाती ना ! इसलिए पूरा वक्त वो उसे वहां से हकाल रहा था .मैंने आराम से सुन लिया .उसे बताया " बेटा ! तुम्हे तो ३० में से दो मार्क मिले है .तुमने एक प्रश्न और उसका उत्तर सही लिखा .congrats ! "मैं जानती थी उस वक्त वो जो कुछ पढ़ रहा है उस से ज्यादा चिड़िया ,पेड़ ,वातावरण देखना जरुरी है .मेरी सहेलिया मुझे टोकती थी ,उनका मानना था अगर बचपन से सही तरह पढाई का महत्त्व नहीं बताया तो बच्चे हाथ से निकल जायेंगे .जब वो ५ वी कक्षा में गया मैंने नौकरी छोड़ दी और पूरा ध्यान बच्चों पर दिया .उन्हें बेहतरीन किताबों से रूबरू किया अच्छे नाटक दिखाए .सब्जी लाना ,बिल भरना बैंक में जाना,छुट्टियों में रिश्तेदारों में घुल मिल कर रहना ये सारी बातें सिखाई .आज बड़ा बेटा अच्छी नौकरी करता है .छोटा वाला इंजिनीअरिंग पढ़ रहा है .आज वो उन पर आये सारे तनाव आराम से झेल सकते हैं .