Tuesday, January 19, 2010

प्रिय बाबा !



काही माणसं वादळ होण्याची गर्जना करतात
पण साधी वावटळ ही होत नाहीत ,
काही जण वादळ होण्याचा , झंजावाती वेगाने वाहण्याचा संकल्प करतात
पण कालौघात स्वताच उन्मळून पडतात
काहीना वादळ ही व्हायचं नसतं आणि कोसळायचही नसतं ,
कडे कडेने दहाजण चालून गेलेल्या वाटेवरून
काठी टेकत चाचपडत चालत राहतात ..
'न पडता एकदाचे पार पडलो बुवा!' ....या समजुतीत !
तत्ववेत्याच्या अविर्भावात आपले शहाणपण
जगाला सांगतात हे खुळे...पांगळे!
पण बाबा ! तुम्ही वादळं थेट अंगावर घेत
त्यांना जीवलगाप्रमाणे कडकडून भिडत,त्यांना सोबत घेवून चालत राहिलात
वा !...ते चालणं काय डौलदार होतं...नुसतं बघत राहावं!!
त्या चालीत होता सत-असत ,नित्य -अनित्य ,सुख- दुक्ख
आशा -निराशा,हास्य- वेदनेचा ,प्रेम- पीडेचा
स्वानुभूत ठोक ताळेबंद ....
बघता बघता तुम्हीच महाकाय वादळ झालात
आणि आम्हाला 'किमान छोटीशी झुळूक तरी व्हा रे !'
म्हणत हेलकावे देत राहिलात
बाबा ! मी झुळूक झाले.. आता वादळही व्हायचय मला
पण हेलकावा देणारे तुम्ही मात्र ...
दूरस्थ तार्यात जाऊन गम्मत पहात बसलात !
आता मी कशी काय होणार वादळ ..!


1 comment: