Saturday, January 19, 2013

जाड रवी

"स्वाती ,तुझ्याकडं ती जाड रवी आहे ती कुठून आणलीस ग?मलाही तशी हवीय  !खूप शोधली पण अशी मिळतच नाही ..डाळ मस्त  घोटली जाते तिनं " असे म्हणत डाळ घोटायला शेजारीण माझी जाड रवी घेऊन गेली .खरंच होतं ...त्या  रवीचा दांडा  जाडजूड असला तरी  ती अखंड होती आणि खालची घुसळण धारदार होती ..लोणी ही मस्त निघत असे .डाळ एकदम एकजीव घोटली जायची . शेजारीण निघून गेली ...मी मात्र रवीच्याच विचारात रमले .

अशीच एक रवी आईकडं होती ..माझ्या बाबानं (तुकाराम सुतारनं ) तिला जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी बनवून दिली होती...दरवेळी माहेरी जायची तेव्हा माझा डोळा त्या रवीवर असायचा ..आई काही दाद देत नसे वर जखमेवर मीठ चोळत म्हणायची ," तुकारामनंच करावी अशी रवी !तो होता तेव्हाच चार-पाच बनवून घ्यायला पाहिजे होत्या .."आईच्या माघारी भावजयीकडून ती रवी मागून आणणं प्रशस्त वाटत नव्हतं .


आई गेल्यावर वडिलांसोबत माहेरी गेले होते .तेव्हा त्याना मी म्हटलं ,"काका, मला अशीच रवी बनवून हवीय .आता बाबाच्यात कोण सुतारकाम करतय ?त्यानी घरी निरोप धाडला .त्याचा धाकटा मुलगा अण्ण्या (नाव अर्जून...माझ्याहून आठेक वर्षानं लहान ) आला ...डोळे दारू पिऊन तारवटलेले. याच अण्ण्याला मी लहानपणी कडेवर घेऊन फिरत असे ..मधे बराच काळ तो दिसला नव्हता ..मला बघितल्यावर  मला' नमस्कार अक्का!' म्हणत हात जोडले.


तेवढ्यात आमचा वाटेकरी(शेतातला शेतकरी ) ,भाऊ ,आणि अण्ण्याचं चांगलंच जुंपलं ...एकंदर  मतितार्थ हा कि हे सुतार माजलेत .धान्य न्यायला वेळेवर येतात .काही काम सांगितलं तर मात्र टाळमटाळ ...अण्ण्याचं म्हणणं असं कि सुतारकाम करणं फार अवघड झालंय ...परवडत नाही ...एवढं ऐकल्यावर मी रवीचा नादच सोडला ...

जाता जाता त्यानं काकाना त्याला बोलावण्याचं  कारण विचारलं ..
घरातली रवी त्याच्या हातात देत मीच उत्तर दिलं " बाबारे ,ताईला ही  रवी जशी बाबानं बनवून दिली होती ..अगदी तश्शीच मला हवी होती...राहू दे घे ...सुतारकाम महाग झालंय... तुला तुझ्या कामात कुठं वेळ असतो .....? "कसला राजबिंडा पोरगा होता आणि काय अवतार झाला होता ...मलाच गलबललं." काय अवतार करून घेतलायस रे अण्ण्या ?कसला साजरा होतास ...आणि काय ध्यान झालंय आता तुझं ! "मी किंचित त्राग्यानं म्हणाले  पण सूरात त्राग्यापेक्षा  हळवेपणा जास्त असावा ...

तो गेल्यावर वडील सांगत होते ...गावातील सुतारकाम करणारी ही मुलं ट्रॅक्टर  यंत्र शेती,मिक्सर ग्राईंडर आल्यामुळं   गावात काम कमी झाल्यानं शहरात गेली .काहीजण  कंपन्यात काम करत होती ,काही फर्निचर करणाऱ्यांकडं असिस्टंट म्हणून ...व्यसनं लागली ..गिरण्या बंद पडल्या ...लोखंडी ,पावडर कोटेड फर्निचर वाढलं ..ही पोरं परत गावी आली ....जुने कसब उरले नाही ...व्यसन सुटायचे नाही ...ना घर के ना घाटके अशी स्थिती झाली .....मी विषण्णपणे हसत म्हणाले "य़ांत्रिकीकरणाचे दुष्परिणाम असा साहित्यसंमेलनातील परिसंवादाचा विषय होऊ शकेल नाही !"


मी रवीबद्दल विसरूनच गेले ..दोनेक दिवसानी मी गावाला निघाले ...सामान घेऊन बाहेर पडत होते  तेवढ्यात अण्ण्याची पिंकी धावत रवी घेऊन आली ....आणि धापा टाकतच म्हणाली " आत्या ,आमच्या  बाबानं तुला हे द्यायला सांगितलंया ...!" काका पैसे द्यायला लागले तर म्हणाली " आमच्या बाबानं ह्याचे पैशे घिऊ नको म्हून सांगितलया मला !  "म्हणून माझ्या भाच्यांसोबत खेळायला ती पळाली .
आईकडच्या  रवीपेक्षा ही खूपच सुबक देखणी तरी दणकट होती ...तिला ड्रीलने भोक पाडून अडकवायचीही त्यानं सोय केली होती ..मी काकाना म्हटलं आज ताई(आई ) असायला हवी होती ...मस्त चिडवता आलं असतं ...भाऊही आश्चर्य व्यक्त करत म्हणाला " भारी आहेस घे बाई तू ...ह्या अण्ण्यानं एवढी झकास रवी ती सुद्धा एक पैसा न घेता कशी काय बनवली कुणास ठाऊक ?" मी म्हटलं ,"जाऊ दे रे ....त्याची काय अडचण असते ते आपल्याला काय कळणार ? त्यांच्या वाटचं धान्य कोणत्याही अपेक्षे शिवाय त्याना दिलं जाऊ दे एवढं मात्र मनापासून वाटतं !"

आजही रवीच्या निमित्तानं राहून राहून  अनेक प्रश्न मनात  उठतात .. वाटतं ..का बरं त्यानं बनवली रवी माझ्यासाठी ?लहानपणीचे जुने दिवस त्यालाही आठवले असतील का ? त्याच्या बाबाचे आणि माझे भावनिक नाते त्याला आठवले कि  माझ्या त्या वेळच्या काळजीच्या शब्दानी हेलावला ? काहीही असो या निमित्ताने क्षणभर का होईना मीही हळवी होते हे मात्र खरे ...

स्वाती ठकार ...04.02.2012....1.15

महात्मा गांधी नावाचा महामिष्किल म्हातारा ☺☺☺

       मला गांधीना बघायचा योग आला नाही .पण बालपणीचा काळ गांधी द्वेष आणि ऐकीव बातमीवर गांधी विरोधात  पांडित्य पोसण्यात गेला.घरी वडील पक्के गांधीवादी आणि आई पक्की हिंदुत्ववादी (गांधी द्वेष्टी ) .मी हुबळीला शिकत असताना गांधींविरोधात  शेखी मारत होते .आमच्या शिक्षकानी मला गांधी कसे होते हे गांधी सहवासातील व्यक्तिंकडून जाणून घे असे सांगितले आणि रेड्डी म्हणून एक वयस्क गृहस्थ होते.त्यांच्याकडे शनिवारी जायची ड्युटी लागली .
       राव काका म्हणून माणसाचा बंगला होता .तिथे राव ,रेड्डी आणि भट असे तीन म्हातारे गांधीजीनी लोकाना पाठवलेली आणि लोकानी गांधीजीना पाठवलेली पत्रं होती त्यांचं संकलन करून पुस्तक काढण्याच्या कामाला सुरवात केली होती .तेच हल्लीचे 100च्या वर गांधी खंड आहेत .मी बापडी गांधी समजून घ्यायला गेले होते .त्या तीनही म्हाताऱ्यानी गांधी कसे आहेत हे न सांगता पोत्यातली पत्रं माझ्यापुढं ओतली आणि  भाषावार सॉर्टिंग करायला सांगितलं .

   पत्रं वाचताना उमजत गेलेले गांधी आणि ऐकलेले तथाकथित बुद्धीवाद्यानी व्याख्यानातून उलगडून दाखवलेले गांधी यात जमीन अस्मानांचं अंतर होतं .मनाशी नवीनच संघर्ष सुरु झाला .पत्रातून दिसणारे गांधी तसेच या माणसानी वर्णन केलेले गांधी म्हणजे एक महामिष्किल म्हातारा .ज्याची विनोदबुद्धी अफलातून आहे .लहानमुलांच्याही पत्राला त्यानी फार सुंदर उत्तर दिले होते .

   रेड्डी काकानी सांगितलेले दोन किस्से अफलातून आहेत .ते स्वतः शाळकरी वयाचे असताना आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई  किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. 

एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने  शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये.  

वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल . 

असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ  राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रातीला येण्याची धमकी देऊन जात .असे होते गांधी .मी हल्ली गांधीविरोधातील लिखाण वाचून चिडत नाही .समर्थनार्थ युक्तीवादही करत नाही .कारण स्वतः गांधीजी जरी असते तरी त्यानीही बोळक्या दातातून मिष्किलपणे हसू सांडत म्हटलं असतं ,सचमुच मैं बहुत बुरा हूँ ...कुछ करना पडेगा ।
    स्वाती ठकार

सो स्वीट ना ...


“ मेघु ,आज संध्याकाळी शाळेतून येताना काळे काकुंच्या बागेतनं सोळा सोळा पत्री ,दुर्वा ,आघाडा  घेऊन ये .. हो आणि उद्या घरी ताईची मंगळागौर आहे.तिच्या सासरची मंडळी येतील संध्याकाळपर्यंत ..उद्या शाळेला येणार नाही म्हणून सांग पाटील मॅडमना ...संध्याकाळी हळदीकुंकवाला ही यायला सांग त्याना..काळे काकूना पण सांग ग ! ” वाळलेल्या कपड्यांचा भलामोठा गठ्ठा मेघनाच्या कॉटवर  आणून टाकत आई म्हणाली .

“ ए आई , हे सगळं ताईच्या खोलीत नेऊन टाक .आणि हो ..मी उद्या दांडी आजिबात मारणार नाही .उद्या गणिताची टेस्ट घेणार आहेत सर ....नवीन सर आहेत.. व्हेरी स्ट्रिक्ट  ..तुझं काय जातंय दांडी मार म्हणायला ! ” मेघना फणफणली.

तिला आईनं सांगितलेल्या कामातलं खरंतर एकही काम करायचं नव्हतं ....सगळे नुसते ताईच्या मागं मागं !..ही ताई पण पहिल्या पासून अशीच. कायम सगळं आयतं मिळवायची ..स्वार्थी आहे अगदी .स्वतःचं काही म्हणजे काही देणार  नाही.. मेकप बॉक्सला हातही लावू देत नाही ..स्वतःला करीना कपूर समजते .. मेघना मनात फणफणत होती .तसं तिचं आणि ताईचं कधीच जमलं नाही ..मोठ्या मानसीला छोटा भाऊ हवा होता पण झाली भांडकुदळ बहीण आणि मेघनाला मोठा दादा हवा होता पण आधीच ही बया आलेली ....त्यात वयात सात आठ वर्षाचं अंतर .कायम ताई मोठी म्हणून दादागिरी ...तरी बरं बाबा मेघुचे खूप लाड करायचे .मस्ती करायचे .तिच्याशी खेळायचे ..पण त्यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्टी असायची तेव्हाच .पेपरचे गठ्ठे तपासायला आले की ती ते रुममध्ये गुडुप व्हायचे .

फक्त एवढ्याच कारणासाठी तिला ताईचा राग येत नव्हता .ताईनं तिचा सगळा प्लॅन ओम् फस केला होता . तिच्या रागाचं मुख्य कारण हे होतं की काळे काकुंच्या हँडसम  अमितवर तिचं प्रेम असताना तिनं त्याला सोडून आडदांड काळुंद्ऱ्या जिजूशी लग्न केलं . कितीतरी वेळा त्यांच्या नोटसची देवाण घेवाण तिनंच केली होती .जिजूशी लग्न का केलं? तर म्हणे अमित कंपनीत साधा इंजिनीअर आहे आणि जिजू असिस्टंट मॅनेजर! हे काय कारण झालं ..अरे ,झाला असता ना अमितपण मोठा मॅनेजर ..हिला मुळी धीरच नाही .

पूअर अमित,इतका स्वीट चॅप ,  ताईच्या लग्नानंतर  गेला अमेरिकेला .तिथेच राहणार आहे असं काळे काकू म्हणत होत्या .त्यानाही त्याची खूप आठवण येत होती ..बिचारा एकुलता एक मुलगा इतका दूर गेला .सगळं ताईमुळं झालं .प्रेमभंग फार वाईट रे बाबा !
खरंतर मेघुलाच  लग्न करायचं होतं त्याच्याशी... पण ताईचं प्रेम होतं म्हणून तिनं इतका मोठा त्याग केला होता .खरंतर आताही ती त्याला प्रपोज करू शकत होती. पण तिला सज्ञान व्हायला अजून तीन चार  वर्ष तरी लागणार होती .आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली  हल्ली तिला नवीन आलेले गणिताचे संजू सर खूप आवडायला लागले  होते . कसले  हँडसम आहेत .. पण ...सो बोरींग.... सारखं ऋचाच्या हुशारीचं कौतुक करतात .

कालच स्पोर्टस् च्या तासाला  ते मेघुला उद्देशून हेडसराना म्हणाले होते ,” सर ही मुलगी रनिंगमध्ये एकदम छान आहे ..पण गणिताकडे आजिबात लक्ष देत नाही !” तेव्हाच मेघूनं ठरवलं आपले बाबा एवढे  मॅथ्सचे प्रोफेसर आणि आपण एवढे मठ्ठ ...आजिबात नाही ...आता मॅथ्स नंबर वन करायचं ...स्पोर्टस् मधे तर आहोतच ...मग काय !ऋचा आऊट… मेघू इन! मेघू, यू आर ग्रेट ! स्वतःची पाठ थोपटत ती गाणं गुणगुणत किचनमधे आली .बाबानी भुवया उंचावत खुणेनं विचारलं ,”आज काय स्पेशल !”
पण तिनं आपलं गुपित कुण्णालाच सांगायचं नाही असं ठरवलं होतं ...तेवढ्यात टेबलावरच काडवाती करत असलेली आज्जी खुद्कन हसली .मेघुनं जरा रागानंच तिच्याकडं पाहिलं ..
“ आज ताई येणार आहे ना ...प्रयोग वहीत आकृत्या काढून द्यायला ...मग काय आमचा गृहपाठ पूर्ण झालाच म्हणून समजा ! ”  ही आज्जी पण ना ...मेघू वैतागली पण लगेच तिनं  जीभ आपल्या दाताखाली ढकलत ,गाल फुगवत ,डोळे मिचकावले .
“अरेच्चा ,हे आपल्या कसं लक्षात आलं नाही !”
“ए आई ,मी शाळेतून आल्यावर कपड्यांच्या घड्या करते ..आणि हो येताना पत्रीही आणते हं हळदीकुंकवाचं अजून कुणाला सांगायचंय का ?नंतर  त्रास द्यायचा नाही.खूप अभ्यास आहे हं मला ! ”म्हणत आईनं करून ठेवलेला पोळी भाजीचा रोल तोंडात कोंबला .
“ अग सावकाश खा !”म्हणत  मागून आलेल्या आईचं काहीच ऐकून न घेता सायकल वर टांग मारली .

“ ही पोरगी म्हणजे एक तुफान आहे रे बाबा ! मी लिहून देते तुम्हाला ही एक ही काम धड करणार नाही !”
“नक्की करेल ”....बाबा
“बघाच तुम्ही .” .....आई
“अर्धवट नक्की करेल! तीनचार प्रकारच्या पत्री आणेल आणि एखादं आमंत्रण नक्की देईल ”… आजी  पदराआड खिदळत म्हणाली ...


----------------------------------------------------------------------------------------------------

“काय ग आणली का पत्री वगैरे ! ”सायकल दाणकन आपटून घरात शिरणाऱ्या मेघुच्या मागे मागे जात आईनं विचारलं ..
“तुझं तूच आण सगळं ..मी काही काम करणार नाही  तुझं !”म्हणतं ती ताडताड खोलीत निघून गेली आणि खोलीचं दार  धाडकन लावलं ...उशीत डोकं खुपसलं आणि मुसमुसू लागली ..तसंच कारण होतं ना ! तिला वर्गात  मोनूनं सांगितलं कि संजू सर फक्त दोन महिनेच शिकवणार आहेत .ते युपीएससी परिक्षेत पास झालेत ...त्यांचा साखरपुडा झालेला आहे . ते लग्न करूनच ट्रेनिंगला जाणार आहेत “ हेच करायचं होतं तर आले कशाला शिकवायला !”
“ काय म्हणतात तुझे संजू सर !” आजीनं विचारताच ..ती एकदम भडकली ,या आजीला ना काही म्हणजे काही सागितलं नाही पाहिजे .
“माझे कुठलं ...माझे म्हणे ...आणि हे बघ सारखं चिडवायचं नाही हं मला ...काही खास नाहीत एवढे ते ... हो आणि ते आता  जाणार आहेत बरं का ! काढून टाकणारेत त्याना दोन महिन्यात ..जोग सरच छान शिकवत होते ..तेच आम्हाला गणित शिकवणार आहेत ..”
तिन्हीसांज होता होता ताईच्या सासरचे सगळे आले .जिजू रात्री येणार होते ..घरात एकदम धमाल सुरू झाली .मेघूनं शहाण्यासारखं सगळं सामान नीट लावलं ..काळे काकूनी सदुकडून दूर्वा पत्री काढून ठेवली होती . सायकलला टांग मारून तिला फक्त घेऊन यायची होती .

सगळे खूप आनंदात होते... पण ते तिच्यापासून काहीतरी लपवत होते .स्वयंपाक घरात खूसखूस सुरू होती  ..ताईचे तर केवढे लाड सुरू होते ...

मेघुच्या खोलीत ताई आली तेव्हा मेघू आईनं केलेल्या कपड्यांच्या घड्या टेबलावर नीट रचत होती .ताई मेघू जवळ आली .आपल्या पर्समधलं नवं कोरं मेकअप कीट तिला काढून दिलं आणि म्हणाली ,” हे जिजूनं खास तुझ्यासाठी आणलंय दिल्लीहून! ” तिचा गालगुच्चा घेत ताई म्हणाली.
“ आता एकदम गुड गर्ल व्हायचं बरं का !तू मावशी होणारेस ..कळलं का बाई ! ”
मेघु बघतच राहिली ..आत्ता तिला कळालं ताई का फार्मात आहे ते !. अरेच्चा म्हणजे मी मावशी होणार तर  !..तिनं ताईच्या पोटाला अलगद हात लावला आणि दोघी  खुदु खुदु हसायला लागल्या .
“ ए ताई मी पटकन माझ्या सासरी जाऊन दुर्वा पत्री घेऊन  येते ” तिच्या कानाशी कुजबुजली तसा ताईनं नाटकीपणानं कपाळाला हात लावला  आणि हसायला लागली .

काळे काकुंकडे ओल्या नारळाच्या करंज्या खाऊन,छान गप्पा मारल्या .त्याना दारात छान रांगोळी काढून दिली.भांडी सेल्फवर लावून दिली .काकूनी प्रेमानं तिच्या गालावरून आपली बोटं फिरवून कपाळावर नेऊन कडाकडा मोडली .तशीही  मेघूच  ताईपेक्षा काकूंची लाडकी होती . त्याना हळदी कुकंवाचं सांगून फुलं  पत्री वगैरे सामान घेऊन ती आनंदानं घरी आली .आज काकू किती  खुश होत्या ..!अमित दिवाळीत महिनाभर सुट्टी काढून येणार होता ना !

रात्री ताईजवळ झोपलेल्या  मेघूच्या स्वप्नात  जिजू ,थोडं काळं थोडं गोरं गुबगुबीत बाळ ,आई ,बाबा ,सगळे आलटून पालटून येत होते ...हो आणि अमेरिकेहून तिला खास मागणी घालायला अमितही आला होता जीजूपेक्षाही छान छान गिफ्टस् घेऊन   ...
स्वप्नात ....

सो स्वीट ना !
स्वाती ठकार (दि.31-12-12 ...दुपार 12.45)