Saturday, January 19, 2013

जाड रवी

"स्वाती ,तुझ्याकडं ती जाड रवी आहे ती कुठून आणलीस ग?मलाही तशी हवीय  !खूप शोधली पण अशी मिळतच नाही ..डाळ मस्त  घोटली जाते तिनं " असे म्हणत डाळ घोटायला शेजारीण माझी जाड रवी घेऊन गेली .खरंच होतं ...त्या  रवीचा दांडा  जाडजूड असला तरी  ती अखंड होती आणि खालची घुसळण धारदार होती ..लोणी ही मस्त निघत असे .डाळ एकदम एकजीव घोटली जायची . शेजारीण निघून गेली ...मी मात्र रवीच्याच विचारात रमले .

अशीच एक रवी आईकडं होती ..माझ्या बाबानं (तुकाराम सुतारनं ) तिला जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी बनवून दिली होती...दरवेळी माहेरी जायची तेव्हा माझा डोळा त्या रवीवर असायचा ..आई काही दाद देत नसे वर जखमेवर मीठ चोळत म्हणायची ," तुकारामनंच करावी अशी रवी !तो होता तेव्हाच चार-पाच बनवून घ्यायला पाहिजे होत्या .."आईच्या माघारी भावजयीकडून ती रवी मागून आणणं प्रशस्त वाटत नव्हतं .


आई गेल्यावर वडिलांसोबत माहेरी गेले होते .तेव्हा त्याना मी म्हटलं ,"काका, मला अशीच रवी बनवून हवीय .आता बाबाच्यात कोण सुतारकाम करतय ?त्यानी घरी निरोप धाडला .त्याचा धाकटा मुलगा अण्ण्या (नाव अर्जून...माझ्याहून आठेक वर्षानं लहान ) आला ...डोळे दारू पिऊन तारवटलेले. याच अण्ण्याला मी लहानपणी कडेवर घेऊन फिरत असे ..मधे बराच काळ तो दिसला नव्हता ..मला बघितल्यावर  मला' नमस्कार अक्का!' म्हणत हात जोडले.


तेवढ्यात आमचा वाटेकरी(शेतातला शेतकरी ) ,भाऊ ,आणि अण्ण्याचं चांगलंच जुंपलं ...एकंदर  मतितार्थ हा कि हे सुतार माजलेत .धान्य न्यायला वेळेवर येतात .काही काम सांगितलं तर मात्र टाळमटाळ ...अण्ण्याचं म्हणणं असं कि सुतारकाम करणं फार अवघड झालंय ...परवडत नाही ...एवढं ऐकल्यावर मी रवीचा नादच सोडला ...

जाता जाता त्यानं काकाना त्याला बोलावण्याचं  कारण विचारलं ..
घरातली रवी त्याच्या हातात देत मीच उत्तर दिलं " बाबारे ,ताईला ही  रवी जशी बाबानं बनवून दिली होती ..अगदी तश्शीच मला हवी होती...राहू दे घे ...सुतारकाम महाग झालंय... तुला तुझ्या कामात कुठं वेळ असतो .....? "कसला राजबिंडा पोरगा होता आणि काय अवतार झाला होता ...मलाच गलबललं." काय अवतार करून घेतलायस रे अण्ण्या ?कसला साजरा होतास ...आणि काय ध्यान झालंय आता तुझं ! "मी किंचित त्राग्यानं म्हणाले  पण सूरात त्राग्यापेक्षा  हळवेपणा जास्त असावा ...

तो गेल्यावर वडील सांगत होते ...गावातील सुतारकाम करणारी ही मुलं ट्रॅक्टर  यंत्र शेती,मिक्सर ग्राईंडर आल्यामुळं   गावात काम कमी झाल्यानं शहरात गेली .काहीजण  कंपन्यात काम करत होती ,काही फर्निचर करणाऱ्यांकडं असिस्टंट म्हणून ...व्यसनं लागली ..गिरण्या बंद पडल्या ...लोखंडी ,पावडर कोटेड फर्निचर वाढलं ..ही पोरं परत गावी आली ....जुने कसब उरले नाही ...व्यसन सुटायचे नाही ...ना घर के ना घाटके अशी स्थिती झाली .....मी विषण्णपणे हसत म्हणाले "य़ांत्रिकीकरणाचे दुष्परिणाम असा साहित्यसंमेलनातील परिसंवादाचा विषय होऊ शकेल नाही !"


मी रवीबद्दल विसरूनच गेले ..दोनेक दिवसानी मी गावाला निघाले ...सामान घेऊन बाहेर पडत होते  तेवढ्यात अण्ण्याची पिंकी धावत रवी घेऊन आली ....आणि धापा टाकतच म्हणाली " आत्या ,आमच्या  बाबानं तुला हे द्यायला सांगितलंया ...!" काका पैसे द्यायला लागले तर म्हणाली " आमच्या बाबानं ह्याचे पैशे घिऊ नको म्हून सांगितलया मला !  "म्हणून माझ्या भाच्यांसोबत खेळायला ती पळाली .
आईकडच्या  रवीपेक्षा ही खूपच सुबक देखणी तरी दणकट होती ...तिला ड्रीलने भोक पाडून अडकवायचीही त्यानं सोय केली होती ..मी काकाना म्हटलं आज ताई(आई ) असायला हवी होती ...मस्त चिडवता आलं असतं ...भाऊही आश्चर्य व्यक्त करत म्हणाला " भारी आहेस घे बाई तू ...ह्या अण्ण्यानं एवढी झकास रवी ती सुद्धा एक पैसा न घेता कशी काय बनवली कुणास ठाऊक ?" मी म्हटलं ,"जाऊ दे रे ....त्याची काय अडचण असते ते आपल्याला काय कळणार ? त्यांच्या वाटचं धान्य कोणत्याही अपेक्षे शिवाय त्याना दिलं जाऊ दे एवढं मात्र मनापासून वाटतं !"

आजही रवीच्या निमित्तानं राहून राहून  अनेक प्रश्न मनात  उठतात .. वाटतं ..का बरं त्यानं बनवली रवी माझ्यासाठी ?लहानपणीचे जुने दिवस त्यालाही आठवले असतील का ? त्याच्या बाबाचे आणि माझे भावनिक नाते त्याला आठवले कि  माझ्या त्या वेळच्या काळजीच्या शब्दानी हेलावला ? काहीही असो या निमित्ताने क्षणभर का होईना मीही हळवी होते हे मात्र खरे ...

स्वाती ठकार ...04.02.2012....1.15

No comments:

Post a Comment