Friday, January 15, 2010

काकू, मी वेडी नाही ना हो !


काकू मी वेडी नाही ना हो !..ही अदिती मला वेडी म्हणते .....साडे तीन वर्षाची अनुष्का किंचाळत माझी साक्ष घेत होती .
"हो काकू ती वेडीच आहे..."अदिती खात्रीलायक बातमी पुरवत होती .
हा सगळा सीन चालू होता तिसर्या आणि चौथ्या मजल्याच्या जिन्यावर .तिथे फारशी वर्दळ नसते .कारण इमारत पाच मजली असल्याने लिफ्ट चा वापर होत असतो .मग या छोट्या मुली जिन्यावर भातुकली पासून सर्व खेळ मांडत असतात .आणि मी अधून मधून त्यांच्यात घुसत असते. त्यानाही आता माझी सवय झाली आहे .मग शाळेच्या गमती जमती, गाणी ,रुसवे फुगवे सारं त्या माझ्याशी शेअर करतात .
आजही बहुदा काहीतरी झालं असावं.
सांगा ना काकू ! मी वेडी आहे का हो ! अनुष्का अदितीच्या अगावर धावून जात म्हणाली .आता सूर त्राग्या ऐवजी रडवेला झाला.
मी तिला माझ्याकडे ओढून घेत म्हटलं," छे ...छे ..अनुष्का तर एकदम शहाणी आहे ." ती माझ्या कुशीत घुसून आता मुसमुसू लागली .
"अजि....बात नाही काकू !....ती अगदी वेडी आहे.असं टीचरच म्हणाली ....म्हणाली की नाही .मी खोटं बोलतेय ग अनुष्का !.. "अदिती गुरकावून म्हणाली .तिला अनुष्काचं असं माझ्या पोटाशी बिलगणं अजिबात आवडलं नव्हतं .ही लहान मुलं फार पझेसिव असतात .
मी हळूच खुण करून अदितीला विचारलं 'काय झालं? ' तिने दिलेला तपशील असा होता.त्यांच्या वर्गात त्यांना काही तोंडी प्रश्न विचारले होते .अनुष्काने दिलेली उत्तरे अशी होती .
स्वयंपाक कोण करतं?
आजी .
तुला जेवायला कोण भरवतं?
बाबा
तुझा अभ्यास कोण घेतं?
आजी .
अंघोळीला कोण घालतं? तुला नटवतं कोण ?
बाबा .
तुला खेळणी कपडे कोण आणतं?
आई .
तुला बागेत ,फिरायला कोण नेतं?
आई .
अदिती मधेच म्हणाली," काकू ,टीचर हिला करेक्ट उत्तर सांगत होती .पण ही ऐकतच नव्हती.म्हणते कशी बाबाच जेवण भरवतात आणि अंघोळीला घालतात .टीचर राईट असते न काकू ! ही टीचरचं ऐकतच नव्हती ..आहे की नाही काकू ही वेडी !"
खरं तर अनुष्काने बरोबर उत्तरे दिली होती .तिची आई सकाळी लवकर कामावर जायची आणि तिला यायला उशीर व्हायचा .बाबा उशिरा जायचा आणि लवकर यायचा .त्यामुळे छोट्या अनुष्काकडे आई पेक्षा आजी आणि बाबा जास्त लक्ष द्यायचे .तिची आई ती कसर तिच्या सुट्टीच्या दिवशी तिला बागेत नेवून,तिचे भरपूर लाड करून भरून काढायची .
"अहो काकू,असं वेड्यासारखा उत्तर देतात का पण ! " अदितीच्या दातातून तिचा मुद्दा काही सुटत नव्हता .
अनुष्का मला म्हणाली ,"काकू, आजी सांगते ,खोटं बोललं की देव पाप देतो .खोटं बोलायचं नसतं ना !"
मी टीचर चूक की आजी आजी चूक की अनुष्का चूक हे उत्तर देण्याच्या फंदात न पडता .अनुष्का खरं बोलल्यामुळे तिला पाप लागणार नाही ! असा पलायनवादी सूर काढून वातावरण शांत केलं. थोड्याच वेळात त्यांचा वाद मिटला आणि त्या छान खेळू लागल्या .माझ्या डोक्यात मात्र प्रश्नांचे मोहोळ उठले .स्त्री कामासाठी बाहेर पडू लागली .तिच्या कामाच्या स्वरुपात कालानुरूप बदल होत चालले आहेत तरी समाजाची मानसिकता का बदलत नाही ? शिक्षण व्यवस्थेत बदल का होत नाहीत ?अनुष्काने दिलेले उत्तरही बरोबर असू शकते हे कधी व्यवस्था स्वीकारणार ?..... मंडळी तुम्हाला काय वाटते ?...स्वाती ठकार

No comments:

Post a Comment