Thursday, February 14, 2013

त्या दोघी

मानवी स्वभावाचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे.शालेय जीवनात ,महाविद्यालयीन काळात ,नंतर नोकरीच्या निमित्ताने ,नंतरच्या साहित्यिक प्रवासात अनेक माणसे पाहिली.माझ्या सुदैवाने बालपण खडकलाट सारख्या खेड्यात गेल्यामुळे  लहानपणापासूनचा प्रवास आगाऊ,भोचक असा विशेषणानी बहरून गेल्यामुळे माणसाना जवळून अनुभवता आले.
आज ज्या दोघींबद्दल मी सांगत  आहे त्या दोन्ही कथा नायिका मला मानवी नाते संबंधांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवतात.मी तेव्हा ठाण्याला विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनात काम करत होते .कुर्ल्याला एस .टी क्वार्टर्स मधे राहात होतो .नुकतीच राहायला गेले होते..लोकलचे टाइम टेबल ,लोकल प्रवास याचे गणित जुळवत प्रवास सुरु होता.  कुर्ल्याहून ठाण्याला जाताना  विशेष गर्दी नसे .. माझ्यासोबतच गाडीत चिक्कुवाल्या ,टिकली कानातली विकणाऱ्या ,चिलीमिली वाल्याही चढत .सीट रिकामी असल्याने बऱ्याचदा या बायांशी ठाणे येईपर्यंत मनसोक्त गप्पाही होत .अशाच बायांपैकी एक सुनंदा ...30-35 वर्षाची असावी ..पण रापलेली काया काळा कुळकुळीत अवाढव्य सुटलेला  देह यामुळे जास्तच वय जाणवत होते .टिकल्या विकायची ...आमच्या गाडीने कल्याण पर्यंत जायची ...तिच्याशी खूपच गप्पा व्हायच्या .
एक दिवस  अशीच पावसाळ्याची गाडी  लेट धावत होती .सुनंदा एका तिच्याच वयाच्या काळ्याकुळकुळीत माणसाबरोबर आणि एका अठरा वीस वर्षाच्या काळ्या चुणचुणीत मुलीबरोबर एकाच वेळी भांडत होती. .ती मुलगी आणि तो माणूस कन्नडमधे बोलत होते आणि सुनंदा त्या माणसाशी कन्नड हेलवाल्या मराठीत बोलत होती. तो माणूस त्या मुलीला' तू सोबत घेऊन जा !'असे सुनंदाला सांगत होता ..ती त्याला 'तू हिला घेऊन घरी जा !'असे सांगत होती ...या वादात ती मुलगी रडकुंडीला आली होती ..गाडी आल्यावर त्या माणसाने मुलीला गाडीत चढवले हिने गाडी सुटता सुटता तिला खाली ढकलले...ती पोरगी फलाटावर धडपडून पडली.मला सुनंदाचा खुपच राग आला .  
"काय ग कळतं की नाही तुला !किती जोरात पडली ती पोरगी ?" मी जोरात ओरडले.
"मरू दे कुत्रीला ...!"टिकल्यांचा डबा माझ्या शेजारी आदळत ती म्हणाली
"कोण ग ती ...तुझी मुलगी ....?आणि तो माणूस कोण?"
"माज्या पोरीना ढकलीन व्हय मी ...?ती रांड माझी सवत आणि तो भडवा माझा नवरा ...!" आता माझ्यातील लेखिका पुढे पुढे सरसावली अणि माझ्या शेजारच्या बायका बिचकून मागे मागे गेल्या ...या सगळ्या शब्दांचीही सवय असावी लागते ना...!पहिलं तिला शांत केलं...आणि मग ठाणे येईपर्यंत पदरात तपशील पडला तो असा ...ती मुलगी त्या माणसाच्या बहिणीची मुलगी ....लहानपणीच( नवव्या वर्षीच ) तिचं या मामाशी आई आणि आजीनी लग्न लावून दिलं ....तिच्याशी त्यानं लग्न तर केलं.. पण जिला कडेवर घेऊन फिरला होता त्या भाचीशी  संसार करायचा टाळून कामाच्या निमित्ताने (बांधकामावर सेंटरिंग कामगार) मुंबईला आला .. 
सुनंदाशी सूत जमले लग्नही झाले ...दोन पोरी झाल्या ...छान संसार सूरु असतानाच ही पोरगी वयात आल्यावर माय लेकीनी ( आई सासू बहिण ....कोणतंही नातं जोडा )बालिका  बधूला याच्याकडे आणून सोडली ...'नांदव नाहीतर ढकलून दे गाडीखाली !'म्हणून बारकीला सोडून  गावी उस्मानाबाद कडे निघून गेल्या..नात्यानं तिचा मामाच होता ...बिचारा गाडीखाली कसा ढकलणार !...तीही रुळली इथं हिच्या पोरीना सांभाळू लागली ..संध्याकाळचा स्वयंपाक करू लागली ...तशी नित्य नेमे रोज रात्री या मुद्द्यावर भांडणं होतच होती .... याची बांधकामाची कामं बंद झाली होती ..त्यामुळे मी मुलीना संभाळतो ...वस्ती चांगली नाही ...ही तरूण पोरगी तू तुझ्या सोबत घेऊन जा  म्हणून  दोघींचा नवरा सुनंदाला गळ घालत होता ....
नेहमीच्या मिल्स ऐंड बून्स ,बार्बारा कार्टलैंड ,खांडेकर,फडके अगदीच  रोमांटिक  म्हणून चुंबन ,गाल आरक्त होणाऱ्या काकोडकर साहित्य वाचणाऱ्या मला सगळ्याची गम्मत वाटत होती ..एक दिवस अगदी उलट चित्र होते .नवरा बारकीला घराकडे ओढून नेत होता ...आणि ही मात्र तिला आपल्या सोबत खेचून आणत होती . 
गाडीत शिरल्या शिरल्या मी प्रश्न केला ..."का ग आधी तर हिला हाकलत होतीस  मग आजच कशाला एवढं प्रेम उतू चाललय ?" प्रेम ... डोंबल माझं...मुडदा उचलला हिचा ...म्हणून दाणकन तिच्या पाठीत एक दणका दिला ..तिनंही तिच्या झिंज्या ओढल्या ...मधल्या लेडिज डब्याला जोडूनच जेंटस् डबा असतो ...लोक ओरडायला लागले ..या  समोरासमोरच्या जागी बसल्या .घाटकोपर ते विक्रोळी नुसऱ्या एक मेकीकडे खाऊ की गिळू असे बघत होत्या ...मी कन्नड मधे बारकीला काय झालं म्हणून विचारलं ....
बरंच काही झालं होतं ..त्यालाही काम नव्हतं म्हणून तो घरी राहायचा ...हिनेही तिला सोबत ठेवले नसल्याने तीही घरी ......!वासना ही अतितीव्र शक्ती असते ...नाते बंधन सर्व भावभावनाना  दूर सारून ती पुढे सरसावते .बारकीला दोन महिने झाले होते ...ही ठाण्याला नेऊन तिचा गर्भपात करणार होती ....ठाण्यात उतरताच मागच्या डब्यातल्या  मामाबरोबर भाची पळाली....आता मात्र मला या कुटुंबा बद्दल विलक्षण कुतुहल वाटू लागले ..
बारकीला मुलगा झाला ...हिच्या पोरीना भाऊ मिळाला ...बारकी घरी तीन पोरं संभाळू लागली ...ही देखील 'अजून होऊन होऊन काय वाईट होणार!' म्हणत रेल्वेत टिकल्या विकत धंदा करत होती .....तो पोरगा सहा महिन्याचा झाला ...सुट्टीत हिच्या पोरी तो पोरगा ...टिकल्या विकणारी ही आणि चिक्कु घेऊन बारकी असे अख्खे कुटुंब आमच्या गाडीला असे ...पोरी भावाला संभाळत ...जेव्हा पोरींची शाळा असे तेव्हा  सुनंदा बारकीचे पोर सांभाळत टिकल्या विकत असे ..कारण तिला पोर आणि चिक्कुची टोपली दोन्ही घेणे जमत नव्हते. कधी कधी दोघी धंदा करायच्या आणि ठाण्यापर्यंत ते काळेकुळकुळीत ,गुबगुबीत ,चुणचुणीत पोर माझ्या मांडीत ऐसपैस पसरायचे ....आजही गोपाळकृष्ण म्हटले की ते पोर दिसते ...डोक्याला झालरीची  कुंची ,झबले ,काळाकुळकुळीत तीट गालावर कपाळावर हनुवटीवर ....येता जाता दोघी त्याच्या गालाला हात लाऊन आल्याबल्या  करत राहायच्या ...बऱ्याचदा कुर्ल्याला चढल्या चढल्या सुनंदाच्या ऐसपैस मांडीत ते पोर निवांत निजायचे ..मग चिक्कु आणि टिकल्या दोन्ही बारकीच विकायची ...एकदा तर दोघी मिळून तिसऱ्या चिक्कुवालीशी भांडत होत्या

तो पोरगा दोन वर्षाचा असताना पाचव्या मजल्यावरून पडून नवरा मेला .....आठ दिवसात दुःख विसरून सुनंदा कामावर यायला लागली ..आता बारकी ( मोठ्या होत चाललेल्या )हिच्या पोरी आणि आपला मुलगा सांभाळण्या साठी घरी राहू लागली ..दरम्यान तिचे आईवडील आणि आजी गावी तिला न्यायला आले पण दोन सवतीनी दंगा करून प्लान उधळला ...सुनंदाची  वयात आलेली पोरगी सोबत देऊन त्याना गावी पाठवून दिलं
नंतर मीही पुण्याला शिफ्ट झाले ...पण आजही जेव्हा मी या दोघींचा विचार करते तेव्हा अनेक प्रश्न मनात घोंगावतात .रक्ताचे नाते श्रेष्ठ की मानलेले .... दोन बायका इतक्या विभिन्न भाव भावनानी कशा काय जोडल्या जातात .....शेवटी नाती वगैरे यापेक्षा नर आणि मादी हेच नाते खरे की काय .......?एक मात्रं झालं चांगलं -वाईट,काळं-गोरं,दुष्ट -सूष्ट असं काहीच स्थायी  नसतं   एवढं मात्र पटलं ...आज कदाचित त्यांच्या पोरींची लग्न झाली असतील ...पोरगाही कुठेतरी कामाला चिकटला असेल ...आणि या दोघी ....टिकली, चिक्कु ची टोपली फिरवत गाडीत फिरत...असतील ...कधीतरी त्या गाडीला जाऊन  त्या दोघी भेटतात का हे पाहावं वाटतय !☺☺☺
स्वाती ठकार

No comments:

Post a Comment