Friday, November 20, 2020

ये मोह मोह के धागे.

 ये मोह मोह के धागे.(दीर्घकथा) 

                                      1

        “ चल भाग पनौती , अरे ए लक्ष्मी ,उठा इस कंम्बख्त को... फेक दे नाले में ... हरामी ठेकेदार की मरी औलाद !... मार उसके मूँ पर इस्को और दफा कर .. .कहाँ मर गई रे कलमुही तूभी ! ” खाडकन  पायाच्या बाजूला  वीट येऊन पडली. पत्र्याच्या झोपडीबाहेर जीव मुठीत घेऊन धावत सुटली जोरात ....जेमतेम पाच वर्षाचा जीव किती धावणार ? तरी बरं वीट फेकणारा हैवान पाय मोडून अंथरुणावर पडला होता......


 खडबडून जागी झाले. अंग घामानं चिंब भिजलंय . बाहेर टॉवरच्या लंबकाचे  तीन टोले पडतायत. खिडकीच्या जाळीतून  हवा येतेय. अनेक डोंगरी झाडांच्या सुगंधात मिसळून गंगा हॉस्टेलबाहेरच्या रातराणीचा मंद सुगंध रूमभर भरला आहे.  लाल बहादुर शास्त्री आयएएस अकादमी ट्रेनिंग सेंटरचा परिसर अगदी शांत ,निशब्द आहे .बाहेर वाऱ्यानं हलणारी पानं आणि खोलीत सिलिंगला गर गर करत फिरणारा  पंखा याचाच काय तो आवाज. खरंतर गरज नाहीय पंख्याची. अशीही मसुरीची हवा कायम थंडगार. 

            का लावते बरं मी हा पंखा? नंदूच्या खर्जातल्या आवाजाचा भास होतो म्हणून? नंदू बाजुलाच आहे वाटावं म्हणून? शांत झोप लागावी म्हणून लावते खरंतर मी. पण छे ! कसलं भयानक स्वप्न हे! खडतर काळात, नंदू सोबत असताना, जमिनीवरही  मुडद्यासारखी झोप लागायची. आता सुखाचे दिवस आले असताना इतक्या अलिशान बेडवर झोप उडावी ? आता का पडतं बरं हे स्वप्न? सुखात का बरं असं हे दळभद्री दुखणं? का जुने दिवस पिच्छा सोडत नाहीत माझा?

          बाजुच्या बेडवर ऑफिसर ट्रेनी रती सिन्हा गाढ झोपलीय.टेबललँप लावावा?

         “ ज्योती ,यार ,इट इज मिडनाईट ... स्वीच ऑफ द लाईट ...स्लीप बेबी ! “ रती डोळे न उघडताच कुरकुरली. दिवा बंद करून मी पडलेय बेडवर खरी .पण झोप यायला हवी ना !  


                                            2


            परमेश्वरा!, माझ्यावर पनौती म्हणून  किंचाळणारा मी पाच  वर्षाची असतानाच मेला .लक्ष्मी नावाची कलमुँही सात आठ वर्षाची असतानाच मेली. नंदूची औलाद म्हणून मला झिडकारणाऱ्या कसायाला  पक्कं ठाऊक होतं मी त्याचीच मुलगी होते.. तरी छळावं मला? मी आईच्या पोटात पाच महिन्याची असताना बापाला  ठेकेदार नंदू भेटला..पनवेल कर्जत रेल्वे ट्रॅकवर स्लीपर टाकायच्या कामावर ठेकेदार होता.  आई बाप तिथंच राबत होते. बापाचा पाय धड असेपर्यंत सलाम साब ,ठेकेदार साब, असलेला नंदू, बापाच्या पायावर सिमेंटचा स्लीपर पडून पाय मोडल्यावर त्याच्या दृष्टीनं एकदम हरामी झाला..पाय मोडायला ही कारण बापाचीच मस्ती होती. कामावर येऊ नको म्हटलं तरी दारू पिऊन आला .तरी त्या हरामीनंच त्याच्या बायकोला शोधून अतिरिक्त कामं दिली. ह्या कसायाचं औषध पाणीही त्यानंच बघितलं. जायचं होतं परत त्या यूपी कि बिहारमधल्या आपल्या गावी ! देवाचीच कृपा म्हणून नंदूनं सोबत आणलं मला . हे जगणं ,ही भाषा ,हे नाव ,हे अस्तित्व त्याच्यामुळंच तर मला मिळालं .नाहीतर कुठतरी मनाविरुद्ध दहा जणांची रखेल होऊन नाहीतर कुणा एका दारुड्याच्या चार पोरांची आई होऊन राबत बसले असते .

             नंदूला आता कुठं शोधू मी  ... ? देवा, एकदा तरी मी किती मोठी  झाले हे बघू दे त्याला .त्याची माझी गाठभेट घालून दे रे ! त्याच्या स्वप्नातही नसेल की ही आपली झिप्री ज्योती कलेक्टर होईल म्हणून. माझी स्वप्न त्याच्यासोबतच बदलत गेली .सुरवातीला आजुबाजुच्या पोरी बघून गणवेश घालून शाळेत जायचं एवढंच स्वप्न ...नंतरचं दहावी व्हायचं स्वप्न त्याच्या सोबत पुरं झालं . पण गणवेश न घालता पहिली ,चौथी सातवी आणि दहावीची थेट परीक्षा देऊऩ ..दहावीला 61 टक्के मार्क पडले तेव्हा आपलाच विश्वास बसला नव्हता. जेमतेम बारावी फेल झालेला नंदू होईल तितकं शिकवायचा. राहिलेलं याच्या त्याच्या पाया पडून शिकलेलं. कष्ट मरणाचे केले.अपमान अवहेलना सहन करताना नंदूच्या डोळ्यातलं कौतुक आणि त्यानं न बोलता दाखवलेला विश्वास इथवर घेऊन आला खरा.

        दहावीच्या परीक्षेआधी समाधान मेसमधे पोळ्या लाटणं,परीक्षेदरम्यान सुटी काढल्याचा राग आणि मेसच्या मामीचं फाडफाड बोलणं आजही आठवतं.आता काहीच वाटत नाही पण तेव्हा...

“ गरीबाना फुकटचा माजच जास्त .काम पाहिजे पण जबाबदारी नको. शिकून फार मोठ्या  कलेक्टर होणार आहेत या. तुम्ही असली हलकी कामं करू नका मॅडम !” कलेक्टर व्हायचं स्वप्नातही नव्हतं तेव्हा .पण बघा, कलेक्टर झाले हो मामी ! परमेश्वर पाठीशी असला कि शाप सुद्धा वरदान होतो. तेव्हा डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. रोज पन्नास पोळ्या लाटायचे शंभर रुपये देत होती मामी .तेही हप्त्यानं .तरी आधार होता त्याचा. रोज तिथनंच पगारातून पैसे वळते करत पाच पोळ्या आणि भाजी  घेऊन येत होते दोघांसाठी. तुझं वाढीचं वय आहे म्हणत मला तीन पोळ्या  ठेवायचा, तो दोन खायचा. त्या दिवशी रडवेला चेहरा पाहून म्हणाला , 

‘ज्योती,हे सगळं ऐकावं लागंल ग. पचवावं लागंल  तुला. मास्तरीण व्हायचं असंल तर खूप राबावं लागंल ! हे सगळं कापडं झटकल्यागत झटकाय लागल .मी लिहून देतो तू मोठी मास्तरीण होशील आणि  हीच लोकं सलाम ठोकतील .ते नाही ठोकले तर मी तर ठोकनारच ! ’ 


                                   3

               दहावी झाल्यावर अथर्व हॉलच्या देशपांडेंकडे मला सोडून ,काळजावर दगड ठेवून नंदू कॉन्ट्रॅक्टर सोबत ओरिसाला गेला.सुरवातीला मला वाटलं साईटवरच्या ललिता बरोबरच चक्कर असावं त्याचं .माझीही काही हरकत नव्हती. राहिली असती ती आई म्हणून माझी .पण तसं काहीच झालं नाही .मी एकदोनदा विचारलंही पण त्यानं उत्तर टाळलं. तो गेला तरी  ललिता पहिल्याच साईटवर होती. 

            मला सोडून जाताना एवढंच म्हणाला , “ ज्योती .तुझा माझा येवढाच शेर होता. जमलं तसं वाढवलं तुला .आता तुझी वाट तुच शोध बाई! खूप मोठी हो. लग्न कर,संसार कर .म्हातारपणी नशीबात असलं तर यीन तुझी पोरं सांभाळायला !” सांगून निघून गेला. कसं व्हायचं आपलं याच्याशिवाय? या भितीनं पोटात गोळा आला होता तेव्हा.मास्तरीण व्हायचं .एक खोली घ्यायची भाड्यानं आणि जिथं असेल तिथनं नंदूला माघारी बोलवून सांगायचं ,“ खूप राबलास नंदू .आता आराम कर!” एवढंच डोळ्यासमोर होतं.


            तेव्हा  जरी मास्तरीण हेच स्वप्न डोळ्यापुढं होतं तरी नंतर बी.ए. करताना नेट सेट करून अजून मोठं व्हायचं. नंदूकडनं  अजून जोरदार सलाम ठोकून घ्यायचं पक्कं केलं. जाताना नंदूनं माझा सगळा संघर्ष काकाना सांगितला होता. वर “ही शिकती तेवढं हिला शिकवा दादा!” असं सांगून गेला होता. त्यामुळं नंदूइतकंच देशपांडेकाकानी माझ्या शिक्षणाकडं जातीनं लक्ष दिलं. 


             तिथंच ६३ टक्के मिळवून बारावी झाली .अंथरुणावरच्या त्यांच्या आईची सगळी सेवा मन लावून केल्यानंच आज हे दिवस दिसतायत. एस वाय बीए ला आजी गेली. आता देशपांडे काकूंना माझी गरज नव्हती. पुन्हा जाच सुरू झाला. त्याना पोराकडं मुंबईला जायचं होतं .माझी जबाबदारी नको होती. समोरच्या गल्लीतल्या सोसायटीत कोण कुठली सून होती कोण जाणे!  त्या सुनेनं सासूचा डोक्यात पाटा घालून खून केला एवढं कारण पुरलं काकूना. रोज नवे टोमणे ,नवा अपमान.

            

          दररोज मीही घरात खाणारी आहे हे विसरून जायच्या .घरात दोनंच माणसं आहेत हे गृहित धरून पाचच पोळ्या करायला सांगायच्या. मी एक दोन जास्त करून माझं पोट भरत असे तेही बघवत नव्हतं. पोळीचा एक एक घास गिळताना नको नको व्हायचं. आज हवं तेवढं अन्न खायला मिळतं पण तेव्हासारखी भूकच लागत नाही! 

        काकुंची सुरू झाली काकांच्या मागं भुणभुण. काकाना सगळं दिसायचं. काही न बोलता वरच्या हॉलच्या सफाईच्या वेळी वडापाव,भेळ वर आणून देत. फारसं मी काकूंच्या समोर नकोच म्हणून वर हॉलच्या आफिसमधे माझी अभ्यासाची सोय केली. पण दिवसेंदिवस कुरबुर वाढल्यावर  देशपांडे काकानी व्हिजन फाउंडेशनच्या शहा सरांकडे शब्द टाकला .तिथं महिना तीन हजार पगारावर सकाळी दहा ते सहा ऑफिस आणि लायब्ररीचं काम मिळालं. सुटका झाली.


                                             4

            रविवारची सुटीही नको वाटायची. घरातलं सगळं करून काकांच्या जुन्या जेंटस सायकलवरनं तिथं जात होते . साइटवरची छोटीमोठी कामं, धुणं भांडी ,पोळ्या लाटणं, हागणं मुतणं काढणं यामानानं हे मोठं प्रमोशनच होतं. टी.वाय बी.ए करताना तिथल्या लायब्ररीत बसूनच एम.ए.करून नेटसेट करायचा कीडा डोक्यात शिरला. आता काका काकू मुंबईला गेले होते . खालच्या चार खोल्या भाड्यानं दिल्या .वरचा हॉल अधे मधे आल्यावर रहायसाठी ठेवला. तिथं माझ्यासाठी गॅस, भांडी स्वैपाकासाठी काकानी ठेवली .उपकारच त्यांचे .पण झोपायला मात्र आऊट हाऊस मधेच जायचं ही तंबी होती काकुंची. वरची झाडलोट आणि बागेची देखरेख करायची अतिरिक्त जबाबदारी वाढली. काय काय घडत होतं सगळं मी नंदूला नियमित फोनवर सांगत होते. आता हातात पगार येत होता. तीन हजाराचा पाच हजार ,पाच हजाराचा सात हजार शेवटी शेवटी दहा हजार झाला .मी अंग मोडून काम करत होते .नवं नवं शिकून घेत होते. शहासर आपलेपणानं सगळं सांगत होते. आता पगारातून महिना दोनेक हजार बचतही होत होती. दरवेळी फोन केल्यावर नंदू म्हणायचा ,

      ‘ ज्योती थकलो ग ..आता पुर्वीसारखं काम होत नाही.  पण तुझा फोन आला कि बरं वाटतंय .परत जोर लावून काम करावं वाटतंय ग! 

       ‘थोडे पैसे पाठवू का?’ मी विचारल्यावर खदखदून हसायचा ‘ नको ग बाई !’ म्हणायचा .त्यावर माझं उत्तर ठरलेलं. “दोन वर्ष जरा दम धर .मी कामाला लागले की भाड्यानं घर घेऊ. मग तू आराम कर!”

      65 टक्के मार्क मिळाले बीएला हे सांगायला फोन केला तेव्हा शेवटचं बोलणं झालं. खरखर,डिस्टर्बन्समधे झालं तेवढंच बोलणं .नंतर फोनही बंद आणि काही बातमीच नाही.पत्ता नाही. काही नाही जवळ माझ्या. कुठ शोधणार त्याला मी ? तीन वर्षाची असताना खांद्यावर बसवून घेऊन साईट फिरवून आणायचा. तेव्हा जग फिरल्याचा आनंद व्हायचा . आता त्याला घेऊन जग फिरणं शक्य असताना सोबत तो नाही. 


           कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी नंदू आठवला कि गळा दाटून येतो.कोण होता तो माझा ? कुणीही नाही तरी आज माझ्या सगळ्या सर्टिफिकिटस वर बापाच्या जागी तोच आहे. हा जन्मच मुळी त्याच्यामुळेच आहे. ज्योती नंदकुमार हे नावही त्यानंच दिलेलं. तो मराठी ,त्याला आडनाव होतं .पण रेल्वेच्या मद्रासी अकाउंटंटनं मस्टरवर गाळलं .नंतर नंदूनही टाकून दिलं.

          ज्योती नंदकुमार हे छान नाव आहे ना! जात,प्रांत, धर्म काहीच कळत नाही .जन्म पनवेलच्या कुठल्या झोपडपट्टीतला कि दवाखान्यातला माहित नाही. तीन पोरींनंतरची चौथी नकुशी पोरगी. आधीच्या तिघी गावी पाठवल्या होत्या बापानं. त्याच्या आईवडिलांकडं. नंतर बाप मेल्यावर सगळी पोरं आली परत आईसोबत कामं करायला .माझं  बर्थ  सर्टिफिकिट कामोठ्याच्या पंचायत ऑफिसचं. तेही  बाप बदलून घेतलेलं  एवढंच माहित . शाळेत जायचा माझा हट्ट होता त्याच्या जवळ . त्यानं पंचायतीला पैसा चारून सर्टिफिकेट मिळवलं. पहिली पनवेलच्या सरकारी शाळेत, शाळेनं दिलेला गणवेश घालून अर्धी शाळा  झाली आणि नंदू सावंतवाडीला नवीन कामावर निघाला .मी पण येणार बरोबर म्हणून मी रडून गोंधळ घातला. नवऱ्याविना कसंबसं चार पोरी वाढवणारी आई जेरीला आली होती.तिनं नंदूला गळ घातली .

             “ घेऊन जा तुझ्याबरोबर. अनाथआश्रमात टाक. नाहीतर विक आणि पैसा कर.”

             त्यालाही माझा लळा लागला होता.सोबत घेऊन आला .अनाथाश्रमात टाकलं नाही कि विकून पैसाही केला नाही.स्वतःच्या घासातले दोन  घास देऊन जगवलं . सोबत घेऊन चार महिन्यासाठी ,कधी वर्षासाठी ,कधी दोन महिन्यासाठी कर्नाटक ,महाराष्ट्र, गोवा कोकणपट्टी फिरला. जमेल तसं शिकवलं. फक्त नावच दिलं नाही तर जगाचे अत्याचार, वेदना सोसायची ताकत दिली. नवी उमेद त्यानं दिली. किती आणि काय दिलं हे सांगताही येणार नाही. कुठल्याही अकादमीत शिकवलं जाणार नाही असे जगण्याच्या तत्वज्ञानाचे अनेक छोटे छोटे मंत्र दिले त्यानं. 

                                    5


           मोबाईल ड्रेसिंग टेबलवर होता. बापरे, गोविंदचे तीन मेसेजेस ! गोविंद आंध्राचा .त्याचा रँक 57 आणि माझा 89. अकादमीत आत काय हालहवाल विचारत होता. एक सप्टेबरला ट्रेनिंग सुरू होणार तर हा एकतीस ऑगस्टला खूप उशीरा उगवला. अकादमी बाहेरच्या सिल्वरउडस् मधे पाठवला त्याला .आतमधे लवकर आलेले आम्ही सगळे गंगा ,नर्मदा ,कावेरीत आरामात होतो. मेस जवळ होती आणि आतल्या सगळ्या गोष्टी कानगोष्टीतून कळायच्या. गोविंदच काय आम्ही सगळे कलेक्टर झाल्याच्या ऐटीत उडत आलो होतो. कारण सिलेक्शन झाल्यावर केवढे सत्कार झाले आमचे. युनिवर्सिटी ,टीवी चॅनेल्स,वृत्तपत्रं किती नि काय ! आम्हा हवेतल्याना  अकादमीनं लगेचच जमिनीवर आणलं.दरवर्षीचं त्यांचं हेच  रुटीन.त्याना कसलं आलंय अप्रूप ! 

        काही असो इथलं जगणं खडतर असलं तरी भन्नाट आहे.तरीही माझ्या आज पर्यंतच्या  जगण्याच्या मानानं काहीच नाही...... देशपांडे काका गेले मुंबईला. तिथून दूसऱ्या लेकाकडं अमेरिकेला. पुन्हा मुंबईला आले .काकुना संधीवात सुरू झाल्याचं कळालं .मधे मी  प्रिलीमची तयारी करत असताना काका आठ दिवस येऊन भाडेकरू बदलून गेले. स्पर्धा परीक्षा देतेय म्हटल्यावर कसले खुश झाले होते. 

         त्याआधी एम.ए चा एक्स्टर्नल फॉर्म तर भरला. पण त्या ऐवजी लायब्ररी कामात दोन तासाची सवलत देऊन शहा सरानीच युपीएससीचं खुळ भरलं डोक्यात. एक्सलन्स  काँपिटेटिव क्लासेसना  पाठवलं . लायब्ररीतली पुस्तकं वाचण्याचा माझा झपाटा, टिप्पणं काढायची ,नोटस तयार करायची स्वतःची पद्धत, ऑफिसमधल्या कामाचं नियोजन  बघून ही दिशा सुचवली. क्लासचे पैसे  शहासरानीच भरले .हा गॅलेक्सीचा स्मार्ट फोनही त्यानीच दिला. पहिल्या वेळी प्रिलिम मधेच गचकले .एम.ए.चं पहिलं वर्ष कसंबसं पदरात पडलं पंचावन्न टक्के मिळवून .पण सरानी धीर दिला.एका फटक्यात या स्पर्धा परीक्षा क्लिअर होत नाहीत म्हणाले.

         मलाही लगेच अंदाज आला कसा अभ्यास असायला हवा याचा. रात्रीच्या झोपेचे एक दोन तास कमी झाले. ऑफिसच्या कामातही वेग आणून एक दोन तास अभ्यासाला देऊ लागले. त्यातच हिंदी ,इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. वरच्या हॉलमधे मोठमोठ्यानं इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस सुरू झाली . दूसऱ्याचवेळी  प्रिलिम ,मेन्स पार पडले. शहासरांच्या पाया पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एम.ए.ही 68 टक्के मिळवून पास झाले. सर कौतुक करताना थकत नव्हते .मलाही नवं बळ येत होतं .आता इंटरव्यूची अतिरिक्त तयारी सर  करून घेऊ लागले .

         नंतर कधीतरी बोलताना कळालं हे त्यांचं अपुरं स्वप्न त्यानी त्यांच्या मुला मुलीत पाहिलं होतं .पण ते माझ्यासारख्या भणंग ,कंगाल मुलीनं पूर्ण केलं. त्यानी ऑफिसला चहा ,बटाटावड्याची पार्टी दिली. माझा सत्कार करून निरोप दिला. एवढंच काय इंटरव्ह्यूच्या वेळी दिल्लीला अकादमीच्या धोलपूरहाऊसवर सोबत आले. ट्रेनिंगमधे रहायचं कसं ,कपडे कसे असावेत ,एटीकेटस, मॅनर्स, अकादमीत वावरतानाचा आत्मविश्वास सगळं त्यांच्यामुळंच. दिल्लीत   गोविंद रेड्डी शहासराना भेटला. सरानी माझी त्याच्याशी ओळख करून दिली आणि एकमेकाच्या संपर्कात रहा असा सल्लाही दिला. आता ट्रेनिंग सोबतच करतोय. गोविंदचे वडील रेल्वेत आणि आई बँकेत नोकरी करते. 

                ’सकाळी मेसमधे भेट .बोलायचं आहे.’ त्याचा मेसेज होता. मी एक दीर्घ श्वास घेतला. स्ट्रेस मॅनेजमेंटचा फंडा! इथल्या ट्रेनरचं मत. इथं जन्मापासूनच ताणतणावांचा डोंगर होता.श्वास घ्यायलाही फुरसत नसायची. चला एक दोन तास झोपावं म्हणत पुन्हा पडतेय.कधी डोळा लागेल माहित नाही .    


                                                      6           


      बापरे दोन तास पडणार होते .डोळे उघडलेच नाहीत .पळा लवकर मेसमधे .अंघोळीचं नंतर बघू . नाहीतरी इथल्या थंडीत अंघोळीचं कसलं कौतुक. सगळ्या एकदिवसाआडच करत. आल्यानंतरचा पहिला आठवडा ओळखी करून घेण्यात गेला .मी फक्त गोविंदलाच ओळखत होते. आमच्यात डॉक्टर्स ,इंजिनिअर ,आर्टस ,सायन्सवाले सगळेच होते.एकशे अठ्याहत्तर आएएस,तीस आय.एफ.एस,पस्तीस आय.पी.एस ,आणि रेव्हिन्यू,कस्टम्स ,फोरेस्ट ,रेल्वे, पोस्टल,रॉयल भुतान सिव्हिल सर्विस वाले सगळे भरलेले .कुणाकुणाची ओळख करून घेणार? माझ्या गटाची झाली तरी पुष्कळ झालं.

          पूर्ण सप्टेंबर महिना लेक्चर्स ,कसरत. दर शनिवारच्या अठरा वीस किलोमीटरच्या ट्रेकनी दमवून टाकलं नुसतं. निसर्ग मात्र अफलातून.सुरवातीच्या पी.टी. सेशन्सच्या वेळी पहाटेच धावाधाव करावी लागे.पोलो ग्राऊंडपर्यंत पोचणं आणि सरावानंतर परत हॉस्टेलला येणं ही अतिरिक्त पी.टी. होती. प्रत्येक ऑफिसर ट्रेनी कशाला आलो ब्वा! म्हणत कुरकुरायचा .पाय दुखायचे. इथं येण्याआधीचं सगळं ग्लॅमर ,माज बरोबर अकॅडमी उतरवत होती.मी सगळं ट्रेनिंग बिनबोभाट पार पाडत होते .पण प्रश्न मलाही होता .मी का आले इथं? सुदैवानं उत्तरही होतं माझ्याकडं. या एकाच पेशात मी देशभर फिरून नंदूचा शोध घेऊ शकणार होते.माझे अधिकार ,हातातले सोर्सेस वापरणार होते. कुठल्याही आव्हानापुढं गळून न जाता मला हे ट्रेनिंग पूर्ण करायचंच होतं. माझा बाप होता तो.सुखात ठेवायचंच होतं त्याला.  

          बाकीच्यांकडं सुरक्षित कुटुंबाचं भक्कम पाठबळ, सुंदर भूतकाळ, गौरवशाली भविष्यकाळ होता. माझ्यासमोर माझं एकमेव लक्ष्य आणि सोबत विलक्षण एकाकीपण. अधून मधून शहा सरांशी बोलणं व्हायचं तेवढंच काय ते. त्यामुळं अभ्यासात झोकून देणं हा एकच सुंदर आणि अपरिहार्य पर्याय होता माझ्यापुढं. इथं एकाचवेळी घर आणि नोकरी मिळणार होती मला. जोडीला अनेक आव्हानं, ताणतणावही असणार होते.

         गोविंद रेड्डी ,आरती षण्मूगम,आदित्य कामत, नयन झा आणि मेघना पांडे एवढ्यांशी माझी बरी ओळख झाली. आणि हो शुभंकर बसू देखील. हा अर्धा बंगाली अर्धा महाराष्ट्रीयन .कारण आई मुंबईच्या प्रधान कुटुंबातली.त्यामुळं बंगाली मराठी दोन्ही उत्तम बोलतो. ओळख झाली तेव्हा माझं गुंतणं कुठंच नव्हतं.  

       हे गोविंद व्यतिरिक्तचे बाकीचे सुद्धा लाल टिब्बाच्या ट्रेकवर गेलो असता जवळ आले .नेहमीच्या सवयीनं मी ट्रेकची माहिती दरवेळी अकॅडमीच्या माळ्याकडून घेत होते. त्यानं सांगितलं या ट्रेकमधे जळवा येऊन सारख्या अंगाला चिकटतात. म्हणून  मी सोबत हळदीची पाव किलो पूड ठेवली. कोकण रेल्वेच्या साईटवर काम करताना जंगलात जळवांशी सारखी झटापट व्हायची. नंदू माझ्या अंगाला हळद फासून सोबत न्यायचा. 

      ट्रेकवर चढायला लागण्याआधीच माझ्यासोबतच्या गोविंद, आरती, शुभंकर, नयन,मेघनाला मी अंगभर लावायला हळद दिली. त्यानी कुरकुरतच पण घाबरून लावून घेतली.आदित्य मात्र न ऐकता मीठ फासून निघाला होता. तरी त्याला एक जळू डसलीच. मी हळद टाकल्यावर कशीबशी सुटली. त्या ट्रेकनंतर या ग्रूपशी हाय हॅलो आणि जुजबी गप्पा होऊ लागल्या. 

         बेनॉग हिल्सचा ट्रेक इतका सुंदर होता कि बस! सगळ्यांचे फोन सुंदर फोटोनी भरले. एका शनिवारची केम्टी फॉल्सची व्हिजिट मस्त झाली ..पोरं धडाधड पाण्यात उतरून मस्ती करू लागली . पण थंड पाण्यात शिरायला कोणी मुली तयार होत नव्हत्या .मी आरामात आत पाण्यात गेले हे पाहून मेघना थक्क झाली. काय सांगणार तिला? ,बाई ग आयुष्यभर गार पाण्यानीच आंघोळ केलीय मी म्हणून? नंतर एकेकजणी आल्या.धमाल,दंगा मस्ती केली. माझ्यासाठी हे सोशल लाईफ नवंच होतं.

                           7


      हे सगळं अगदी ठरल्याप्रमाणं होत होतं तरी अदृष्य उदासी माझ्या चेहऱ्यावर ठाण मांडून होतीच .एकदा लॉनवर गप्पा मारताना प्रत्येकजण शाळा,हायस्कूलच्या  आठवणी, शिक्षकांच्या नकला ,शाळेच्या ट्रीपमधे केलेली धमाल वगैरे सांगत होते. मी शांत होते. विचारल्यावर याना जेव्हा सांगितलं कि मी शाळेत न जाताच सगळं शिक्षण घेतलंय तेव्हा केवढा जबडा वासला होता सगळ्यांचा!

           चेहऱ्यावरची उदासी  गोविंद ,आदित्य आणि शुभंकर नेमकी टिपत .मला शुभंकर म्हणालाही, ”ज्योती ,तू तुझे अनुभव लिहून काढ. कळू दे जगाला कठोर परिश्रम करणारा या देशात कुठच्या कुठं पोचतो ते. नकारात्मक खूप लिहिलं वाचलं जातं. तुझं सगळंच जगणं तेजस्वी आहे. खूप जणाना प्रेरणा मिळेल ग यातून .” नंतर मात्र हा ग्रूप खूपच जवळ आला .नंदूला शोधायचे अनेक उपाय हा ग्रूप मला सुचवू लागला. इतक्या समवयस्क सहपाठी मित्रमंडळीत वावरण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. यांची जवळीक सुखावत होती मला. ब्लॉग बनवून त्यावर माझं सगळं जगणं  लिहायची कल्पना नयनची. ‘ ये मोह मोह के धागे’ टायटल दिलं गोविंदनं.  शुभंकर म्हणाला, “तू आम्हाला सांगतेस तसंच कॉम्प्युटरला सांग. तसंच लिहून काढ .शैलीचा विचार करू नकोस .ती आपोआप साधते. लोक जास्त आवडीनं वाचतील .” 

           ही सगळी मंडळी गाणी छान म्हणायची .नंदूही सिनेमाची गाणी म्हणायचा. त्याचं आवडतं गाणं मीही आता सगळ्यांबरोबर गुणगुणू लागले.

         ‘छोटीसी ये दुनिया पहचाने रास्तें हैं

          कहीं तो मिलोगे तो पुछेंगे हाल ! ‘ 

            

         नोटीस बोर्डजवळ गर्दी जमलीय. दोन दिवसात बर्फ पडायला लागेल . आता मसुरी सोडायचं आहे आम्हाला. भारत दर्शन टूरवर दोन महिने जायचंय. आर्मी ,एनजीओ,गावं ,खेडी शहरं प्रशासन व्यवस्था  यांची जवळून ओळख व्हावी हा उद्देश. भारत जवळून ,तळागाळातून बघायचा होता आम्हाला . या आधीही जवळच्या गावात जावून आरोग्य ,शिक्षण, ग्रामीण सुविधांचा आढावा घेऊन रिपोर्ट तयार केला होता .

        अठराचा एक ग्रूप आणि ग्रूप लीडर यांची नावं लागलीत .गर्दीत जाण्यापेक्षा मी शांतपणे लॉनवर बसणं पत्करते.

       ” ज्योती ,यार तू, गोविंद, शुभंकर ,आदित्य और  मेघना सारे एक ग्रूप में हो  ..मैं और तेरी रूम पार्टनर रती अलग ग्रूप में , नयन और अलग ..” एक हात या बाजुला आणि एक त्या बाजूला हवेत उडवत हताशपणे आरती म्हणाली .

       ” लकी हैं हम.हमारा ग्रूप लीडर ओरिसा का  शिशिर पटनायक है..छान आहे तो ज्योती . आरती, तुम्हारावाला  अभिषेक मल्होत्रा. नयनजी ,आपका लीडर कर्नाटक का माधव कृष्णमुर्ती है. ज्योती , धूम मचाले धूम मचाले धूम .मिल बैठेंगे हम सब यार! शुभंकर त्याना चिडवत दे टाळी  म्हणत बाजुला येत हसत म्हणाला. त्या अजूनच हिरमुसल्या 

      ” आरती .नयन,हम स्टेट केडर अलॉटमेंट के बाद ऐसे भी अलग हो रहे है!..ज्यादा सोचो मत.और बढिया ग्रूप मिलेगा तुम दोनों को .वैसे भी दो महिना यूँ निकल जाएगा.” मी त्याना  समजावते .

”  ज्योती, डोंट फर्गेट मी .बी इन टच ! स्काइप पे बात करेंगे .और हाँ , तेरी लाईफ स्टोरी लिखना मत भुलना. तेरे नंदूबाबा  के साथ वाले मायक्रो मोमेंटस  भी लिखो. यू विल फील बेटर.” म्हणत आरतीनं माझ्या गळ्याला मिठी मारली .मी शहारलेच...कुणीतरी इतकं प्रेमानं मला मिठी मारतंय...लक्षात आलं लहानपणचा नंदूचा स्पर्श सोडला तर आपल्याला कुणाचाच असा मायेचा स्पर्श झाला नाही. तीन मोठ्या बहिणी याआधी कधीच आठवल्या नव्हत्या .त्यांची आठवण झाली .कुठं बरं असतील त्या? नंदूसोबत त्याही सापडतात का बघू. 

   ” ज्योती, नको नव्या मोहात अडकू ! एक नंदू सापडला तरी बस!” मनाला बजावते मी. भेटला की त्याला कुठंही जाऊ देणार नाही आता . आता फक्त आराम करायला सांगणार. पेपर, मासिकं जे हवं ते आणून देणार वाचायला . गाणी ऐक .मजा कर,बागकाम कर म्हणून सांगणार . चला ओरिसाच्या शिशिर पटनायकची नंदूला शोधायला किती मदत होते पाहू...नाहीतरी शेवटची माहिती तो तिथं गेल्याचीच हाती आहे!

   

                                            8


             आएएस फेज वन ,फेज टू ट्रेनिंग संपलं. प्रोबेशन संपलं. सुटीत देशपांडे काका काकूना भेटून नमस्कार करून आले. काकू खूपच थकल्यात.कर्तबगार खडूस माणसं असहाय,अगतिक बघवत नाहीत. शहासराना भेटून आले . माझ्याकडे यायचं आमंत्रण देऊन आले. एवढंच काय मेसच्या मामीनाही भेटून आले .

           ” बघा रागानं कलेक्टर म्हणालात ना मला ... झाले की नाही मी खरोखरची कलेक्टर  मामी?” म्हणून मामीना  साडी देऊन नमस्कार करताच मामी डोक्यावर हात ठेवून कौतुकानं हसत म्हणाल्या,” चुकले ग बाई मी ,आता तू सांगशील तो आशिर्वाद देते बघ?“ मनात म्हटलं नंदूची भेट होऊ दे एवढाच आशिर्वाद द्या ! खरंच माणसं वाईट नसतात.ती फक्त त्या त्या वेळी पदरात पडलेली चांगली वाईट भूमिका करत असतात. 

           रायपुर जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेतला. बघता बघता दोन वर्ष पूर्णही झाली .आता हे वर्ष संपता संपता कुठे जावं लागेल सांगता येत नाही. या रुटीनची, आव्हानांची सवय झालीय .एक तटस्थपणा अंगात शिरलाय आता. कायम सर्वांशी सुरक्षित अंतर ठेवून रहायचं हे शिशिरचं सांगणं अगदी खरं होतं. इथले ठेकेदार लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याना गुंडाळायलाच बसलेले असतात .गोविंद म्हणायचा तसं ‘ना काहु से दोस्ती ना काहु से बैर!’ हे तत्व हवं आपल्या कॅटॅगरीला. खरंही होतं. खासकरून खाणी ठेका ,वाळू ठेकेदार,अवैध दारू ,गुटखा यातल्या लोकांशी सांभाळून वागावं लागतंय. तहसिलदार लोकाना फार त्रास दिलेला या लोकानी. नक्षलवाद कमी जास्त प्रमाणात डोकं काढत असतो.           

             इकडचेही आपलेच तिकडचेही आपलेच.

            कसं आणि कुणाशी लढू  मी योगेश्वरा ? 

             असहाय अवस्था सतत होते माझी.

          वरवरची मलमपट्टी होतेय.

         बेंड कुणी फोडत नाही. 

        लसलसणारी घाण कुणी काढतं नाही.

        चाललीय फक्त वरवरची मलमपट्टी 

         मिडिया माध्यमांसमोर येतोय 

          विकासाचा नाचरा मोर  

               खूप नैराश्य येतं कधी कधी. त्यात महिन्यातून एखादी मंत्री, चीफ सेक्रेटरी व्हिजिट असते.येस सर ...शुअर सर म्हणत वेळ मारून न्यायची. शुभंकर म्हणायचा तेच खरं !  आपण काय आहोत हे कधीही कुणाला पूर्णपणे उलगडून दाखवायचं नाही. जितके गूढ राहू या पेशात तितके टिकू.बाहेर पडताना रिटायरमेंटला कुठलंही बालंट न येता बाहेर पडलं तरी पुष्कळ झालं. मी स्वतःपुरतं एक तत्व ठेवलं आहे. अवैध माया जमवायची नाही, खासगी निवासस्थानात कधी राहायचं नाही आणि खासगी वाहनात कधीच बसायचं नाही. 

            ट्रेनिंग संपता संपता गोविंद मेघनाची जोडी जमली. शुभमंगलही झालं. आदित्यचं ओळखीतल्या सारस्वत मुलीशी लग्न झालं .बहुतेकानी आपापले जोडीदार निवडले. प्रत्येकजण आपापल्या विश्वात. शिशिर, शुभंकर आणि मी अजून तसेच आहोत .या पेशात लग्न जमणं जितकं कठीण तितकंच टिकणं कठीण. कामाचा ताण येतो ,इगो क्लॅश होतात. त्यात माझं म्हणजे अजूनच अवघड. कुटुंबवत्सल ,संस्कारी घर,नातेवाईक ,कुळ ,जात जे वधूबद्दलच्या अपेक्षात आजही पहिलं पाहिलं जातं,ते माझ्याकडे औषधालाही नाही. मला अनाथाश्रमात वाढल्याच्या सहानुभूतीचीही किनार मिळत नाही . एखादा तयार झाला तरी नंदू आणि मला माझ्या भूतकाळासह जसं आहे तसं स्वीकारणारा हवा. अर्थात कुणाशीच या विषयावर कधी बोलणं झालं नाही. एकदा विषय काढल्यावर शिशिरला मात्र वस्तुस्थिती सांगितली.अपेक्षांबद्दल इतकंच मोघम  सांगितलं.  

             आता सगळं बरं चाललं आहे. नंदूचा पाठपुरावा होत नाही ही खंत आता पुर्वीइतकी नसली तरी अधून मधून डोकं वर काढते. खासकरून सुट्टीच्या दिवशी बागकाम करताना. झाडं लावणं, वाढवणं खूप आवडायचं त्याला .रोज पाणी घालताना झाडाची वाढ निरखत राहायचा . 

          “ मॅडमजी, भैय्याजी आए हैं मिलनें !” प्रमोद माझा पीए आत येऊन म्हणाला .

           भैय्याजी हे बडं प्रस्थ. वृद्धाश्रम ,अनाथाश्रम ,शिक्षण संस्था,अनेक कुटीरोध्योग चालवतात. खादी ग्रामोद्योगही बघतात .म्हटलं तर कशात नाही. म्हटलं तर सगळीकडे तेच. देशभर भ्रमंती चालते त्यांची .गूढ व्यक्तिमत्व शुभंकर म्हणतो तस!

          ” अरे क्या बात है ..उन्हें अंदर आने को कहिए .” त्यांच्या अनाथाश्रमाला,संस्थाना, एनजीओ, सेवाभावी संस्था, कार्पोरेट सेक्टर कडून निव्वळ भैय्याजी नावामुळं भरपूर फंडस येतात .धान्याची पोती सतत येतात. इतकी कि बरंचसं धान्य सडून जातं असं कळालं .माणूस अतिशय धोरणी आहे ,बोलणं स्पष्ट. भेदक,विषयाला धरून. हा विषय बोलता बोलता कळत न कळत काढावा लागेल. पुन्हा नवं रामायण नको.

             ” नमस्ते!” सत्तरीला आलेले, शिडशिडीत उंच ,स्वच्छ पांढरा पायजमा , तपकिरी मळखाऊ खादीचा झब्बा, काळपट करडं खादीचं जॅकेट , खांद्याला खादीची सर्वोदयी झोळी. अगदी श्रीलाल शुक्लच्या रागदरबारीतील रंगनाथची वृद्ध आवृत्ती .फरक एवढाच कि तो अत्यंत निष्क्रीय, भोंदू आदर्शवादी आणि भैय्याजी अत्यंत क्रियाशील, आदर्श आणि व्यवहार जोडू बघणारे आहेत. 

              ” अरे मॅडम ,आप क्यूँ खडी हो रही है ...? बैठिए जी! ”

          सुरवातीचं औपचारीक बोलणं झाल्यावर मी हळूच विषय काढला. येणारं धान्य वाया घालवण्यापेक्षा अन्य गरजू संस्थाना दिलंत  तर कुणाच्यातरी पोटात जाईल असं सुचवलं. आश्चर्य म्हणजे त्यानीही ते सहज मान्य केलं .तरीही मी अन्य संस्थांशी बोलावं आणि  धान्य त्या संस्थानाच एकदम न नेता लागेल तसं उचलायला सांगावं अशी अट घातली. त्यांच्या मते सगळं सहज उपलब्ध झालं तर इथल्यासारखंच तिथंही सडून जाईल. लागेल तसंच पुरवू. हे खरं होतं. लागेल तसं धान्य उचलणं आणि पुरवणं  सहज शक्य होतं. खात्याच्या जीप,ट्रक मधूनही पाठवता येण्यासारखं होतं. बराच वेळ गप्पा झाल्यावर उठता उठता दोन पावलं चालून ते थांबले .मला वाटलं आता पुन्हा विचार बदलतात कि काय ? 

              ” ज्योती, बगैर किसी पोलीस प्रोटेक्शन के ट्रक पकडने जाना कहाँ की होशियारी है?“ आवाजात जरब दिसतेय. बापरे ,गेल्या आठवड्यातली घटना यांच्यापर्यंत पोचलीही? यांची काही समांतर न्यूज यंत्रणा आहे की काय ? मला स्वतःला  मंत्री ,चीफ सेक्रेटरीपेक्षा यांचा नैतिक धाक वाटतो. 

             डोळ्याला थेट डोळा भिडवत म्हणाले,

          “ अपनी जिंदगी को इतना बेमोल मत बनाओ बिटिया! आप जैसे होनहार लोग चाहिए हमें. देश के नवनिर्माण की उम्मीद आप लोगों से ही है.” मी थेट बघितलं पारदर्शक नजर होती .डोळ्यात आत कुठंतरी खरीखुरी काळजी मलाही दिसली. मी मान हलवत सम्मतीदर्शक हसले आणि दरवाजापर्यंत सोडायला गेले. माझ्याही नकळत नमस्कारासाठी वाकले. निघताना त्यानी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ” जुग जुग जिओ बिटिया !”  वरवरचा माझा कठोरपणा निखळून पडतो कि काय असं वाटलं त्या क्षणी .

             टेबलावर मोबाईल वाजतोय. शिशिरचा फोन ” अरे यार, तू अपना ब्लॉग देखती भी है या नही.? कोई बंदा तुम्हें तुम्हारे नंदूबाबा के बारे में बता रहा है! बीच बीच में खोला करो ब्लॉग. व्युअर्स की कमेंटस को रिप्लाय भी दो डफर! एक और बडी बात ..अभी छुट्टी डालकर तुरंत नंदूबाबाको ढूँढने जाओ.” त्याचं बोलणं ऐकलं अंगावर रोमांच उठले कधी एकदा घरी जाते आणि ब्लॉग उघडते असं झालं.

             ओरिसाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतला नंदूच्या बॉसचा मुलगा आहे. युपीएससीची तयारी करतोय. माझा ब्लॉग नेहमी चाळतो. त्याच्या म्हणण्यानुसार नंदू, नंदूची बायको आणि दोन वर्षाची मुलगी तीन वर्षापूर्वी गोव्याच्या कंपनीच्या साईटवर गेले आहेत. त्या मुलानं घरातल्या कृष्णाष्टमी पुजेच्या वेळच्या फोटोतला नंदूचा फोटो टाकला होता. नंदूच होता माझा. खातरजमा झाली. लग्न केलंय.. मुलगीही झाली...आत कुठतरी टोचलं माझ्या. पण अपराधीही वाटतं. इतकं उशीरा लग्न व्हायला कुठंतरी मीच जबाबदार असल्यासारखं वाटतं. लगेच ठरवलंय आता खरंच दोन दिवस सुटी टाकून गोव्याला जायचं. कायम नाही आला तरी चार दिवस इकडं घेऊन यायचं त्याना. आदित्यला कळवलंय .तो जवळच सिंधूदूर्गला आहे.


                      9


              आम्ही नंदूच्या साईटवर जातोय. माझी एक्साइटमेंट आदित्य मिष्किलपणे टिपतोय.. मी नंदूला कसं सरप्राईज द्यावं या विचारात आहे. बोटं जुळवून मुठीवर मूठ आपटतेय टाळी वाजवतेय.  छातीत धडधड होतेय .काय असेल त्याची प्रतिक्रिया मला बघितल्यावर? 

            ही आदित्यची सरकारी गाडी आणि माझं कडक इस्त्रीतल्या कॉटनच्या साडीतलं,हलक्या  मेकअपमधलं बदललेलं रूप पाहून भेदरायचा तर नाही ना! एक ना अनेक शंका .किती वर्षानी भेटतोय आम्ही!

               आत ऑफिस होतं .बाजुला तात्पुरती लेबर टेनामेंट होती. लेबर साईटवर त्याचा फोटो दाखवल्यावर कळालं. साईटवरची साफसफाई करताना दीड फुटाचं फुरसं चावलं आणि त्यात तो गेला तीन महिन्यापुर्वी. बायको भ्रमिष्ट झालीय. कुठंही फिरत असते. कुठं जाते कुणालाच माहित नाही. गेले दोन दिवस तर दिसलीही नाही कुणाला .महिन्यापूर्वी आबाळ होऊ नये म्हणून मुलगी इथल्या अनाथाश्रमात पाठवली आहे. तिथंले कागद दाखवले. ऐकल्यावर मी मटकन तिथंच बसलेय. मला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतंय .आदित्य जाम भडकलाय .दवाखान्यात का नेलं नाही म्हणून खवळलाय. तो मुकादम थरथरत सांगतोय. डोकं बधीर होतंय माझं  

         ”साहेब लगेच नेलंवतं आम्ही. तोच म्हणाला वैदू नको .दवाखान्यात न्या. त्याच्या बारकीची शप्पथ साहेब ! दवाखान्यात सापाची लसच न्हवती .सावंतवाडीला फोन केला होता .सगळीकडे पळवलं लोकाना. शेवटी वैदूकडं पण न्हेलं. पण उशीर झाला हो साहेब फार. तडफडून मेला बघा .अंग सगळं काळंनिळं झालं होतं. देवासारखा होता तो...आम्ही असं मरू दिऊ का त्याला! ” मुकादमाचे डोळे ओले झाले .त्याला भडाभडा बोलताना दम लागला. 

       जोरात हंबरडा फोडावा असं वाटतंय मला . प्रशासनाची ठेकेदार म्हणवते मी. आणि माझ्या बापाला एक लस उपलब्ध होऊ नये? तो देवासारखा होता हे माझ्यापेक्षा कुणाला जास्त ठावूक असणार रे बाबा! मी डोळे टक्क उघडून प्राण गेल्यासारखी मटकन खालीच बसलेय . हातानी तोंड बंद केलंय पण डोळ्यातून घळाघळा पाणी वाहातंय.  

        जमलेल्या लोकाना कळत नाहीय ही लाल दिव्याच्या गाडीतनं आलेली हापिसर बाई आपल्या फाटक्या ठेकेदारासाठी का रडतेय ?

          त्याच्या बायकोचा शोध घ्या .सापडली की ताबडतोब कळवा असं आदित्यनं त्या लोकाना सांगितलं. माझं,त्याचं दोघांचं कार्ड सुपरवायझरकडं दिलं. 

          गाडीत बसले तरी डोळ्याच्या धारा संपत नाहीत.रडतच मी म्हणतेय ” आदि ,आय क्वीट ! मला नकोय काही. सगळं सोडून द्यायचंय मला. मला जगायचंच नाही रे आता! ”

        ” ज्योती , रियली व्हेरी सॅड! तू केवढी तळमळत होतीस भेटायला त्याला ...पाहिलंय ना मी ! .. .आणि हे  असं व्हावं?” आदित्य सांत्वन करतोय..मी सुन्न झालेय .किती स्वप्न पाहिली होती मी .एका कंगाल मजुराच्या पोरीला  कोणतीही अपेक्षा न ठेवता  जगवलं वाढवलं त्यानं आणि आता मी त्याच्यासाठी करायचं तर हे असं व्हावं?”  

        ” ज्योती. असा टोकाचा आजिबात विचार करायचा नाही हं. काय वाटेल सांग बरं नंदूच्या आत्म्याला ? आपण घरी  जावू.तू रेस्ट घे .तुला क्रोसिन देऊ का ?”  आदित्यही कसं सांत्वन करू या संभ्रमात आहे..

        खरंच ..काय वाटेल नंदूच्या आत्म्याला ..मरून कसं चालेल मला ? सोडताही येणार नाही काही मधेच .मी रुमालानं डोळे पुसतेय .” आदि , मला त्याच्या मुलीला सोबत घेऊन जायचंय. मदत कर ना प्लीज. सोपस्कार फार लांबवू नका म्हणावं ”        

     आदित्य फोनाफोनी करतोय. गोव्याचा सुंदर निसर्ग मला बेरंगी वाटतोय. तासाभराच्या प्रवासानंतर घाट, वळणं पार करत छोट्याशा शाळेसारख्या कौलारू बैठ्या  इमारतीजवळ गाडी थांबलीय. सरकारी गाडी बघितल्यावर इन्स्पेक्शनला आले कि काय म्हणून सगळे लगबगीनं बाहेर आले. बऱ्याच छोट्या मुली आजुबाजुला खेळतायत. मी आजुबाजुच्या मुलीत कुठं असेल नंदूची मुलगी निरखून बघतेय.. 

            ” कृष्णा ,जा पुजा नंदकुमारला घेऊन ये !?” बाईनी शिपायाला सांगितलं . पुजा नंदकुमार ...या ज्योती नंदकुमारची बहीण ...माझ्या नंदुची मुलगी. काळीज आत आत भरून येतंय. 

               आदित्य बाईना सगळं नीट समजावून सांगतोय. अजून माझ्या नजरेला काही  पुजा नंदकुमार पडत नाहीय. बाईनी तिची पिशवीही भरायला सांगितलीय . कुठंय ती मुलगी ?किती वेळ लावतात हे लोक ?”

        मी वैतागून उठून बाहेर जातेय.. समोर कृष्णा दिसत नाहीय .शोधतेय त्याला .मागच्या बाजुला परसू आहे...तिथं भाज्या आहेत . छोटी फुलांची बाग आहे.

           ” पुजा, तुला न्यायला लोकं आलेत.. आवर .” मघाचा कृष्णा ओरडतोय एका पाचेक वर्षाच्या तीन फुटी  मुलीवर. तिचं लक्षच नाही .छोट्या हातानं झाडाच्या मुळाजवळचा कचरा काढतेय. चिमण्या हातानी बादलीतल्या छोट्या तांब्यानं झाडाला पाणी घालतेय. डिट्टो माझा नंदूच दूसरा. नंदू की मी स्वतः ? मळलेला फ्रॉक, केस विस्कटलेले .नंदूची झिप्री पुजा ...!

    ” हे बघ ..इकडं बघ .ह्या ताई तुला न्यायला आल्यात..चल आवर.” कृष्णा खेकसतोय.त्याला ही दत्तकची केस वाटतेय . त्याला सांगू का मी ? ” बाबारे, ही माझ्या नंदूचा जीव की प्राण आहे..नको ओरडू हिच्यावर !...हिच्या बापानं मला ज्या प्रेमानं वाढवलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जीव लावणार आहे मी हिला. हे अशक्त लेकरू कोमेजून जाईल तुझ्या ओरडण्यानं ” मी जवळ जाऊन तिला अलगद उचलून घेतेय. एकदम अवघडलीय ती. अंग चोरून घेतेय, चुळबुळ करत खाली उतरतेय.

       तिचं बर्थ सर्टिफिकीट घेतलंय. कागदपत्रं तयार करून आम्ही निघालो आहोत. गाडीत खिडकीजवळ बसलीय .बाजुला मी  बसल्यावर अंग आखडुन घेऊ लागलीय. मी तिला जवळ घेऊन थोपटतेय .मनात म्हणतेय ,बाई ग मी तुझ्या बाबाच्या अंगाखांद्यावर हक्कानं वाढले. कधी एक चापटी मारली नाही कि ओरडला नाही तो मला. तुलाही तसंच जपलं असणार . तसंच फुलासारखं जपीन मी तुला. एवढी श्रद्धांजली नक्कीच देऊ शकते. कुठंतरी त्याचा आत्मा बघत असेल. नंदू तुझ्या बायकोचाही शोध घेईन रे .तिला पूर्ण बरं करीन. तुझ्या पोरीला तिची हक्काचीआई नक्की मिळेल नंदू...माझा शब्द आहे तुला ! मी स्वतःशीच हळू बडबडतेय  

         आता ती हळूच माझ्याकडे बघतेय.मी तिच्या केसांवरून हात फिरवते आणि आदित्यला सांगते , ” आदित्य छान कपड्यांचं ,शूजचं दुकान बघायचं का ? ” हो, एक परीच घेऊन जातेय मी सोबत . हिच्या वयाची असताना मी तरी परी पेक्षा कुठं कमी होते!

          शुभंकरला आदित्यनं सगळं कळवलंय. माझ्या हातात त्याचा आलेला फोन दिलाय त्यानं. 

          “ ज्योती, व्हेरी सॅड डिअर ....सावर स्वतःला ..तुझ्या ह्या छोट्या बहिणीला जप. आपण सुंदर आयुष्य देऊ .खूप शिकवू तिला..तिची आईही शोधू ..तिलाही सांभाळू. तुझ्या प्रत्येक अडचणीला मी आहे लक्षात ठेव....यू नीड अ कंप्लीट फॅमिली नाऊ . ऐक ना ,ममा  बोलेल तुझ्याशी सविस्तर सवडीनं...मीही येऊन भेटून जातो लवकरच तुला. टेक केअर ऑफ दॅट पुअर चाईल्ड.”

         तो बोलतोय खूप काही .दुःखाचे कढ राहून राहून येतायत. मधेच हुंदका फुटतोय.गेली सात आठ वर्ष जाणीवपुर्वक ओढलेला मुखवटा गळून पडतोय सर्रकन.धिस इज लाईफ ...हे असंच असणार आहे. आय डेअर टू टेक इट ! खूप काही गमावलंय मी पण कुठंतरी मी पूर्ण झाल्यासारखंही वाटतं आता.

          गार वाऱ्यात पूजा पेंगता पेंगता माझ्या मांडीवर अलगद झोपलीय. मी तिचे डोळ्यावर उडणारे केस मागे सारत तिला थोपटतेय.कानाला हेडफोन लावलाय. गाणं ऐकतेय माझं आवडतं.  ये मोह मोह के धागे ...तेरी उँगलियों से जा उलझे...


स्वाती ठकार .   

                          

           (ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावे.)  

ही कथा चिंतन आदेश 2017 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.

No comments:

Post a Comment