Friday, November 20, 2020

सो स्वीट नं

 

सो स्वीट नं !

“ मेघु ,आज संध्याकाळी शाळेतून येताना काळे काकुंच्या बागेतनं सोळा सोळा पत्री ,दुर्वा ,आघाडा घेऊन ये .. हो आणि उद्या घरी ताईची मंगळागौर आहे.तिच्या सासरची मंडळी येतील संध्याकाळपर्यंत ..उद्या शाळेला येणार नाही म्हणून सांग पाटील मॅडमना ...संध्याकाळी हळदीकुंकवालाही यायला सांग त्याना..काळे काकूना पण सांग ग ! ” वाळलेल्या कपड्यांचा भलामोठा गठ्ठा मेघनाच्या कॉटवर आणून टाकत आई म्हणाली .

“ ए आई , हे सगळं ताईच्या खोलीत नेऊन टाक .आणि हो ..मी उद्या दांडी आजिबात मारणार नाही .उद्या गणिताची टेस्ट घेणार आहेत सर ....नवीन सर आहेत.. व्हेरी स्ट्रिक्ट ..तुझं काय जातंय दांडी मार म्हणायला ! ” मेघना फणफणली.

खरंतर तिला आईनं सांगितलेल्या कामातलं एकही काम करायचं नव्हतं ....सगळे नुसते ताईच्या मागं मागं !..ही ताई पण पहिल्या पासून अशीच. कायम सगळं आयतं मिळवायची ..स्वार्थी आहे अगदी .स्वतःचं काही म्हणजे काही देणार नाही.. मेकप बॉक्सला हातही लावू देत नाही ..स्वतःला करीना कपूर समजते .. मेघना मनात फणफणत होती .तसं तिचं आणि ताईचं कधीच जमलं नाही ..मोठ्या मानसीला छोटा भाऊ हवा होता पण झाली भांडकुदळ बहीण आणि मेघनाला मोठा दादा हवा होता पण आधीच ही बया आलेली ....त्यात वयात सात आठ वर्षाचं अंतर .कायम ताई मोठी म्हणून दादागिरी ...तरी बरं बाबा मेघुचे खूप लाड करायचे .मस्ती करायचे .तिच्याशी खेळायचे ..पण त्यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्टी असायची तेव्हाच .पेपरचे गठ्ठे तपासायला आले की ती ते रुममध्ये गुडुप व्हायचे .

फक्त एवढ्याच कारणासाठी तिला ताईचा राग येत नव्हता .ताईनं तिचा सगळा प्लॅन ओम् फस केला होता . तिच्या रागाचं मुख्य कारण हे होतं की काळे काकुंच्या हँडसम अमितवर तिचं प्रेम असताना तिनं त्याला सोडून आडदांड काळुंद्ऱ्या जिजूशी लग्न केलं . कितीतरी वेळा त्यांच्या नोटसची देवाण घेवाण तिनंच केली होती .जिजूशी लग्न का केलं? तर म्हणे अमित कंपनीत साधा इंजिनीअर आहे आणि जिजू असिस्टंट मॅनेजर! हे काय कारण झालं ..अरे ,झाला असता ना अमितपण मोठा मॅनेजर ..हिला मुळी धीरच नाही .

पूअर अमित,इतका स्वीट चॅप , ताईच्या लग्नानंतर गेला अमेरिकेला .तिथेच राहणार आहे असं काळे काकू म्हणत होत्या .त्यानाही त्याची खूप आठवण येत होती ..बिचारा एकुलता एक मुलगा इतका दूर गेला .सगळं ताईमुळं झालं .प्रेमभंग फार वाईट रे बाबा !
खरंतर मेघुलाच लग्न करायचं होतं त्याच्याशी... पण ताईचं प्रेम होतं म्हणून तिनं इतका मोठा त्याग केला होता .खरंतर आताही ती त्याला प्रपोज करू शकत होती. पण तिला सज्ञान व्हायला अजून तीन चार वर्ष तरी लागणार होती .आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली हल्ली तिला नवीन आलेले गणिताचे संजू सर खूप आवडायला लागले होते . कसले हँडसम आहेत .. पण ...सो बोरींग.... सारखं ऋचाच्या हुशारीचं कौतुक करतात .

कालच स्पोर्टस् च्या तासाला ते मेघुला उद्देशून हेडसराना म्हणाले होते ,” सर ही मुलगी रनिंगमध्ये एकदम छान आहे ..पण गणिताकडे आजिबात लक्ष देत नाही !” तेव्हाच मेघूनं ठरवलं आपले बाबा एवढे मॅथ्सचे प्रोफेसर आणि आपण एवढे मठ्ठ ...आजिबात नाही ...आता मॅथ्स नंबर वन करायचं ...स्पोर्टस् मधे तर आहोतच ...मग काय !ऋचा आऊट… मेघू इन! मेघू, यू आर ग्रेट ! स्वतःची पाठ थोपटत ती गाणं गुणगुणत किचनमधे आली .बाबानी भुवया उंचावत खुणेनं विचारलं ,”आज काय स्पेशल !”
पण तिनं आपलं गुपित कुण्णालाच सांगायचं नाही असं ठरवलं होतं ...तेवढ्यात खुर्चीवर बसून टेबलावरच काडवाती करून ठेवत असलेली आज्जी खुद्कन हसली .मेघुनं जरा रागानंच तिच्याकडं पाहिलं ..
“ आज ताई येणार आहे ना ...प्रयोग वहीत आकृत्या काढून द्यायला ...मग काय आमचा गृहपाठ पूर्ण झालाच म्हणून समजा ! ” ही आज्जी पण ना ...मेघू वैतागली पण लगेच तिनं जीभ आपल्या दाताखाली ढकलत ,गाल फुगवत ,डोळे मिचकावले .
“अरेच्चा ,हे आपल्या कसं लक्षात आलं नाही !”
“ए आई ,मी शाळेतून आल्यावर कपड्यांच्या घड्या करते ..आणि हो येताना पत्रीही आणते हं हळदीकुंकवाचं अजून कुणाला सांगायचंय का ?नंतर त्रास द्यायचा नाही.खूप अभ्यास आहे हं मला ! ”म्हणत आईनं करून ठेवलेला पोळी भाजीचा रोल तोंडात कोंबला .
“ अग सावकाश खा !”म्हणत मागून आलेल्या आईचं काहीच ऐकून न घेता सायकल वर टांग मारली .

“ ही पोरगी म्हणजे एक तुफान आहे रे बाबा ! मी लिहून देते तुम्हाला ही एक ही काम धड करणार नाही !”
“नक्की करेल ”....बाबा
“बघाच तुम्ही .” .....आई
“अर्धवट नक्की करेल! तीनचार प्रकारच्या पत्री आणेल आणि एखादं आमंत्रण नक्की देईल ”… आजी पदराआड खिदळत म्हणाली ...

----------------------------------------------------------------------------------------------------

“काय ग आणली का पत्री वगैरे ! ”सायकल दाणकन आपटून घरात शिरणाऱ्या मेघुच्या मागे मागे जात आईनं विचारलं ..
“तुझं तूच आण सगळं ..मी काही काम करणार नाही तुझं !”म्हणतं ती ताडताड खोलीत निघून गेली आणि खोलीचं दार धाडकन लावलं ...उशीत डोकं खुपसलं आणि मुसमुसू लागली ..तसंच कारण होतं ना ! तिला वर्गात मोनूनं सांगितलं कि संजू सर फक्त दोन महिनेच शिकवणार आहेत .ते युपीएससी परिक्षेत पास झालेत ...त्यांचा साखरपुडा झालेला आहे . ते लग्न करूनच ट्रेनिंगला जाणार आहेत “ हेच करायचं होतं तर आले कशाला शिकवायला !”
“ काय म्हणतात तुझे संजू सर !” आजीनं विचारताच ..ती एकदम भडकली ,या आजीला ना काही म्हणजे काही सागितलं नाही पाहिजे .
“माझे कुठलं ...माझे म्हणे ...आणि हे बघ सारखं चिडवायचं नाही हं मला ...काही खास नाहीत एवढे ते ... हो आणि ते आता जाणार आहेत बरं का ! काढून टाकणारेत त्याना दोन महिन्यात ..जोग सरच छान शिकवत होते ..तेच आम्हाला गणित शिकवणार आहेत ..”
तिन्हीसांज होता होता ताईच्या सासरचे सगळे आले .जिजू पहाटे येणार होते ..घरात एकदम धमाल सुरू झाली .मेघूनं शहाण्यासारखं सगळं सामान नीट लावलं ..काळे काकूनी सदुकडून दूर्वा पत्री काढून ठेवली होती . सायकलला टांग मारून तिला फक्त घेऊन यायची होती .

सगळे खूप आनंदात होते... पण ते तिच्यापासून काहीतरी लपवत होते .स्वयंपाक घरात खूसखूस सुरू होती ..ताईचे तर केवढे लाड सुरू होते ...

मेघुच्या खोलीत ताई आली तेव्हा मेघू आईनं केलेल्या कपड्यांच्या घड्या टेबलावर नीट रचत होती .ताई मेघू जवळ आली .आपल्या पर्समधलं नवं कोरं मेकअप कीट तिला काढून दिलं आणि म्हणाली ,” हे जिजूनं खास तुझ्यासाठी आणलंय दिल्लीहून! ” तिचा गालगुच्चा घेत ताई म्हणाली.
“ आता एकदम गुड गर्ल व्हायचं बरं का !तू मावशी होणारेस ..कळलं का बाई ! ”
मेघु बघतच राहिली ..आत्ता तिला कळालं ताई का फार्मात आहे ते !. अरेच्चा म्हणजे मी मावशी होणार तर !..तिनं ताईच्या पोटाला अलगद हात लावला आणि दोघी खुदु खुदु हसायला लागल्या .
“ ए ताई मी पटकन माझ्या सासरी जाऊन दुर्वा पत्री घेऊन येते ” तिच्या कानाशी कुजबुजली तसा ताईनं नाटकीपणानं कपाळाला हात लावला आणि हसायला लागली .

काळे काकुंकडे तिनं ओल्या नारळाच्या करंज्या खाऊन,छान गप्पा मारल्या .त्याना दारात छान रांगोळी काढून दिली.भांडी सेल्फवर लावून दिली .काकूनी प्रेमानं तिच्या गालावरून आपली बोटं फिरवून कपाळावर नेऊन कडाकडा मोडली .तशीही मेघूच ताईपेक्षा काकूंची लाडकी होती . त्याना हळदी कुकंवाचं सांगून फुलं पत्री वगैरे सामान घेऊन ती आनंदानं घरी आली .आज काकू किती खुश होत्या ..!अमित दिवाळीत महिनाभर सुट्टी काढून येणार होता ना !

रात्री ताईजवळ झोपलेल्या मेघूच्या स्वप्नात आडदांड जिजू ,थोडं गबदुलं काळं थोडं गोरं बाळ ,आई ,बाबा ,सगळे आलटून पालटून येत होते ...हो आणि अमेरिकेहून तिला खास मागणी घालायला अमितही आला होता जीजूपेक्षाही छान छान गिफ्टस् घेऊन ...
स्वप्नात ....

सो स्वीट ना !

स्वाती ठकार


No comments:

Post a Comment