Friday, November 20, 2020

भज गोविन्दम मूढमते

 

भज गोविन्दम मूढमते

                                1

गॅसवर बटाट्याचा रस्सा रटरटतोय. पोळ्यांसाठी मळलेल्या कणकेचा कुंडा ओढून राखीनं तवा गॅसवर ठेवला. आज रस्सा पोळीवरच भागवावंसं वाटतंय. भात टाकावा कि नको हा विचार आल्या आल्या झटकून टाकला. अम्माचा विचार आला आणि मऊ मुगाच्या खिचडीसाठी तिनं तांदुळ डाळ मुठीनं कुकरच्या डब्यात टाकली.
आज स्वैपाकाच्या शैलाताई सुट्टीवर आहेत. त्यांची पहिलटकरीण लेक सायली दवाखान्यात अॅडमिट आहे. आजची सुट्टी अजून लांबू शकते. स्वैपाकासोबतची टाइम मॅनेजमेंट जमवावी लागेल. शैलाताई लेकीच्या वयाहून लहान असल्यापासून अम्माकडं काम करतात. माळी , इस्त्रीवाला एवढंच काय रद्दीवालाही पंचवीस तीस वर्षापासून तोच. दर दिवाळीला अम्मा या सगळ्यांची भेटीची  पाकिटं स्वतः भरून त्यांची नावं टाकायची. आपल्या माघारीही  हे पोचेल याची चोख व्यवस्था केलीय अम्मानं . अम्माचं सगळंच खास.

बाहेर अम्मा झाडांना पाईपनं पाणी टाकतेय. तोंडानं चर्पटपंजरिका स्तोत्र म्हणतेय. अम्माचा थरथरता आवाज ऐकला कि झाडावरची चिमणी पाखरं भोवती गोळा होतात. तिच्यासोबत गप्पा मारत असल्यासारखा किलकिलाट करतात. बऱ्याचदा अम्माही त्यांच्याशी मल्याळममधे बोलत राहते. जवळचा संवाद साधण्यासाठी मातृभाषाच का बरं लागत असावी तिला ? राखीला प्रश्न पडे. नंबुद्रीपाद ब्राह्मण अम्माची शंकराचार्यांची सगळी स्तोत्रं तोंड पाठ. हे स्तोत्र तर खास आवडीचं आहे तिच्या. रोज ऐकून अर्थासह राखीचंही तोंडपाठ झालं होतं.

भज गोविन्दं भज गोविन्दं
गोविन्दं भज मूढमते
सम्प्राप्ते सन्निहिते काले
नहि नहि रक्षति डुकृङ्करणे

अम्मा सुरात गात होती. म्हणायला सासू पण आलेल्या संकटात आईसारखी मागं उभी राहिली. राखी अम्माची शेजारीण प्लस तिची राज्यशास्त्राची विद्यार्थिनी. घरी येणं जाणं लहानपणापासून. अम्मा- राघवकाका कट्टर कम्युनिस्ट. राघवकाका युनिअन लीडर. राखी दहावीत असताना जुनी सोसायटी सोडून अम्मानं युनिवर्सिटी जवळ जागा घेऊन टुमदार कौलारू बंगला बांधला. भल्या मोठ्या मोकळ्या जागेत झाडं लावायला सुरवात केली. आज जंगल झालं आहे. अम्मानं बोअरवेल ऐवजी छोटं आड खोदलं आणि बागेतील झाडांची पाण्याची सोय करून टाकली. पावसाचं पाणी आडाच्या पुनर्भरणीसाठी वापरायची योजना म्हणजे अम्माची अत्युच्च कल्पकता.
अधून मधून सुटीला राखी अम्माकडं नव्या घरी यायची. पण एम. ए. ला असताना  राखीचं वारंवार घरी येणं-जाणं सुरू झालं. रजतनं अम्माला राखी आवडते असं सांगितलं. पण राखी लग्नाला तयार नव्हती. तेव्हा लेकाची बाजू घेऊन अम्मा समजूत घालायला घरी आली होती. बाबा आई नाहीच म्हणत होते. रजतवर राखीचा आजिबात विश्वास नव्हता. रोज नवी मुलगी सोबत असते त्याच्या. नात्याबद्दल आजिबात गंभीर नाही. हे सगळं वरवरचं कारण पण तिच्याही मनात कुठंतरी रजत रुजला होताच.
आधीच राघवकाका मॅनेजमेंटच्या भाडोत्री गुंडांकडून मारला गेल्याची पार्श्वभूमी घरी माहीत. त्यात रजत कम्युनिष्ट विचारसरणी सोडून भांडवलशाही कार्पोरेट जगात   स्थिरावू पहात होता. त्याचेही शत्रू कमी नसणार. शिवाय केरळी जावई पुन्हा. राखीच्या आईचा विवाह म्हणजे मराठीने केला बंगाली भ्रतार. घरात अजून धुमाकुळ .राखीच्या मोठ्या दोन बहिणीनी देखील बंडखोरीच केली होती.मोठी लोपा वकील होऊन गोवन मॅथ्यूच्या घरात गेली. मधली खादाड ग्रीष्मा हॉटेलवाल्या शिवानंद शेट्टीबरोबर बारावीतच पळून गेली. ग्रीष्माच्या पाठचा अखिल अमेरिकन ज्युलिया बरोबर अमेरिकेत संसार करत होता. एकंदर राखीच्या आईला जावई सुनांचं कसलंच अप्रूप राहिलं नव्हतं. त्यातल्या त्यात राखीला रीतसर मागणी घालायला अम्मा आली. राघवकाका आणि बाबा चांगले मित्र. दोघांची एकच पार्टी. दोघंही आपआपल्या क्षेत्रात युनिअनशी संबंधित. इतकं सगळं आईबाबांना सन्मानकारक होतं. ते हे लग्न होण्याची अनेक कारणं नातेवाईकाना देऊ शकत होते. आता बॉल राखीच्या कोर्टात होता.
राज्यशास्त्राच्या प्राध्यापक अम्मानं लेकासाठी खिंड लढवली. राखीनं लग्नाआधीच अम्माला बजावलं, मला पीजी, नेट सेट करून तुझ्यासारखं प्राध्यापक व्हायचंय. त्यात मदत करायची. जर नातं टिकलं नाही तर कडेपर्यंत तू सोबत राहायचं! सोबत अम्मा राहणारच होती. चार पोरांवर पत्ता नसताना आलेल्या , नकुशी असलेल्या राखीला अम्मानंच रजत सोबत सांभाळलं होतं. अम्मा स्वैपाक करताना राखी ओट्यावर बसून हादडत असे. रजत लोपाचा क्लासमेट. सात वर्षानी राखीहून मोठा. राखी घरी कमी आणि रजत बरोबर जास्त वाढली. अभ्यास ,गोष्टीची पुस्तकं त्याच्यासोबत वाचत असे.
त्यावेळच्या राखीच्या बोला फुलाला गाठ पडली. नात टिकलं नाही. राघवकाकासारखं युनिअन सांभाळेल, पक्ष वाढवेल वाटणाऱ्या रजतनं नवीन युनिट काढलं. पक्का भांडवलशहा झाला. जीवनशैली बदलली. मूळ स्वभाव तसाच राहिला. नवं नवं तत्वज्ञान मांडू लागला. पण त्यातला फोलपणा अम्मा दोन मिनिटात दाखवत असे. शिवाय दोघांच्या जॉइंट अकाउंट मधून न सांगता पैसे काढले जात होते. राखी वैतागत असे. रजतच्या धंद्याचे सुरवातीचे दिवस होते. मीता लहान होती. तिचं आजारपण, शाळेचे खर्चं आणि रजतच्या नव्या धंद्याचे खर्च याचा मेळ घालताना राखी शरीरानं, पैशानं आणि मनानंही थकत होती .रोज राखी आणि अम्माचं त्याच्याशी भांडण. धंद्यात जम बसू लागला तसा रजत या दोघीना  खर्चाचे तपशील न देता , घरची जबाबदारी न उचलता आपल्या अकाउंटला वेगळे पैसे शिल्लक टाकू लागला. अबोला वाढत गेला. कंपनीतल्या त्याच्याच वयाच्या  अकाऊंटस ऑफिसर गायत्रीबरोबर घसट वाढली. मीता अकरा वर्षाची असताना रजत आणि राखी वेगळे झाले. अशाच अम्मासोबत आर्थिक वादावादीनंतर तो अम्माच्या घरातून बाहेर पडला. दोन गल्ल्या सोडून पलिकडच्या तारा अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. रोज भेट व्हायची. हाय हॅलो होत होतं. पण अम्मा लांबच राहू लागली त्याच्यापासून. मीता दोन्ही घरी जायची. बाबाच्या दोन तीन मैत्रिणींची कौतुकं, भांडणं, हाणामारी वगैरेबद्दल तीच तर बातम्या आणायची.
मीता, राखीसारखी बुद्धिमान पण रजतची धरसोड वृत्ती आणि फटकळपणा होता. फटकळ कसली भांडकुदळ होती हे अम्माचं मत. अम्मा आणि मीताचा रोज वाद. समन्वयक म्हणून काम करताना राखी थकून जायची. तिचा थकलेला चेहरा बघून अम्माच रूममध्ये जावून बसायची. लेकीला चार वाजवाव्यात वाटायचं. तिचाही वाद व्हायचा लेकीशी.
'इथं त्रास होत असेल तर बाबाकडे जा!' दोघींनी सांगितलं. गेलीही राहायला. पण तिथंही बाबाशी वाद, भांडण.
रजतच्या आयुष्यात ठरल्यासारखी काही दिवसानी गायत्री आली, टिकली, त्याना एक मुलगी झाली. बाळंतपण राखी आणि अम्मानं केलं. नातेवाईक मित्रमंडळीत हा सगळा विस्मयाचा विषय होता. सवतींची भांडणं, कोर्टखटले ,वादावादी यातली काहीच मजा त्याना मिळाली नाही. गायत्रीशी मीताची त्यातल्या त्यात जवळीक. म्हणजे बेताचे वाद होते. अमृता तिची खूप लाडकी. बहिण म्हणून त्यांच्यात खास बाँड होता. गायत्रीची अमृता सातवीत असताना मीता एनएसडीत गेली. सगळे नको म्हणत असताना, शिकत असताना, लहान वयातच लग्न केलं. तेही वीस वर्षांनी मोठ्या प्रख्यात चित्रकार चारू बोसशी. खरंतर चारूही समजावत होता तिला कोर्स पूर्ण कर मग लग्नाचं बघू म्हणून. राखी, अम्मा, रजत तिघानी सर्वपरीनं समजावलं. शेवटी 'तू आणि तुझं नशीब!' म्हणत तिघानी नाद सोडला.

तसंच झालं.चारू मूडी आहे. पहिल्यासारखं चारू वेळ देत नाही.दोन दोन दिवस स्टुडिओमधेच राहतो. त्याच्यात हजबंड मटेरिअल कमी आहे .मूल कधी होणार मला? म्हणत दोन वर्षात सोडून दिला त्याला. डिवोर्स नाही, काही नाही. नेहमी प्रमाणं सगळ्याचं खापर आईवर. चारू आजही आला की अम्मा आणि राखीला भेटून जातो. हे तिला कळालं कि त्याचाही तिला राग येतो. भाषेमुळं चारू आणि राखीत एक खास बाँड. माँ चारूचंच ऐकते हे मीताच्या चिडचिडीचं एक कारण.
शेवटची पोळी तव्यात टाकतानाच फोन वाजला. मीताचा होता. काहीतरी मागणी असल्याशिवाय ती फोन करत नसे.

राखीनं गॅस बारीक केला आणि वादावादी होणार हे गृहित धरून कडक पोळी खायची तयारी ठेवली.
'मां, मला पैसे हवेत.'
'बाबाकडून घे. मला घराची दुरुस्ती करायचीय. आउट हाऊसचं प्लंबींग नवं करायचंय, जुने इलेक्ट्रिकल स्वीचेस बदलायचेत. मागच्या वर्षीच तुला एकदम लाखभर दिले. आता माझ्याकडे नाहीत.' राखी आवाज शक्यतो स्थिर ठेवत म्हणाली
'लाखभर रुपयाचं काय सांगतेस माँ! यावेळी मला बारा तेरा लाख हवेत. नवीन प्रोजेक्ट करतेय. लोन काढ. मी फेडीन. '
' तू बाबाला विचार.'
' कुठल्या तोंडानं विचारू? एक नवरा टिकवता आला नाही तुला. तू धड संसार केला असतास तर ही वेळच आली नसती माझ्यावर!'
'तू का नाही टिकवलास तुझा सोन्यासारखा नवरा?' राखीचा आवाज चढला. अम्मा बागेतला नळ बंद करून आत आली.फोन स्पीकरवर टाकायची खूण केली.
' तुझंच रक्त माझ्या अंगात. चुका झाल्यात तर तूच निस्तर. मला ताबडतोब बारा नाहीतर किमान दहा लाख तरी पाठव. 'मीताचा आवाज चढला.

' राखी, फोन बंद कर. ब्लॉक कर नंबर तिचा. ए पोरी, आजिबात फोन करायचा नाही आम्हाला. मी पोलिस कम्प्लेन करीन हं!' म्हणत अम्मानं फोन तिच्या हातून ओढून कट केला. राखी मटकन खुर्चीवर बसली. अम्मानं गॅस बंद केला. तव्यातली पोळी काळी कुळकुळीत झाली होती.
अम्मा बाजुच्या खुर्चीवर बसली. दोघी थोडावेळ काहीच बोलत नव्हत्या.

राखी, हे न संपणारं आहे सगळं ! पाठी येऊन छळीन पोटी येऊन छळीन. रजतचं छळणं संपलं तोवर ही तुझ्या राशीला लागली. '
' अम्मा, रजत खूपच बरा ग. इतकं छळलं नाही मला त्यानं. वाद व्हायचे. वैचारिक मतभेद होते. डिग्निटी होती त्याला. ही रजतशीही असंच टोचणारं बोलत असणार. '

' ते त्याचं तो बघून घेईल. आज युनिवर्सिटीत नॅक कमिटी येणार आहे ना! झाली का तुझी तयारी? तू जा अंघोळीला.'अम्मानं शिताफीनं विषय बदलला.

अम्मा विद्यापीठातून बाहेर पडली पण जाताना सुनेला डिपार्टमेंटला चिकटवला. राखीची नेट आणि पीएचडीही आपण असेपर्यंत पूर्ण करून घेतली. आज राखी प्रोफेसर आहे. तिची तुलना अम्माशी होते तेव्हा तिला खूप आनंद होतो.' नीरजा नायर मॅडमसारख्याच राखी मॅडमही आहेत,'
हे वाक्य कानात साठवून ठेवते राखी. अम्मासारखं होणं हे पद्मश्री, पद्मभूषण सारखं महत्वाचं वाटतं राखीला.

घरच्या कटकटीमुळं राखीनं विभागाध्यक्ष पद घेतलं नाही. फक्त शिकवत राहिली. आज सात मुलांना संशोधनासाठी मार्गदर्शन करतेय. सुट्टीच्या दिवशी अम्मासोबत सिनेमा बघायचा किंवा दोघी लाँग ड्राईववर जात. अम्मा नसती तर ? हा प्रश्न मनात आला कि राखी धास्तावायची. अम्माशिवाय जगणं ही कल्पनाच तिला सहन होत नसे. नकुशा पोरीचे लाड घरच्यापेक्षा अम्मानंच जास्त केले होते. अम्मानं घर बदलल्यावर दोघीना चुकल्यासारखं झालं होतं. आजही राखीला सासू जराही नजरेआड गेलेलं सोसत नाही.

'राखी, प्रशांतचा पन्नासावा वाढदिवस आहे. संध्याकाळी आपल्याला जायचंय बरं का त्याच्या घरी. सुषमाला जावून जेमतेम वर्ष झाल्यामुळं तो पन्नाशी साजरी करत नव्हता. लेकीनं गुपचुप घाट घातलाय.ती अमेरिकेला जातीय. त्याआधी बाबाची पन्नाशी सेलेब्रेट करायचीय तिला. तुला खास आमंत्रण दिलंय.'
अम्मा तिचं ताट वाढता वाढता म्हणाली.

प्रशांत, रजत-राखीचा ड्रामा ग्रूपचा मित्र. रजतनं कॉलेजमधे ज्युनिअर्सची  कितीतरी नाटकं डायरेक्ट केली. विलक्षण मंतरलेले दिवस होते ते. ते दिवस आठवले तरी राखी आजही अंतर्बाह्य मोहरून जाते. नाटकात प्रशांत हिरो होता.राखी प्रॉपर्टी सांभाळत असे. अभिनयाची आवड नव्हती पण नाटक तोंडपाठ होतं. आयत्यावेळी नायिकेचं काम करणारी मंजिरी दांड्या मारू लागली. रजतनं तिला काढलं आणि राखीला तिच्या मनाविरूद्ध उभं केलं. नाटक पाठ असणं आणि अभिनय या सुरुवातीच्या दोन वेगळ्या गोष्टी राखीच्याही नकळत एक झाल्या. स्पर्धेत नाटकाच्या वेळी शेवटच्या राखीच्या मोनोलॉगनंतर टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला आणि धावत येऊन रजतनं तिला अलगद  मिठीत घेतली.कौतुकानं पाठ थोपटली. आणि राखी अंतर्बाह्य बदलली.

या नव्या रजतनं तिचा ताबा घेतला. अर्थात ते सगळं क्षणिक होतं हे कळायला संसाराची बारा वर्षं जावी लागली. कुठलाही अनुभव सोसल्याशिवाय मिळतच नाही.
अंघोळ करून बाहेर येणारी राखी अम्माकडं रोखून बघू लागली. तशी अम्मा रस्सा पुन्हा गरम करायला उठली.

'अम्मा, मी थकलेय आता. नको नवीन लचांड माझ्या मागं लावू. आपण दोघी मजेत जगतोय ना ग!' राखी थांबत थांबत म्हणाली.

'मी किती दिवस पुरणार आहे तुला बाळा?' अम्मा पुटपुटली.

'अम्मा, माझं सोड.गायत्रीची तब्येत ठीक नसावी. कामत सरांनी परवा दोघाना टाटा मेमोरिअलला पाहिलं. फोन कर रजतला. विचार. अमू लहान आहे. कसं करत असतील ग सगळं! 'राखीनं शिताफीनं विषय बदलला.

'बघतील त्यांचं ते. तू नको पडू त्यांच्यात.राखी,प्रशांत आणि रजतमधे खूप फरक आहे. मला काळजी राहणार नाही.'
अम्मानं आपला मुद्दा दातात पकडून ठेवला होता.

' तू नको पडू त्यांच्यात' म्हणाली तरी अम्मा रजतला नक्की फोन करणार याची राखीला खात्री होती.

संध्याकाळी घरी आली तेव्हा गायत्री आणि रजत अम्माच्या खोलीत बसलेले दिसले. राखी अम्माच्या खोलीत डोकावत म्हणाली, तुम्ही दोघं चहा घेणार का? मी बनवतेय अम्मासाठी आणि माझ्यासाठी.

उत्तर न ऐकताच ती किचनमधे चौघांना चहा बनवायला लागली. पाठोपाठ गायत्री किचनमधे आली. खूप खंगली होती. अमूचा ड्रेस घातला होता.तोही डगळा होत होता. सगळीकडून हाडं दिसत होती. चेहरा ओढल्यासारखा झाला होता. अम्मा तिच्यासमोर तरुण वाटावी.
'किती नीटनेटकी छान राहायची ही!  काय अवतार झालाय हिचा.' राखी मनात म्हणत होती.

'काही खायला करू का ग?' राखीनं विचारलं. तिनं मानेनंच नको म्हणून सांगितलं.

'अमूचा अभ्यास काय म्हणतो?' राखी तिच्या तब्येतीचं विचारणं शक्यतो टाळत होती.
'करत असावी व्यवस्थित.' गायत्रीचं तुटक उत्तर.

चहा कपात गाळायला घेतला. शांतता राखीला असह्य झाली. तिनं ट्रे टेबलावर ठेवला. आणि गायत्रीच्या बाजूला बसली. तिच्या पाठीवर हात ठेवला.

'डॉक्टर काय म्हणतात? '
' युटेरस ...लास्ट स्टेज… रजत एकदम खचून गेलाय राखी…. अमूला कळालंय सगळं.. अमूपेक्षा रजतची काळजी वाटते…. अमुच्याही  बारावीची सुरुवात झालीय. आणि हे असं....'

गायत्रीला हुंदका फुटला. जणू पुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं गायत्रीनं एका दमात दिली. राखीला आधीच अंदाज आलेला होता. वय वाढल्यावरचं बाळंतपण, ओटीपोट दुखतं अशा तिच्या तक्रारी बऱ्याच वर्षापासून रजतकडून ती ऐकत होती. नुसती पेन किलर नको घेऊ. नीट दाखवून घ्या. तपासून घ्या सगळं! असा सल्ला अम्मानंही दिला होता. रजतचा व्याप आणि गायत्रीचं दुर्लक्ष यात गोष्टी या थराला गेल्या. आता पेन किलरही निकामी झाल्या.

'जगण्याची प्रबळ आशा आणि कारणं असणाऱ्या माणसाला असं क्षणोक्षणी डोळ्यासमोर मरण नको रे देवा!' राखी  तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

सावकाश उठत गायत्री बागेतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.

राखीच्या रूममध्ये रजत आला. किती थकल्यासारखा दिसतो हा. पंचावन्न छपन्न थकायचं वय नाही. कोणता न तुटणारा क्षीण धागा अजून शिल्लक आहे तेच राखीला कळत नव्हतं.
' अमुची काळजी नको करू रजत. फक्त गायत्रीकडं नीट लक्ष दे.'त्याचा हात हातात घेऊन म्हणावं वाटलं राखीला.

'राखी, मीतूची काळजी करू नको. मी देतो तिला पैसे. काय करायचंय करू देत तिला!' कॉटच्या बाजुच्या खुर्चीवर बसत रजत म्हणाला.

'ग्रेट रजत, इथं गायत्रीकडं बघवत नाही मला आणि तू मीतूचा काय विचार करतोस? 'राखीचा दबका स्वरही धारदार झाला.

'नको करू? मी तिचा बाप आहे. ती अशी का झाली विचार करतो तेव्हा चार बोटं माझ्याकडं वळतात. तिच्या अडनिड्या वयात मी घर सोडलं. कुणावर चिडावं हे न कळणारं वय होतं तिचं…'रजत बोलता बोलता थांबला.

' समोर तुम्ही दोघी होता. तुमच्यावर चिडायची सवय लागली तिला. माझ्याशी बोलतही नाही ती. अलिकडं अमृताशीही बोलली नाहीय. तिचे फोनच उचलत नाही ती. राखी, मला भयानक स्वप्नं पडतात. तिनं झोपेच्या गोळ्या घेतल्यात. पांढऱ्या चादरीत माझी मीतू! '
रजतचा गळा दाटून आला.
राखी बघतच राहिली. कुठं गेला याचा स्वार्थी स्वभाव, बिलंदरपणा? इतकं हळवं व्हावं यानं! पुरुषांनाही बायकांसारखा मेनोपॉज असतो कि काय? राखीच्या मनात विचार आणि हसू पाठोपाठ आलं. रजत आपल्याच तंद्रीत बोलत होता.

' तुम्ही दोघीही बोलत जा ग अधून मधून तिच्याशी. रिलॅक्स व्हायला ये म्हणावं इकडं. ती हळवी आहे खूप. जपायला हवं तिला.'

राखीला वाटलं आपण का बरं याच्यासारखा विचार नाही केला? गायत्रीसोबत मृत्युच्या छायेत याचा दिवस जातोय. म्हणूनच कदाचित उगीच हळवा झालाय मीतूबद्दल. असंही जन्मापासून मीतुचं सगळं अम्मानंच केलं. रजतशी लहान असताना मीतूची मस्ती चालायची तेवढीच काय ती. नंतर दोघांचे वादच व्हायचे. नेहमीचे सण, मीतूचा वाढदिवस वगैरे अम्माच लक्षात ठेवून साजरा करायची. तिचा अभ्यास ,तिचे छंद, तिच्याबरोबर खेळणं, तिचं वाचन याकडं अम्माच लक्ष पुरवायची. मीतू कशी घडली याचं उत्तर रजत किंवा राखी दोघांजवळ नव्हतं.
दरम्यान मीतूचा फोन आला. गायत्रीबद्दल कळालं तिला. फोनवरच रडत होती. मला पैसे नकोत पण मम्मीचा इलाज करा म्हणाली. अमूबद्दल खूपच हळहळत होती.

'इलाजापलिकडं गेलंय सगळं. आता वाट बघायची ती वेदनेतून मुक्त व्हायची.' म्हटल्यावर 'माँ, नको ना ग असं बोलूस!' म्हणताना तिला हुंदका फुटला.

नंतरच्या दोन दिवसातच मीतू आली. चिकार रडारड, सॉरी झालं. सगळ्याना कडकडून भेटली. अमूला फिल्म फेस्टिवलला घेऊन गेली.
बाबानं तिला प्रेमानं जवळ घेऊन सांगितलं.' तुला जे हवंय ते कर. मी आहे तुझ्यासोबत.'

मग पुन्हा रडारड, सॉरी. जाताना बाबानं नको नको म्हणत असताना अकाऊंटला ट्रान्स्फर केलेले पैसे घेऊन, नवीन प्रोजेक्टवर काम करायला गेली. जाताना 'चारूला उगीच सोडलं' म्हणून रड रड रडली. अम्मानं कपाळाला हात लावला.

राखी कशातच नव्हती. तरीही माघारी जाताना मीतूला राखी जवळ घेऊन म्हणाली,
'तुला हवं ते कर. चांगला पार्टनर शोध. धरसोड वृत्ती सोड. येत जा अधून मधून घरी. अम्मा, बाबा, मी सगळेच थकलोय. अमूला फोन कर. एकटी पडलीय. आपल्यात तुटलेपण नकोय आता.'

राखीचा समजावणीचा सूर
'माँ, मला चारूची खूप आठवण येते ग!' ती गळ्यात पडून हमसून रडायला लागली.

आधी स्वतःच त्याच्या गळ्यात पडली, मग त्याला सोडला आणि आता परत हे ..! काय करावं या पोरीचं!
' तू सांगितलंस का तसं त्याला? 'राखीनं विचारताच होकारार्थी मान हलवत हसली.

'ये परत भूतनी, असं म्हणतो तो!'तिच्या चेहऱ्यावर उदास हसू होतं.
राखीला कळून चुकलं कशीही असली तरी पोटचा गोळा आहे. जवळ घ्यावाच लागेल. तिच्या आणि चारूच्या नात्याबद्दल जेव्हा राखी अम्माशी चर्चा करत असे तेव्हा अम्मा या नात्याला भावनिक प्रेम म्हणत असे. दोन अपूर्ण माणसांचा संसार आहे तो असं तिला वाटे.

'तिला काय करायचंय ते करू दे. हे तिचं आयुष्य आहे .' असं अम्मा वारंवार राखीला सांगत असे. राखी मात्र मीतू आणि चारूच्या नात्यातल्या नेमक्या गुंतलेल्या धाग्याचा विचार करत राहायची. चारूबद्दल बंगाली म्हणून तिला विशेष ममत्व होतं. समंजस, प्रेमळ होता तो. राखीपेक्षा पाचेक वर्षानी लहान होता. एवढा मोठा चित्रकार पण पुण्यात प्रदर्शनासाठी आला की हॉटेलात न उतरता घरीच उतरायचा.अम्मा, राखी आणि त्याच्या गप्पा रंगायच्या.

                               2

ल्ली राखीला घरी दारी सगळीकडेच अस्वस्थ वाटत होतं. घरी रजत, अमृताच्या चेहऱ्यावरची उदासी छळत होती. मरणाला सामोरी जाणारी गायत्री दर दिवशी केविलवाणी, भेसूर दिसत होती. वेदना सहन होत नव्हती. ओरडायची. डोकं आपटायची. रजतला असह्य व्हायचं. गायत्रीत इतका गुंतला होता, त्यांचं समृद्ध सहजीवन पाहून पूर्वी राखीला हेवा वाटायचा. हल्ली उदास वाटत होतं तिलाही. पुरुषासारखा पुरूष पण हल्ली रजत अम्मा जवळ येऊन रडायचा. अबोल अम्माचे भकास डोळे बघून गायत्रीला खूप वाईट वाटत असे. किती दुःख पचवायचं अम्मानं तरी!

अमृताला परीक्षेला अम्माच सोडून येत होती. पूर्वी युनिवर्सिटीत अम्मा ये जा करायची. युपीएससी कोचिंग क्लासमधे राज्यशास्त्राची लेक्चर्स घ्यायची. पार्टी मिटिंग्जना जायची. गेली दोन चार वर्षं सगळंच थांबवलंय तिनं. राखीला भिती वाटायची ही हळूहळू सगळ्यातून विरक्त होतेय की काय!

रजत गायत्री हॉस्पीटलच्या वाऱ्या करत होते. अमृता तिच्याकडेच राहात होती. नको म्हटलं तरी कामात मदत करायची. अम्माच्या अवतीभवती राहायची. रात्री अम्माच्या रूममध्ये झोपायची. आता घरी गेलीय. पण दररोज संध्याकाळी इकडे येते. घरी गेल्यावर हल्ली चहा तिच्याच हातचा मिळतो. पोरीनं सगळं समजुतदारपणे स्वीकारलं.

मीता चारूकडे पुन्हा गेली. चारू दोन वर्षासाठी एका प्रोजेक्टच्या निमित्तानं पॅरीसला गेला. मीताही एका फ्रेंच थिएटर ग्रूप प्रोजेक्टवर काम काढून सोबत गेली हे विशेष.

विद्यापीठातही फारसं उत्साहवर्धक काहीच घडत नव्हतं. तिचे दोनतीन विद्यार्थी सोडले तर कुणाचं काम पुढं सरकत नव्हतं. आवारात शिरलं की मोर्चे, आंदोलनं, धरणं, दंगे हेच बघावं लागत होतं. कालच तिच्या डिपार्टमेंटच्या एमएच्या एका हुषार विद्यार्थ्यानं विद्यावेतन बंद झालं म्हणून हॉस्टेलमध्ये विष घेऊन आत्महत्या केली.आणि स्टाफरूममधे सातव्या वेतन आयोगाची चर्चा. सगळा आनंद आहे ! विसंगतीतच जगावं लागत होतं!

राखी कोणत्याही चळवळीत, भाषणबाजीत उतरत नसे. आपलं काम भलं आपण भलं. वाचन, लेखन, अम्माशी चर्चा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, एमए, एमफिलचे वर्ग घेणं. रिसर्च पेपर लिहिणं, सगळं यंत्रवत आयुष्य. पण कालच्या मंगळवेढ्याच्या रवीच्या आत्महत्येनं मन ढवळून निघालं. कुणी म्हणे रवीकडं पैसे नव्हते. गावी जाऊन रोजगाराचं काम करायचं नव्हतं. वडील उसतोडणीवर जाताना ट्रेलरवरून तोल जावून डोक्यावर पडले आणि गेले. आई बहीण उघड्यावर आल्या. कुणी म्हणे त्याचं सफाईच्या तक्रारीवरून वॉर्डनशी भांडण झालं तर नक्षलवाद्यांशी संबंध आहेत म्हणून पोलिसानी उचललं. त्यामुळं आत्महत्या केली. तर कुणी म्हणे प्रेमप्रकरण असावं. एक दोनदा गर्ल्स हॉस्टेलसमोर पोरीबरोबर बोलताना रेक्टरनं झापलं होतं.खरं खोट तोच जाणे. एक जीव अकाली गेला. एक अध्याय संपला.

डिपार्टमेंटमधे शिरताना सहज तिचं लक्ष बाजुच्या हिरवळीकडं गेलं. तिथं कोपऱ्यात नेहमी तिच्या डिपार्टमेंटची एकदोन पोरं कँटिनवाल्या मामांच्या डब्याची वाट पहात असायची. आज कोणीच दिसत नव्हतं. गेटवर मामाच भेटले. राखीनं विचारलं,
'काय मामा , आज डबे दिसत नाहीत?'

'मॅडम, पोरांचे पैसे बंद झाले आणि माझे डबे. गरीब पोरं कुठून कुठून येऊन शिकत होती. तेवढाच त्याना आणि मलाही आधार होता. तुमचीच दहा बारा पोरं होती. आता चारच आहेत.' डबे खाली ठेवत मामा म्हणाले.

'दोन वेळच्या जेवणाचे किती द्यायची हो पोरं?' राखीनं तिथंच थांबून सहज विचारलं.

' लोणचं, आठवड्यातनं एक दोन दिवस लोणच्याऐवजी पापड ,वाटीभर भात, फोडणीची डाळ, तीन चपाती, सुकी भाजी एवढं एकावेळी तीस रूपये. यातही मॅडम अॅडजस्ट करून दोन पोरं जेवायची. एक सकाळी चपाती खायचा, दूसरा रात्री. मलाच पोटात कालवायचं हो!'
मामा सुन्नपणे म्हणाले.

राखी केबिनमधे आली. तिला मीताची दहा लाख तरी दे, लोन काढ, गर्जनेची आठवण झाली. इंडिया आणि भारत आहेच. ती कुठल्याच विचारधारेची नव्हती. पण आज तिला पै न पै चा विचार करणाऱ्या, गरजवंताना पैसे विनाअट वाटून टाकणाऱ्या अम्माचा विचार खरा वाटत होता.
माणसाचे स्तर वेगळे, समस्या वेगळ्या, पण घालमेल, वेदनेची झळ, दाह सारखाच.
'मॅडम, दोन मिनिटं केबिनमधे येता?'
विभागाध्यक्ष आनंद साठे सर तिच्या टेबलाजवळ उभे होते. कधीही सरानी शिपायामार्फत तिला बोलावलं नाही .स्वतः येऊन सांगायचे. साठे सर राखीचे पीएचडीचे विद्यार्थी. राखीनं विभागाध्यक्ष पद नाकारलं आणि अनेकाना मागं सारून साठे सर विभागाध्यक्ष झाले. साठे आडनावावरून जातीची अटकळ आणि विसंगत वास्तव याची खवचटपणे चर्चा चाले. गुणवत्ता पुरेपूर असूनही स्टाफरूममधे त्यांच्या जातीची, राखीच्या वशील्याची चर्चा व्हायची तेव्हा राखीची प्रचंड चिडचिड व्हायची.

केबिनमधे बसताच तिला सरानी रवीशी झालेल्या पंधरा दिवसापुर्वीच्या  संभाषणाचा तपशील  ऐकवला. तिला धक्काच बसला .बाहेर त्याच्या आत्महत्येची इतकी कारणं ऐकली त्यात अजून एक भर .रवी हुषार होता. एम.ए. ला गोल्ड मेडलसाठी  धडपडत होता.त्याला पेपर तपासणीत जाणून बुजून  स्टाफनं तिसरा ठेवला. तिच्या
Fundamentals विषयात तोच टॉपर होता. त्यानं दिलेली उदाहरणं ,विश्लेषण अप्रतिम , वास्तववादी तरीही नाविन्यपूर्ण होतं. बाकीच्या स्टाफनी जाणून बुजून त्याला तिसरा ठेवला. खरंतर त्याची मांडणी सर्व पेपरमधे चोख होती. मातृभाषेतल्या शिक्षणाचा प्रभाव हस्ताक्षरात जाणवत होता इतकंच. पण नवीन काहीही नसूनही फक्त भाषा आणि प्रेझेंटेशनच्या जोरावर उरलेले दोघे वरचढ ठरले. मूळात शिक्षकानी  प्रेझेंटेशन इतकंच ज्ञान ही तपासायचं असतं.  रवी मंगऴवेढ्याच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून इतका पुढं आला याचं कौतुक फक्त राखी आणि सरानाच होतं. स्टाफरूमच्या चर्चा  राखी नेहमीच ऐकत असे. मनात म्हणतही असे उदात्त पेशा असला तरी उदात्त विचार असतातच असं नाही .

रवी पहिला येणं शक्यच नव्हतं. तिची सरांशी हॉस्टेल, विद्यार्थ्यांचा स्टायपेंड या विषयावरही चर्चा झाली. सगळं निराशाजनक होतं. तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. अम्माचा सल्ला घेतला पाहिजे .

'हे असं काठावर राहून बघत राहणं नाही चालणार .आता यात उतरावंच लागेल!' म्हणत राखी घरी आली.

                                     3

रीआल्यावर तिच्या चेहऱ्यावरूनच काहीतरी बिनसलंय हे अम्मानं ओळखलं. चहा घेता घेता तिनं विद्यापीठातल्या घडामोडी सांगितल्या. अम्मा शांत होती. राखीला अम्माकडून समस्येवर भाष्य हवं होतं. अम्मा काहीच बोलत नाही हे पाहिल्यावर राखीनंच प्रश्न केला .
अम्मा, आपण काही करू शकतो का?
म्हटलं तर खूप काही आणि नाही म्हटलं तर काहीच नाही अम्मानं तुटक उत्तर दिलं.
राखी ताडकन उठून तिच्या रूममधे गेली. डोकं भणभणायला लागलं. अम्माचाही राग येऊ लागला.
अम्मा पाठोपाठ रूममधे आली. तिच्या शेजारी खुर्चीवर बसत म्हणाली, तुला ही समस्या नेमकी कशी सोडवायचीय राखी . समाजवादी ,सर्वोदयी,कम्युनिष्ट पद्धतीनं कि अन्य कोणत्या पद्धतीनं ?

अन्य कोणती पद्धत म्हणजे कोणती हे आता राखीला चांगलंच माहीत होतं. हाडाची कम्युनिष्ट अम्मा स्वतःच्या विचारधारेतल्या तृटीही बेधडक सांगायची. ती संघाचं थेट नाव घेत नसे. अम्मा वेगवेगळ्या विचारधारेवरच्या चर्चा नेहमी करायची. तिच्या मते समाजवादी पद्धत म्हणजे उत्तम पेपरवर्क, प्रेझेंटेशन.  पण ऑल लीडर्स नो फॉलोअर्स. सर्वोदयी पद्धत म्हणजे मुकाट्यानं न बोलता काम करत राहणं. थेट घाणीत हात घालणं पण पुढची फळी तयार करण्यात अनास्था. स्वयंस्फुर्तीने कार्यकर्ते यावेत ही अपेक्षा. कम्युनिष्ट पद्धत म्हणजे धडामकन उतरणं. दोन माणसातला फरक लक्षात न घेता सरधोपट पद्धतीनं समस्या हाताळणं आणि इतर पद्धत म्हणजे त्यांच्यातूनच समन्वयक घडवत मूळ समस्या सोडवतानाच आपला छुपा अजेंडा माथी मारणं.

'हे बघ राखी,आउट हाऊसमधे पाच एकजण ठेवू शकतो. शक्यतो मुलीच.जेवणाचीही व्यवस्था करता येईल दोन वेळच्या. शिधा देऊ .त्यानाच शिजवावं लागेल .त्याना आजच्या जगात जगण्यासाठी तयार ही करता येईल. पण सगळं आयतं नाही देऊ शकत .त्यानाही मेहनत करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांचे भाग्यविधाते नाही. त्यामुळं फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत . आणि त्याना गृहितही धरता येणार नाही. बघ कसं करता येईल ते. शिवाय तुझी स्वच्छतेची इंद्रियं आणि एकंदर स्वभाव बघता तू नीट विचार कर .तुझी घाणीची इंद्रियं नको इतकी तीव्र आहेत . तुलाही बदलावं लागेल .'

सलग बोलल्यामुळे अम्माला दम लागला. पाणी द्यायला राखी उठली . कानात अम्माचं स्वच्छतेची इंद्रियं  घण घातल्यासारखं वाजत होतं. जुनी काळजात रुतलेली आठवण वर वर येऊ लागली.

पाणी देता देता राखी थबकली.तेवढ्यात राखीचा फोन वाजला . भरलेला ग्लास अम्माच्या हातात देत तिनं फोन उचलला.रजतचा होता.
गायत्री दहा मिनिटापूर्वी गेली. आता रात्र झालीय . फॉर्मॅलिटी पूर्ण करून मी आणि अमृता सकाळी गायत्रीला घरी घेऊन येतोय. तिचं सगळं विधीवत शास्त्रानुसार करायचंय मला. ती एकदा बोलताना तसं म्हणाली होती. बोलता बोलता रजत थांबला, आवंढा गिळत म्हणाला,
काय काय तयारी लागेल अमुच्या मोबाईलवर कळव म्हणावं अम्माला. आणि हो अम्माला विचार तिकडे आणू कि तारा अपार्टमेंटमधे नेऊ बॉडी.... सॉरी गायत्रीला ?रजतचा आवाज बदलला. गायत्रीला बॉडी म्हणताना किती यातना होत होत्या रजतला.

किती जीवघेणा प्रश्न विचारला रजतनं? राखीला हुंदका फुटला. फोन अम्माकडं दिला. रजतचं विश्वच उध्वस्त झालं होतं. गायत्री आणि रजत केवढा खास बंध होता. समृद्ध सहजीवन होतं त्यांचं. मी त्याच्या आयुष्यात आधी आले नसते तर आज इथं गायत्री असती. आणि तिला तारा अपार्टमेंटमधे न्यायचं की इथं आणायचं प्रश्नच उरला नसता. राखीला अश्रू अनावर झाले.

'इथेच या' असं फोनवर सांगून अम्मानं फोन ठेवला. देवघरात गेली. थोड्याच वेळात देवघरातून अम्माचा टीपेचा पण थरथरता आवाज ऐकू येऊ लागला.

भगव्दगीता किंचिद्धीता
गंगा जल लव कणिका पीता
सकृदपियस्य मुरारीसमर्चाम्
तस्य यमः किं कुरुते चर्चाम्

राखी स्वतःला सावरत उठली.आणि फोनवर नातेवाईकाना कळवायला सुरूवात केली. दोघी रात्रभर खुर्चीवरच बसून राहिल्या.
पहाटे अम्मानं राघवकाकाच्या खोलीतून विणलेली  बाज काढून अंगणात आणली. भराभर फोन करून सवाष्णीचीं लेणी आणवली. सुगंधी आयुर्वेदिक वनस्पती पोटमाळ्यावरच्या पिशवीतून काढल्या आणि परसातल्या तांब्याच्या बंबात पाणी आणि वनस्पती टाकून ढलप्या ,बंबगोळ्यानी बंब पेटवला. सुरवातीचा धूर जाऊन आता बंब व्यवस्थित पेटला. संथपणे तापत राहिलं पाणी. वनस्पतींचा सुगंधी पण तीव्र गंध वातावरणात भरला.
सगळं अम्मा एकटी करत होती. राखीला कानकोंडं झाल्यासारखं झालं.अपराधी भावना दाटली. तीच दाबून काळजात झाकलेली जुनी आठवण अनेकपदरी आवरणं फाडत वर आली…..
अमू दहावीत असताना गायत्री खूप आजारी होती म्हणून तारा अपार्टमेंटमधे बघायला गेलेल्या अम्मानं तिला, रजतला आणि अमृताला घरी आणलं . गायत्रीला मीतूच्या रूममधे ठेवलं . दोघींच्या घरात अचानक तीन माणसं वाढली. गायत्रीच्या अंगभर पसरलेली दुर्गंधी हळूहळू घरभर वाढली. राखीची चिडचिड, तिरस्कार ,रूममधे स्वतःला बंद करून घेणं अम्माला दिसत होतं. राखी जेवणासाठीही रूमबाहेर आली नाही. अमृता केविलवाणी झाली. रजत ही गप्पगप्प झाला. तिला पुन्हा तारा अपार्टमेंटमधे न्यावं अशी बाप लेकीची कुजबुज सुरू झाली आणि अम्मा राखीच्या रूममधे संतापानं शिरली .
राखीसमोर उभी राहिली .तिला विचारलं 'राखी,नक्की त्रास कसला होतोय तुला? दुर्गंधीचा? सवत आजारी पडून इथं आलीय याचा कि तुझ्याशिवाय सर्वजण तिची इतकी काळजी घेतायत, जपतायत तिला याचा?
राखीला हा हल्ला अनपेक्षित होता. तिलाही नक्की कळत नव्हतं कशामुळे चिडचिड होतेय ते.
उद्या माझ्यावर, तुझ्यावरही अशी वेळ येऊ शकते. आपल्यापैकी कुणाचीही अशी अवस्था होऊ शकते . माझीच झाली तर तू काय करणार ग बाई माझं ? राखी, माझ्या माघारी तुझं तरी कोण करणार ग?

अम्मा खुर्चीवर बसली . दीर्घ श्वास घेतला. आणि बोलू लागली.
दुर्गंध म्हणजे तरी काय ग ! एक वेगळा रंग ,गंध ,द्रव एवढंच. लहान लेकराना बघ कधीतरी. त्याना कशाचाच फरक पडत नाही. सगळं सारखंच त्याना. माणसाचं मन निर्मळ असावं ग. राखी, सोड ही कोती वृत्ती. ही दळभद्री वृत्ती आपल्या मुक्तीची वाट बिकट करते ग ! अम्माचा कंठ दाटला.
ती जाणार आहे. राहणार नाही ती . आज जाईल किंवा वर्ष दोन वर्षात जाईल पण मरण अटळ आहे तिचं. तिचं जाणं मला सुसह्य करू दे बाई. तू हवं तर युनिवर्सिटी गेस्टहाऊसवर जा रहायला किंवा क्वार्टर्स घे. सहज मिळेल तुला.; दबक्या पण टोकदार आवाजात म्हणत धाडकन दार ओढून अम्मा तरातरा बाहेर निघून गेली.
पहिल्यांदा अम्माचा हा पावित्रा बघून राखी हादरली. एका क्षणात भानावर आली. दार उघडून बाहेर आली.
अम्मानं गायत्रीला स्वच्छ सुगंधी तेलानी मालीश करून तिच्या साठवणीतल्या आयुर्वेदीक वनस्पतीनी उकळलेल्या पाण्यानी अंघोळ घातली. तिचं अंग मऊ सुती साडीनं स्वच्छ पुसून,अंगभर पावडर टाकून  हलका गाऊन चढवला. घरभर धूप फिरवला.वातावरण एकदम  बदललं. स्वतः तिच्या जवळ बसून अम्मानं तिला मुगाचं कढण चमच्यानं पाजलं. राखी सगळं मुकाटपणे बघत होती.
त्यारात्री राखीला इतकं अपराधी वाटत होतं. झोप येत नव्हती. आपलं खरंच खूप चुकलं याची जाणीव सारखी होत होती. गायत्रीच्या मरणाचं राखीला भय वाटू लागलं.
त्या रात्री एकच्या सुमारास ती जागी झाली . खिडकीतून पाहिलं. पंपरूमजवळच्या आंब्याच्या झाडाभोवती बांधलेल्या पारावर अमृता आणि रजत बसले होते. वातावरण शांत होतं.वाऱ्यासोबत पानांची सळसळ होत होती. चांदणं होतं .पंपरूम बाहेरच्या बल्बचा प्रकाश अमृताच्या चेहऱ्यावर पडला होता. रजतच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडत होती. रजत तिला थोपटत होता. समजूत काढत होता. राखीला असह्य झालं. माणूस म्हणून स्वतःची लाज वाटू लागली. काय केलं मी हे! असा विचार मनात तीव्रपणे उफाळला. ती तिथं गेली.रजत, अमृताच्या पायाजवळच्या दगडावर जाऊन बसली. तिचे डोळे भरले .' सॉरी रजत ,सॉरी ग अमू!' एवढंच भरलेल्या गळ्यातून फुटलं. रजतनं अमृतासारखंच तिच्याही डोक्यावर हात ठेवून तिला थोपटलं.
राखी त्या आठवणीतून बाहेर आली.अम्माजवळ गेली.अम्माला विचारलं काय काय आणि कसं कसं करायचं ते. हाताला धरून अम्माला खुर्चीवर बसवलं आणि तिच्या पायाशी बसत अम्माला म्हणाली, अम्मा, मी एकदा चुकले.परत परत तीच चूक नाही करणार .देहाची घृणा मी कधीचनाही करणार. प्रॉमिज अम्मा .फक्त मला एक संधी दे प्लीज !  अम्मानं थरथरत्या ,सुरकुतलेल्या हातानं राखीच्या दोन्ही गालावरून हात फिरवले आल्याबल्या केलं आणि उदास हसली.
बंबगोळे आणायला आत जाताना तोंडानं सुरूच होतं तिचं
पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरेशयनं
इहं संसारे खलु दुस्तारे
कृपयापारे पाहि मुरारे

आठच्या सुमारास अँब्युलन्समधून गायत्रीला आणलं. रजतच्या युनिटचे लोक, तारा अपार्टमेंट मधले शेजारी, गायत्रीचे जवळचे एकदोन जण जमले. बाजल्यावर मऊ दुपटं टाकून गायत्रीला त्यावर ठेवलं. अम्मा सांगेल तशी राखीनं गायत्रीला अंघोळ घातली.अंग केस कोरडे करून वेणी घातली,गजरा माळला,साडी नेसवली, सौभाग्य लेणी घालून  करून सगळा साजशृंगार केला. चालता बोलता देह निर्जीव, थंडगार, कडक झाला होता. राखीचा हात थरथरू लागला. तिचं अंघोळ घालणं, सजवणं या सगळ्याच्या पल्याड गेली होती गायत्री. समजुतदार जीव. कायमच तिनं राखी समोर दुय्यमत्व समजुतदारपणे स्वीकारलं होतं. तिच्या नजरेत अम्मा, राखीबद्दल स्नेह, कौतुक, कृतज्ञता असायची. राखीला आतून भरून येत होतं. ही सेवा, गायत्री श्वास घेत असताना, जिवंत असताना करण्याची तिला परमेश्वरानं संधी दिली होती. ती गमावल्याची बोच दाटून आली. राखीला हुंदका फुटला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच ती इतकं हंबरडा फोडून रडत होती. आपल्या कोशातून बाहेर येत होती. आत दाटलेलं सगळं बाहेर येत होतं.

अनावर राखीला सावरायला रजत पुढं येत होता. अम्मानं त्याला थांब अशी खूण करत अडवलं. अमृता धावत येऊन राखीला बिलगून रडू लागली. राखीला अजूनच रडू फुटलं. तिनं अमृताला कुशीत घेतलं. ती अम्माकडं बघत भरलेल्या आवाजात रडतच  म्हणाली,
अम्मा , गायत्रीला मला माफ करायला सांग. अमूची काळजी करू नको म्हणून सांग . तुझं ऐकेल ती.

ऐक ग पोरी, अमू, रजत कुणाचीच काळजी करू नको. शांत हो. मुक्त हो पिंडातून ; अम्मा थरथरत्या हळू आवाजात गायत्रीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. पण वातावरणात तिचा हळू थरथरता आवाज घुमला. झाडावरच्या पक्षानी एकच कलकलाट सुरू केला.
राम नाम सत्य है!म्हणत गायत्रीला उचललं . अँब्युलन्स गेली .वातावरणात अम्माच्या भजगोविंदम् मूढमतेचा घोष गुंजत राहिला.

राखीला आपल्यात अंतर्बाह्य काहीतरी बदलून गेलंय याची जाणीव झाली. घृणा, अहंकार, अलिप्तता,भय एक एक पदर गळून पडले होते. नवा जन्म झाल्यासारखं वाटत होतं. बिलगलेल्या अमृताला जवळ घेऊन थोपटताना मन एकदम हलकं झालं. तीही अम्मासोबत हळूवार आवाजात गुणगुणू लागली भज गोविन्दम् मूढमत

स्वाती ठकार
(कथा 2019 च्या चिंतन आदेश दिवाळी अंकात प्रकाशित.)


No comments:

Post a Comment