Friday, November 20, 2020

साँझ भई घर आ जा रे पिया

 


साँझ भई घर आ जा रे पिया !


दिवाणखान्यात आरती बसली होती .सहज तिच्या मनात विचार आला .
"अलिशान कोठी ,फर्निचर तशीच मी पण सजवलेली गृहस्वामिनीची मूर्ती  !..यापेक्षा माझे वेगळे अस्तित्व आहेच कुठे ?खरच माझं  एखाद्या निर्जीव वस्तू इतकंच अस्तित्व आहे ?लग्नानंतरच्या पंधरा वर्षात माझ्यातील गायिका ,भावूक व्यक्ती अशी कशी मरून गेली ?"
 वयाच्या सातव्या वर्षापासून आरती गायला लागली .घरी गाण्याचं वातावरण नव्हतं...पण स्पर्धेत  मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेमुळे दमेकरी बाबांच्या रेल्वेतील कारकुनी संसारात पिचलेल्या आईची महत्वाकांक्षा वाढली आणि कुणाच्या  तरी सल्ल्यामुळे शास्त्रीय संगीत  शिकायला सुरवात झाली ..बदलीमुळे बदलणारे गुरु ,बदलणारी शैली सारे स्वीकारत तिचा सांगीतिक प्रवास छान सुरु होता . सांगलीला दादासाहेब इनामदारांनी ठेवलेल्या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात ती जोशीबुवांच्या मागे तानपुरा घेऊन बसली होती ...बुवांनी मधेच एक बंदिश तिला गायला दिली आणि दादासाहेबांनी माहिती काढून त्यांच्या निखीलसाठी मागणी घातली ...एम बी ए झालेला निखील देखणा होता. कर्तबगार होता ..हं ..थोडं   वयात अंतर होतं...

"दहा वर्षाचं अंतर म्हणजे काही जास्त नाही ...पुन्हा इतकं गडगंज स्थळ मिळणार आहे का तुला ?आणि राजूच्या पुढच्या शिक्षणासाठीही त्यांची मदत होईल .तुझ्या बाबांच्यान अजून कितीशी नोकरी होईल कुणास ठाऊक ?"..आईच्या म्हणण्यात व्यवहार असला तरी तिलाही वस्तुस्थितीची जाण होती .दादासाहेबांच्या सारखा रसिक गानप्रेमी सासरा ही जमेची बाजू होतीच ना!

पण दोन वर्षात निखिलचा अरसिक पणा, वयातील अंतर !देह- मनाचे सूर न जुळणे यातून एकटेपण आणि नैराश्य कायमचे सोबतीला आले .गेली  दहा वर्षे रियाज पूर्ण थांबला होता.

 " हे असं किती दिवस चालायचं?जरा स्वतःकडे बघ " म्हणत आरती उठली आणि आरशासमोर उभी राहिली ..एक पांढरा केस डोकावत होता ...'तेहतीस संपतील आता आपल्याला !आपलं आयुष्य म्हणजे बिग झिरो ! 'म्हणत ती स्वताशीच हसली ..

 'आज निखील मुंबईत असेल !...त्याची सेक्रेटरी माया  सोबत असेलच !मिटिंग संपली तरी तो काही आज काही यायचा नाही ...चांगलंच आहे ...!'म्हणत ती आवरून  पार्लर मध्ये गेली ..जरा केसांना ट्रीटमेंट दिली .फेशियल वगैरे करून थोडक्यात दोन हजाराचा चुराडा करून घरी आली ...नाहीतरी हिशोब विचारणारं तरी होतं कोण ? फार तर फार  सासूबाई म्हणतील," जाऊ दे हिला मुल ना बाळ..तेवढंच स्वतःत तरी रमते बिचारी !"यात कणव कमी बोचकारणं जास्त असलं तरी तिला त्याची सवय झाली होती .उलट बोलणं माहित नाही ...हसणं तर ती विसरूनच गेली होती .

 घरी आल्यावर आरशासमोर उभी राहिली आपल्याच प्रतिमेकडे पाहत म्हणाली ,"इतकी  काही वाईट दिसत नाही मी !नियमित पार्लरला जायला हवं..एवढं खरं!  " अलिशान पेंट हाउसमध्ये   ती आणि निखील दोघेच राहत .आजही तिला प्रश्न पडत असे कि आपण तीन   खोल्यांच्या घरात,माणसांच्या खुराड्यात , सगळ्या अडचणीत सुखी होतो कि आता एकटे  या ऐश्वर्यात ?  निखील ,माळी ,कामवाली यांच्याशी जुजबी बोलणे व्हायचे बाकी तिचा मुक्त संवाद स्वतःशीच असायचा.

 "आज जरा गळा घासून बघायचा का आरती!" ती स्वतःलाच म्हणाली आणि तानपुरा काढून बसली ...पण तानपुऱ्याच्या तारा सैल झाल्या होत्या ..

"आरती तानपुरा दे आवळून देतो ...अशी कशी ग तू ...!त्यापेक्षा सरळ मशीनवर रियाज करत जा... "  तिला बुवांच्या कडे येणारा जयू  आठवला ....तिने तानपुरा गवसणीत घालून उचलून ठेवला ...बेडरूम मध्ये जाऊन पडली ...नकळत पूर्ण भरलेल्या  जखमेच्या  खपलीचा  थरावर थर निघत जाऊन अगदी आतपर्यंत टोचले जाऊन जखम पुन्हा भळभळू लागली ....आरतीचा कंठ दाटून आला ...

 "मूर्ख आहेस आरती तू ? इतकी कशाला घाई करतेस लग्नाची ? अठरा वर्षाची  तरी आहेस का तू ?किती लहान आहेस ?आवाज छान आहे ..रियाज कर ...तुम्हीच सांगा ना बुवा हिला !...किती ब्राईट फ्यूचर आहे हिला ? ही शोभेची बाहुली होऊन जाईल हो !...

 " अरे जयू,पालक मुलीचे भलेच करतात रे ...दादासाहेब हिचे गाणे कशाला थांबवतील ?..."

 एखाद्या भविष्यवेत्त्यासारखे जयू बोलला तसेच झाले ...तो मात्र कुठच्या कुठे पोहोचला .. त्याला भेटून ही झाली चौदा एक वर्षे..लग्नानंतरच्या वर्षी बुवांच्या कडे गुरु पौर्णिमेच्या वेळी भेट झाली ...गेल्या पाच दहा वर्षात सांगलीला निवांत असे जाणे  झालेच नाही .तिनेच जणू बाहेरच्या जगाशी संबंध तोडला होता .

 दादा साहेबांनी गाणे नाही थांबवले ..तिनेच थांबवले ...कारण गाणे फक्त दादासाहेबानाच आवडत होते ....आता तर तेही गेले ...मोठ्या जावेकडे वंशाचा दिवा आहे ...सासूबाई तिकडेच सांगलीला ..

 "काय करत असेल निखील मुंबईत ?"सहज तिच्या मनात विचार आला .राग, द्वेष, असूया, मत्सर, विषाद, यातले काहीही न वाटता फक्त एक कुतूहल वाटत होते ...मूल बाळ  नसल्याचे त्याने कधीच जाणवून दिले नाही ,कधी टोचून बोलला नाही कधी गाण्याचे कौतुक ही केले नाही सदैव आपल्या व्यापात ...

 ती एकदम दचकली '...आपण तरी त्याच्या कामात कुठे लक्ष दिलेय ...?कधी कौतुक केलेय ...?शृंगाराच्या अपेक्षामध्ये वयाचा फरक अडसर होऊन येत होता...आपण तरी कुठे दोन पावले पुढे टाकली ....?त्याचीही घुसमट होत असेलच ...!जसा हा विवाह आपल्यावर परिस्थितीने लादला तसाच त्याच्यावरही ...!

 या तिन्ही सांजेला एक विलक्षण हळवेपण ,एकाकीपण जाणवतेय म्हणत ती किचन मध्ये आली ..चहा करून घेता घेता"काहे मान करो सखी री अब "म्हणतानाच एक तान सर्रकन  हवेत गेली .आणि आरती आनंदाने शहारली ...आहे ... गाणे अजून आहे माझे ! म्हणत चहाचा घोट घेता घेता तिने पेपर उघडला ...दैनंदिनीवर नजर गेली

 "जयपूर  घराण्याचे जयदेव जोशी यांचे गायन आज अम्फी थियेटर मध्ये ...वेळ -६.वाजता ."ती घाईघाईने उठली साडेसहा झाले होते '..कार्यक्रम कुठे वेळेवर सुरु होतात ?..' आजच जयुची आठवण व्हावी आणि भेटण्याचा योग यावा ,काय योगायोग आहे आज ...नारायणा, तू ग्रेट आहेस ... !'म्हणत आवरून हॉलवर पोचली .बऱ्यापैकी गर्दी होती ..ती मागेच बसली ...पडदा उघडला ...जयदेव ...तिचा जयू  .. तिच्यापेक्षा चार वर्षाने मोठा ...खूप छान गायचा ...बुवांची पद्माताई त्याच्या वर्गात  होती ... पद्माताई तिला शिकवायची ...त्याला आणि पद्मा ताईला मात्र  बुवा शिकवायचे .

 " नमस्कार ,श्रोतेहो ,आज गाताना मला विशेष आनंद होतोय माझी गुरु ,माझी पत्नी पद्मा समोर बसली आहे ."त्याच्या लग्नाचे तिच्या कानावर आले होते तेव्हा इतके जाणवले नाही ...पण आता मात्र आत कुठेतरी जाऊन टोचले ...

 ".....काही राग आम्ही पंडित जी म्हणजेच माझ्या  सासऱ्यांच्या कडून एकत्र  शिकलो .पण काही रागांचे उपजत बारकावे  तिच्याकडे असल्याने तिच्याकडून मी शिकलो .म्हणून मी  स्वतःला तिचा शिष्य मानतो ..........हेच आमच्या तेरा वर्षाच्या सुखी संसाराचे रहस्य ."एकच हशा पसरला ...त्याने गायला सुरवात केली ...राग मधुकंस ने सुरवात केली
'छेड न मोहे कन्हाई'

वा पठ्ठ्याने सुरुवात आपल्या आवडत्या रागाने केलीय .सेफ गेम ......!खरच खूपच छान गातोय ....
" आरती, पुन्हा विचार कर ..!गाणं तुझी ताकत आहे ...सगळ्यांना हे दान नाही ग मिळत ...!खूप लहान आहेस तू लग्नासाठी !

 " अरे पण तू का इतकं तळमळतोयस ?हे बघ कदाचित आतापेक्षा चांगली साधनं ..चांगले गुरु तिला मिळतील ...गाणं अजून  वाढेल तिचं  !  "

 "असं होत नाही ग पद्मा ,मुळात दादासाहेबांना संगीताची आवड आहे म्हणजे नवऱ्याला असेलच असं नाही....हिचं गाणं थांबेल अशी मला भीती वाटते ...तूच तर म्हणतेस ना बाबा म्हणतात  ही अस्सल  गायिका आहे म्हणून !...मग !"

 "काही नाही ग पद्मा ताई हा जळतोय माझ्यावर !..." ....

 आरतीला   समोरचे धूसर दिसू लागले ...

त्याने खमाज ठुमरी म्हटली ....टाळ्यांच्या कडकडाटात मध्यंतर झाले '..दीड तास कसा  सरला कळलंच नाही !' ...म्हणत ती विंगेत त्याला भेटायला गेली ...

  आटोग्राफ घ्यायला आलेल्या हौशी रसिकांच्या गराड्यात होता .ती त्यातून  वाट काढत पुढे गेली आणि म्हणाली "जयू ..."

 तो क्षणभर बघतच राहिला ..'ओळखलं की नाही यानं मला ?म्हणत तिनंच ओळख सांगितली .

" मी आरती ...!तो विस्फारल्या नजरेनेच क्षणभर बघत राहिला आणि पुन्हा सह्या करू लागला ...

 त्याने ओळखले नसावे असे म्हणून काहीशी  ओशाळवाणी  होऊन ती जाऊ लागली .तेव्हा त्याने पटकन तिचा हात पकडला... बाकीच्यांना सही नंतर देतो म्हणून सांगत तिला आपल्या सोबत आतल्या खोलीत नेले ..

 "  पद्मा, हिला ओळखलस ?"पद्मा बघतच राहिली ..

 आणि एकदम तिनं कडकडून मिठीच मारली .

 " आरती ...अग राणी ...  आहेस कुठे तू ?"

 आरतीला वाटलं आता आपल्याला रडूच फुटेल ..तिने ओठावर ओठ गच्च दाबून ठेवले .ती आणि पद्मा आत निवांत जाऊन बसल्या ...काय बोलू आणि किती बोलू असे तिघांना झाले होते ...अन तरीही वातावरण निशब्द ! इंटर्वल संपले .निघताना ती जयुकडे बघत दाटलेल्या गळ्याने म्हणाली .

 "पद्माताई ,या कुडमुड्या ज्योतिषाने  माझे मात्र अचूक  भविष्य वर्तवले ...!"

कार्यक्रम संपताना भैरवी आधीच्या मारव्याने वातावरण विलक्षण भारावून गेले.

गुरूबिन ग्यान न पावे !  बंदिश उत्तरोत्तर रंगतच गेली .

कार्यक्रम संपला .त्या दोघांनी तिला त्यांच्या  सोबत नेले ....

निघताना पद्मा जयदेवला म्हणाली ," आज मारवा गायला घेतलास तेव्हा मी घाबरलेच होते ..  एरवी तुला मारवा फारसा साधत नाही ..पण आज अप्रतिम झाला रे !धैवतावरून रिषभ आणि षड्जावर काय आलास रे ...टच्चकन माझ्या डोळ्यात पाणी आलं बघ !..." जयदेव शांत निशब्द ...

लॉजवर गेल्यावर कॉफी सोबत   बराच वेळ गप्पा झाल्या ...जितके दुःख लपवता आले तितके तिने लपवून सर्व छान छानच सांगितले ... निघताना पद्मा  तिच्या कानात  म्हणाली ,"आरती ,तुझ्या नवऱ्याला भेटायचं होतं..पण योग दिसत नाहीय ...लगेच निघणार आहोत ..एक लक्षात ठेव  आधाराची खरी गरज पुरुषालाच असते ...तो जसजसा कर्तृत्वाने मोठा होत जातो तसतसा तो एकटा पडत जातो  ग ! अशावेळी बायकोला  मैत्रीण आई ,पत्नी, मुलगी  सगळ्या भूमिकात शिरून त्याला समजावून घ्यावं लागतं...सगळं ठीक होईल ....!

 हातात एक बॉक्स घेऊन जयदेव बाहेर आला   "आरती ,आता आम्ही  गदगला असतो पद्मा कॉलेजात शिकवते ..आमचं गुरुकुल आहे ...माहेरपणाला येत जा ...संकोच करू नकोस ...रोज रियाज करत जा ...हे खास त्यासाठी देतोय   !" म्हणत  त्याने बॉक्स तिच्या हातात दिला .  मशीन तानपुरा  होता  तो   .... पद्मा आणि जयदेव दोघेही तिला सोडायला गाडीपर्यंत आले .

 " सावकाश जा ग !" म्हणत जयदेव मागे फिरला ...

 ती पद्माला म्हणाली ," पद्माताई ,हे मशीन कुणासाठी आणलं होतं तुम्ही ?"

 "आरतीसाठी ..अग आमची बारा वर्षाची लेक ..  तुला सांगायचंच राहिलं आमच्या लेकीचं नाव जयुनं खास आरती ठेवलंय ..तुझी आठवण म्हणून ...तुमची चालायची तशीच त्या दोघांची दंगा मस्ती अखंड चाललेली असते बघ ...तीही तंबोरा आवळायचा खूप कंटाळा करते .... ...जयु केवढा खुश झाला तुला बघून...वापर बरं का हे मशीन खूप गा.... आणि ए बाई  हळू चालव ग गाडी !म्हणत तिच्या पाठीवर थोपटत  निरोप घेऊन पद्मा पाठमोरी झाली ...

 

घरी आल्या आल्या आरती बेडरूम मध्ये येऊन कोसळली ...अडकलेला हुंदका मोकळा झाला.हळूहळू स्वतःला सावरत ती उठली ..भरल्या डोळ्याना काहीच दिसत नव्हतं ..तिनं बेसिनवर जावून तोंडावर पाणी मारलं ....कोऱ्या करकरीत साडीनंच डोळे पुसले ...जरा हुळहुळल्यागत झालं पण आता पुढची वाट लख्ख दिसत होती ....तिनं तानपुरा मशीन सुरु केलं....हातातल्या मोबाईलवर निखिलचा नंबर डायल करतानाच
मारव्याची धून गुणगुणू लागली ..
.दिन तो डूबा डूब न जाये आस का सुरज आ जा रे ...
सांझ भई घर आ जा रे पिया .. ... 

 

 

स्वाती ठकार (२१.११.११..... १२.५४ )
मो. ९७६४१५१५३३




No comments:

Post a Comment