Saturday, November 21, 2020

सृजन वेणा... मरण यातना

 सृजन वेणा… मरण यातना


दरवर्षीच्या प्रथेप्रमाणं चिंतन आदेश पाक्षिकाच्या दिवाळी अंकाचा या वर्षीचा विषय ठरला मृत्यू. शब्द तसा नवा नाही. तरीही तो लांबच बरा असं वाटणारा. सहज मनात विचार आला मृत्यू म्हटलं की फक्त देहाचा मृत्यूच डोळ्यासमोर येतो पण भाषेचा मृत्यू, नात्याचा मृत्यू, माणूसकीचा मृत्यू, सौजन्याचा- सहनशक्तीचा अंत, भावनेचं मरणं, लाजेनं मरणं असे अनेक शब्दप्रयोग दैनंदिन वापरात आढळून येतात. मृत्यूचं मूर्त, अमूर्त रूप लेखक, कवी, चित्रकारानी आपल्या रचनेत क्षमता, प्रतिभेनुसार चित्रित केलं आहे. पण त्यांच्यातील रचनाकाराचं मरणं ही विचार करण्याजोगं आहे . 


मौत तू एक कविता है म्हणणारे गुलजार असोत किंवा मातीवर चढणे एक नवा थर अंती म्हणणारे कुसुमाग्रज असोत मांडलेला तरलपणा आणि कठोर सत्य नाकारता येत नाही. इतुक्या लवकर येई न मरणा ।मज अनभवुंदे या सुखद क्षणा।। म्हणणारे बाकीबाब मृत्यूच्या भयानं झुरायचं कशाला हे सांगताना म्हणतात, एक दिवस केव्हा तरी हो असे मरायचे। म्हणून काय त्याच भयाने रोज जगायचे।। म्हणत समजूत घालतानाच आयुष्याची आता। झाली उजवण।येतो तो तो श्रण। अमृताचा असं सांगतात. आणि तसंच समुद्राचं सुंदर वर्णन करणारी आपली कविता सुनिताबाईंकडून ऐकत ऐकत कोमात जाताना मरणालाही त्याचं दिमाखात सामोरे जातात. मृत्यूचे अनेक रंग काव्यातून कवी शायरानी मांडले आहेत. या जीवनाचा चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा हे माहीत आहे तरीही माणसाची जगण्याची आसक्ती कमी होतच नाही.


हे मरणरंग आपल्या साहित्यात विखुरणाऱ्या रचनाकारांचा मृत्यू हा माझ्यासाठी चिंतनाचा विषय आहे. हिंदी साहित्यिक देवेंद्र इस्सर गेले ही बातमी आली. शेवटच्या काळात एकांतवासात असलेले हे लेखक. काळजी घेणारं कुणीच नव्हतं जवळ.कधी कधी लेखक मरण्याच्या आधी त्याच्यातील रचनाकार मरत जातो आणि त्याला कळतही नाही . अशीच बातमी कथाकार लवलीन गेल्याची आली. लवलीन ही शिस्तप्रिय वडील आणि तरल मनाची भाषेची प्राध्यापक आई यांचं अपत्य.लवलीन स्वतः एक प्रेमळ आई, यशस्वी पत्नीही. विसंगत व्यक्तिमत्वाच्या आईवडिलांच्या सानिध्यात वाढलेली ही बंडखोर लेखिका. धर्मयुगमधे हिची एक कथा छापून आली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. सुरुवातीलाच उत्कृष्ट साहित्य दिल्यानंतर स्वतःशीच स्पर्धा सुरू होते.उत्तम रचनेसाठी संघर्ष सुरू होतो.असाच संघर्ष हिचाही सुरू झाला. पर्यायाने सिगरेट, दारू, डिप्रेशनची रूग्ण झाली .वरवर पाहता हिचं मरण या दारू सिगरेट डिप्रेशन मुळं वाटतं. पण खोलात गेल्यावर लक्षात येतं प्रत्येक रचनाकार सामान्य आणि मानसिक असंतुलनाच्या सीमारेषेवरून चालत असतो. याचं मुख्य कारण त्याच्यात रचनात्मक मानसिक संघर्ष आणि विलक्षण तणाव असतो. यामुळं मानसिक असंतुलन ,डिप्रेशन, मायग्रेन अशा व्याधी येतात. कमी अधिक प्रमाणात सगळे सर्जनशील रचनाकार या स्थितीतून जात असतात. जे रचनाकार स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने विसंगत कल्पना संसार उभा करतात. खास करून तरल, भावनीक, आवेगपूर्ण पद्धतीनं आपल्या रचनेत गुंतत जातात त्यांचा बाह्य आणि अंतर्मनात संघर्ष सुरू होतो . मेंदू थकत जातो. निद्रानाश आणि अनेक आजार घेरतात. बऱ्याचदा अशा स्थितीत विचार आणि कृतीत विसंगती दिसू लागते. एकाच दृष्यावर मन स्थिर होत नाही.समोर बसून एक कृती करत असताना आपल्या रचनेचेच विचार मनात फिरत असतात. पर्यायाने विक्षिप्तपणा वाढतो. अशावेळी इलेक्ट्रिक स्वीचप्रमाणे लेखकानेही ऑन –ऑफ टेक्निक शिकलं पाहिजे असं वाटतं. अन्यथा ज्याप्रमाणे गाडी सतत फर्स्ट गियरमधेच चालवल्याने जसं इंजिन गरम होऊन गाडी बिघडते तसंच माणसाच्या शरीराचंही होतं.रचना प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अशाच अनुभवाची पुष्टी हिंदी लेखक प्रियंवदने दिली आहे. हा विषय नेमकेपणानं मांडताना प्रियंवदच्या त्या ब्लॉगची मला मोलाची मदत होत आहे.


कधी कधी आपले सर्वोत्तम साहित्य दिल्यानंतर एक रिक्तता निर्माण होते. स्वदेश दीपक यांची मैंने मांडू नहीं देखा ही कलाकृती भाषा आणि सशक्त आशयाचा उत्तम नमुना. समीक्षक या भाषेची तुलना नीत्शेच्या भाषेशी करतात. या अप्रतिम कलाकृतीनंतर ते फिरायला म्हणून बाहेर पडले ते परत आलेच नाहीत .काहीच ठावठिकाणा नाही. आजतागायत कुणालाच दिसलेले नाहीत.शोध सुरूच आहे.


अनेकदा अतिशय उत्कृष्ट रचनाकारही साहित्य जगताच्या राजकारणाचा, कंपूशाहीचा बळी ठरतो. अनुल्लेखाने मारला जातो . याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी साहित्यिक शैलेश मटियानी. निव्वळ लेखक होण्याचीच दुर्दम्य इच्छा असलेल्या शैलेश मटियानींचा जीवन संघर्ष अवाक करून सोडतो .त्यांची दो दुखों का एक सुख ही कथा प्रेमचंद यांच्या रचनेच्या तोडीस तोड मानली जाते. त्यांची अर्धांगिनी ही कथा दांपत्य जीवनाच्या प्रेमावर लिहिलेली एकमेव हिंदी कथा. कथेची भाषा, त्यातली तरलता यामुळे ही कथा वारंवार वाचली जाते. चंदा गोळा करून ते मासिक काढत. प्रस्थापितांच्या टोळीने राजकारण करून बदनाम केल्यानंतर धर्मयुग सारखा गडगंज पेपर आणि धर्मवीर भारतीं विरुद्ध कोर्टात मटियानी खटला लढले. जवळ पैसा नसल्यामुळे वकिला ऐवजी स्वतः युक्तीवाद करून शेवटपर्यंत लढले.दोन वेगळ्या आर्थिक स्तरावरचा तो खटला होता. साहजिकच हरले .पण त्या दरम्यान कायद्यातील तृटी, पळवाटा शोधणारे अनेक अप्रतिम लेख त्यानी लिहिले. या कायदेशीर लढाईचा शरीरावर खूप वाईट परिणाम झाला .त्यातच ते आयआयटी कानपूरमधे असताना त्यांच्या मुलाच्या हत्येची बातमी त्याना मिळाली. ते मानसिक तणावाने ग्रस्त झाले. उपचारानंतर जरा बरे होताच अकार च्या प्रवेशांकासाठी अप्रतिम दीर्घकथा नदी किनारे का गाव लिहिली. आणि तिथूनच तीव्र मानसिक आजार सुरू झाला .त्यातच ते गेले.गिरीराज किशोर सांगत कि शेवटी शेवटी तर शैलेश मटियानी इतके उत्तेजित होत होते कि मृत्युच्या दोन दिवस आधी ते भेटायला गेले असता मटियानीना कॉटला साखळीनं बांधून ठेवलं होतं.


अलिकडेच मराठीत शोध ही सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिणारे मुरली खैरनार हे सर्जनशील लेखक. काळाचा एक विशाल पट कवेत घेणारी, संदर्भांचा प्रचंड धांडोळा घेणारी ही सुंदर कादंबरी. कल्पना आणि वास्तव याची अफलातून सरमिसळ या रचनेत आहे .शैली आशय मांडणीच्या दृष्टीने अप्रतिम कलाकृती. नैतिकता ,मूल्यं या विषयी ठाम मतं असलेले मुरली खैरनार पुरस्कार परतीच्यावेळी मराठी लेखक मंडळींच्या पाठी ठाम उभे राहिले. ते लेखनादरम्यान फेसबुकवर अत्यंत सक्रीय होते. संवादही होत होता. नंतर संवाद थांबला . कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दूसरी आवृत्तीही लगेच आली. ते आजारी असल्याचे कळाले. तीव्र डोकेदुखीने ग्रस्त असल्याचे समजले. पॅरॅलिसीसचा अटॅक आल्याचेही कळाले आणि एक दिवस ते गेल्याची दुर्दैवी बातमीही आली.


रचनाकाराचा मृत्यू, त्याच्यातील रचनाकार मरत गेल्याने, सृजनाचा दुष्काळ पडल्यानेही होतो. आणि जेव्हा रचनाकाराला आपल्यातील रचनाकार संपतो आहे ही जाणीव होते तेव्हा आपल्या मरणाचीही चाहुल त्याला लागते. हा रचनाकार एकाएकी संपत नाही . हळूहळू क्षीण होत जातो. अनेक अतर्बाह्य कारणांमुळे हे घडते . निर्मल वर्मांची सूखा ही हिंदी दीर्घ कथा मला वाटतं हा विषय नेमकेपणानं मांडणारी साहित्यविश्वातील एकमेव कथा. हेमिंग्वेने आत्महत्या केली कारण आपल्यातील रचनाकार संपत चाललाय हे त्यानं जाणलं आणि त्याचा स्वीकार करणं त्याला असह्य झालं. 1952 मधे ओल्ड मॅन अँड अ सी नंतर 1961 च्या मृत्यूपर्यंत काही खास लिहू न शकल्याचं शल्य सतत बोचत राहिलं .मृत्यूपूर्वी इ ए. हाशनर या मित्राबरोबर बोलताना त्याने आपल्या आत्महत्येचा विचार बोलून दाखवला आणि त्याच्या पुष्टीसाठी तो म्हणाला बासस्ठ वर्षाच्या माणसाला जेव्हा स्वतःशी संकल्प केल्याप्रमाणे कादंबरी कथा न लिहू शकल्याचं जाणवतं तेव्हा त्यानं काय करावं .? मित्राने सल्ला दिला . काही काळ लेखन बाजूला ठेव .त्यावर हेमिंग्वेनं जे उत्तर दिलं ते विचार करायला लावतं. तो म्हणतो, मला जेव्हा विश्वास असतो कि मी लिहू शकेन तेव्हा मी एक वर्ष थांबलो काय किंवा दहा वर्षं न लिहिता राहिलो काय फरक पडत नाही .पण मी लिहू शकत नाही ही भावना सतत सोबत बाळगत जगण मरणप्राय आहे.


वर्जिनिया वुल्फ ,सिल्विया प्लॉथ यांच्या आत्महत्या थरकाप उडवतात. गुगलवर शोधल्यास आत्महत्या करणाऱ्या रचनाकारांची भली मोठी यादी दिसेल.मेमरीज ऑफ माय मेलन्कनी होर्स (माझ्या उदास वेश्यांच्या आठवणी )लिहिताना मार्क्वेज आपल्या सृजनाच्या वाळत चाललेल्या मुळांशी झटतानाच दिसतो. मी आजपर्यंत लिहिलेलं सर्व व्यर्थ आहे या भावनेनं ग्रासलेल्या फ्राँज काफ्कानं तर आपलं एकुण एक लिखाण जाळण्याचा संकल्प केला. बरंचसं स्वतःच्या डोळ्यासमोर जाळायला लावलं.मराठी साहित्यात समीक्षा,काव्य, कथा प्रांतात मानदंड असणारे सानेगुरूजी का बरं जगण्याला कंटाळले असतील? हा प्रश्न खरंच जीवघेणा आहे. रचनाकारात ठाण मांडून बसणारा विषाद हा शोधाचा विषय आहे . का बरं येते ही अशी खिन्नता? अनेकदा अमूर्त भावबोध होतो पण व्यक्त होण्यासाठी शब्दानाच शरण जावं लागतं. ते कधी कधी वश होत नाहीत. जसं की ,


चालता बोलता जगण्याच्या प्रवासात


खूप काही सुंदर भव्य अद्वितीय 


मनाला भावणारं दिसतं .


सलणारं टोचणारं असतं काही 


काही मनस्वीपणे भोगलं जातं 


आतून अनुभवलं जातं 


सगळंच शैलीत अचूक पकडता येत नाही 


सगळं जसंच्या तसं मांडताही येत नाही 


बऱ्याचदा त्याला अव्यक्तच सोडून द्यावं लागतं 


एक हूरहूर वाटते .


परंतू जे व्यक्त होतं 


त्याचंही पूर्ण समाधान मिळत नाही 


ते मूर्त झाल्यावर काहीतरी गमावल्याचं जाणवत राहतं


आणि विलक्षण खिन्नता येते 


का बरं सुकत जातो रचनाकार आतल्या आत? खरं तर रानातील पिकांच्या दुष्काळाची जी कारणे आहेत तीच इथेही लागू होतात.1)खत पाणी न मिळणं म्हणजे संवेदना, सहानुभूती, विचारशीलता ,विवेकबुद्धी संपणं 2) कीड लागणं म्हणजे सृजनक्षमता ,वेळ आणि शक्ती अन्य अनावश्यक किंवा उपद्रवी विषयांकडे वळणे.3) हवापाणी न मिळणं म्हणजे अभ्यास थांबणं ज्ञानाच्या अन्य स्रोतांशी संपर्क तुटणं 4) कटाई छटाई न होता अंधाधुंद वाढ होणे म्हणजेच वाईट सुमार रचनेचंही वारेमाप कौतुक होणं. 


शांत श्वासोच्छवास आणि धीमी चाल लेखकाची नाडी असायला हवी.अन्यथा पाण्याच्या बुडबुडबुड्या प्रमाणं लगेच फूटून जाईल. शेअर बाजारात जसे लांब पल्याचे शेअर असतात तसेच झटपट वर जाणारे आणि तितक्याच झटपट कोसळणारे शेअर असतात तसंच हे ही क्षेत्र. जो स्वतःतच आत्ममुग्ध होऊन रमला त्या रचनाकाराचा मृत्यू हॅमलीनच्या बासरी वाल्याच्या मागे नाचत गात जाऊन पाण्यात बुडून मरणाऱ्या उंदराप्रमाणे सर्वात दयनीय मृत्यू असतो.


अनेक शासकीय साहित्य संस्था, स्वघोषीत साहित्यप्रेमी संस्था, साहित्याचे ठेकेदार नवी क्रांती करण्यासाठी नवोदितांना व्यासपीठ देण्याची घोषणा करण्यासाठी हिरीरीने पुढे येतात. अनेक नवीन रचनाकार घडवल्याचा दावा करतात. मागोवा घेतल्यास ही यादी बोटावर मोजण्याइतकी असते. पण या खटाटोपात सृजन संपलेल्या रचनाकारांची संख्या अगणित असते. एकच रचना वर्षानुवर्ष व्यासपीठावर सादर होते तेव्हा रचनाकाराचं सृजन संपलं की काय असं वाटू लागतं. 


नवीन रचनाकाराला मारण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्याच्या सर्वात कमजोर रचनेचं वारेमाप आणि वारंवार कौतुक करणं. स्वतःवरच्या प्रेमात आणि लादलेल्या श्रेष्ठत्वाखाली दबून मरतो बिचारा. रचनाकाराला संपवण्याचा दूसरा पर्याय म्हणजे चांगल्या कलाकृतीला अनुल्लेखानं मारणं, सर्वोत्कृष्ट रचनेला पूर्णपणे डावलणं किंवा त्या कलाकृतीवर अनावश्यक टीका करणं, जेणे करून तो लेखक लढून, थकून भागून, लेखणी मोडून स्वतःच मरेल.


नवीन कलाकृतींचा उदोउदो करताना स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अनेक विद्वज्जन जुन्या साहित्याला नाकारतात आणि साहित्यिकांवर, जे जनमानसात रुजले आहेत त्यांवर अनाठायी टीका करतात. पण हा विसर पडतो कि आपल्या विस्तारत असलेल्या प्रवाहाचे मूळ तिथेच कुठेतरी आहे.


लोकसाहित्यात जात्यावरच्या दळणात ओव्यातून जसं व्यथां वेदनांच्या चित्रणाचं दळण असतं तसं या लेखातील मरणाचं दळणं संपवताना आठवतं कि अति प्राचीन श्रेष्ठ ऋग्वेदात अनेक सुंदर ऋचा आहेत. उषा ,अश्व, जुगाराचे फासे ,उर्वशी- पुरुरवा ,लग्नानंतर सासरी पाठवली जाणारी कन्या असे असंख्य विषय आहेत. त्यात मला आवडलेली मरणाऱ्याच्या चितेवरची ऋचा आहे. सारांश असा 


,जन्मरहित हा जाणारा जो


राखेमध्ये जाईल मिसळून


चिंरंतन तो अजरामर तो 


दे उर्जा त्या अग्नीदेवता 


मातीमध्ये रुजून जाऊ दे 


राखेमधुनी झेपावू दे 


गगन नव्याने पुन्हा भेदू दे.


हे सगळं मनाला अस्वस्थ करणारं लिहित असताना 92 वर्षापर्यंत म्हणजेच मृत्यूपर्यंत सतार वाजवणारे दिलखुलास रविशंकर, 96 वर्षापर्यंत सदर लिहिणारे खुसखुशीत खुशवंतसिंग दिसतात. मृत्यूपर्यंत चित्रकलेतील नाविन्याचा ध्यास असलेले सौंदर्यप्रेमी एम एफ हुसेन दिसतात. तुम्ही मला आता पाहताय जेव्हा मी म्हातारी आणि कुरुप आहे .तुम्ही तेव्हा पहायला हवं होतं जेव्हा मी तरुण आणि कुरूप होते असं म्हणत मरेपर्यंत नवोदिताच्या उत्साहाने स्वतःचीच खिदळत खिल्ली उडवणारी अभिनेत्री जोहरा सेहगल दिसते. नाकात नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मृत्यू शय्येवर पडून असलेले निर्मल वर्मा दिसतात . तरीही अजून किती दिवस जगू शकेन हे डॉक्टरना वारंवार विचारतानाच मरणाआधी तीन महिने तसाच स्थितीत उपलब्ध साधनांच्या मदतीने एक उत्कृष्ट कथा नया ज्ञानोदयसाठी लिहून पाठवतात तेव्हा मी थक्क होते. स्वतः अनेक सुंदर गाणी प्रेम कविता लिहिणारे आणि समोरच्या नवोदिताची कविता ऐकणारे मंगेश पाडगावकर एक डोळा बारीक करून मी कधी कधी कानाचं मशीन लावायचं विसरतो असं मिष्किलपणे सांगतात आणि तितक्याच उत्साहाने नवोदतांच्या कवितेतील सौंदर्यस्थळेही उलगडून दाखवतात. लिज्जत पापडावर कविता लिहितात आणि मृत्यूपर्यंत तितकेच नवीन राहतात तेव्हा रचनाकाराचा मृत्यू होत नाही हा विश्वासही मनाला आश्वस्त करतो. मनातला आशावाद वाढतो. फक्त स्वतःला लहानात लहान होऊन प्रत्येक क्षणी नवं होता आलं पाहिजे.आजूबाजूची नवलाई टिपता आली पाहिजे. त्याचबरोबर परंपरा आणि नवतेचा सुरेख मेळ घालता आला पाहिजे हे मात्र जाणवत राहतं. 


लेखाचा समारोप करताना वाटतं माझी ही किडुक मिडुक लिहिण्याची उर्मी क्षीण होता होता कधीतरी संपेल. पण माझाही मृत्यू होईल हे वास्तव मला घाबरवत नाही. इतना तो करना स्वामी म्हणत हरी किंवा हर या आपल्या आराध्य ईश्वराचं रूप पाहता पाहता स्वतःच्या मृत्यूचा सोहळा बघणारा भक्त आठवतो. मी चार वर्षापूर्वी लिहिलेली जुनी कविता आठवते आणि तसाच असावा आपलाही मृत्यूसोहळा असं वाटतं. 


ओठावरती असेल हासू आणि पापणी किंचित ओली 


स्निग्ध, हळवी नजर जराशी असेल भवती भिरभिरणारी ।।


ओंजळ करूनी रिती फुलांची हातानी या पुसेन अलगद ।


भाळावरचे घर्मबिंदू अन टिपून घेईन हळुच पापणी ।।


वाजत गाजत ये वा गुपचुप। तुला यायचे तेव्हा तू ये! 


असे कितीसे नटावयाचे ?येईन संगे कानी साद दे।। 




.04-02-13...6.42 संध्या. (पुनर्प्रत्ययाचा आनंद )




स्वाती ठकार 









No comments:

Post a Comment