Friday, November 20, 2020

परिक्रमा

 

परिक्रमा
विक्रम
१.
एका बाजुला धो धो कोसऴणारं पाणी, वर काळ्या करड्या ढगानी गच्च आकाश आणि दूसऱ्या बाजुला घुप्प धुकं. हिरव्या चिंब झाडानी अजून कुंदपणा वाढला आहे. या सह्याद्रीच्या रांगात पावसाळ्यात फिरणं म्हणजे खरी मजा. सहज मागं वळून पाहिलं. लांब टेकडीवर अंगणातली उंच नारळाची झाडं आणि त्यात लपलेलं माझं कॉटेज दिसत होतं. कुठल्या तंद्रीत चालत होतो मी ! नागमोडी वाट चालत जवळ जवळ तीन चार किलोमीटर लांब आलो तरी कळालं नाही. समोर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरच्या पळणाऱ्या गाड्या दिसतायत आता. घराबाहेर पडलो तेव्हा पायाला कोकचा रिकामा कॅन लागला आणि एकाद्या लहान मुलासारखा पायानं टोलवत पुढं पुढं निघालो खरा.

मी आणि माया किती लांबपर्यंत दगड टोलवत जायचो .
अगदी घर ते समोरची पमामावशीची ऑईलमिल असो
कि मैलभर लांब असलेली शाळा
दगड नव्हे तर काळालाच पुढं पुढं टोलवतोय दोघं .
तसं तर धावतोय दोघं पण
माझा काळ अचानक तिथंच थांबलाय

खूप काही विसरायचंय मला पण माया मात्र आठवत राहते.
या चिंचोळ्या रस्त्यावर तशी वाहतुक कमीच. हल्ली या बाजुला छोटा का होईना काँक्रीटचा रस्ता तरी झालाय. पाच सहा वर्षापूर्वी पर्यंत मातीची पायवाटच होती. डोंगरात, झाडीत लपलेला एखाद दूसरा बंगला होता .लोणावळा हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध काय झालं. आणि गर्दी वाढत चालली.
समोर पाच सहा कॉलेजची मुलं खिदळत चालली आहेत.

माझ्या नैनाच्या वयाची किंवा जरा लहान असतील. कशी दिसत असेल नैना आता? शेवटचं निवांत भेटलो, पंधरा दिवस राहिलो ते पमामावशी गेली तेव्हा. नववीत होती नैना. माया आणि नैना दोघीना भेटून सगळं आवरून मगच मुंबईला गेलो. स्वतंत्र बेटांसारखं जगतोय आम्ही तिघं! म्हणायला नवरा, बायको. मुलगी अशी नावं आहेत या बेटांना. अधून मधून जायचो कधी चार तास तर कधी रात्रभरासाठी. मायाला कडकडून मिठी मारली कि सगळा शीण दूर व्हायचा.

‘पैसे हवेत का?’ विचारलं की म्हणायची ‘दे एक दहा पंधरा करोड!’ आणि छान हसायची.उलट मलाच लागणार आहेत का पैसे? विचारायची. कोमल गंधार, परिक्रमा, बरगद की बातें यात गेली चार पाच वर्षं जाताच आलं नाही तिकडं.

राजन काकाचे घरात होते नव्हते ते सगळे कॅमेरे माझ्या स्वाधीन करून पमामावशी म्हणाली, ”तुला मुंबईला जायचंय ना विक्रम! जा बाबा. तुझ्या काकाच्या माहितीतले दोन तीन जण आहेत या लाईनमधले चेंबूर, उल्हासनगरला. ते करतील लागली तर मदत तुला. फोटोग्राफी, फिल्मलाईन जे काय करायचं ते कर पण असा घरात कुढत राहू नको. कंटाळले मी तुमच्या दोघांच्या धुसफुशीला .जा तू. मायाला समजावते मी.
”नैना जेमतेम नर्सरीत होती. घरची ऑईलमिल आणखी दोनचार एजन्सीजचा व्याप माया आणि मावशी बघत होत्या.तसंही माझ्यावर कुणीच अवलंबून नव्हतं. तेच मला पोसत होते आणि तेच मला टोचत होतं तेव्हा. त्या धंद्यात मला रस नव्हता. मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा घालमेल होत होती पण कुठंतरी आत सुटकेचा निश्वासही सोडला मी! बायकांच्या तावडीतून सुटका झाल्याचा आनंद होता.

चालता चालता विचारांच्या तंद्रीत घराजवळ पोचलो. शिवराज हातात फोन घेऊन उभा होता. अरेच्चा, फोन सोबत नव्हता नेला हेही लक्षात नाही माझ्या !

”कुणाचा फोन आला होता?” मी व्हरांड्याच्या पायऱ्या चढता चढता विचारलं.

” दोनदा वाजलाय. बघ तूच!” म्हणत तो आत गेला. मी असा फोन ठेवून गेलो कि शिवू जाम चिडतो. मी नेमका कुठं आहे ते कळत नाही ना त्याला ! वारंवार सांगूनही हल्ली माझा फोन घरीच राहतो.

” विक्रम, तुला सांगून दमलो मी ! मागच्या औट हाऊसची कौलं बदलायची आहेत. पार्किंग शेडचे पत्रे गंजलेत. पाणी चढवायची मोटार अस्लम दुरुस्तीला नेतोय .अंघोळ करून घे. नाहीतर संध्याकाळी कर!” माझ्या हातात कॉफीचा कप देत शिवू म्हणाला.

मी फिल्मच्या वितरणाचे सगळे सोपस्कार झाले की येतो इथं. माझ्याआधी महिनाभर शिवू मुंबईहहून इथं येतो. इथलं सगळं त्यालाच बघावं लागतं. एकटेपणाला कंटाळतो. बायका मुलाना विजापूरला ठेवून तो गेली वीसएक एक वर्षं माझ्यासोबतच वावरतोय. यावेळी मी महिनाभर राहायचं म्हणून आलोय खरा. पण किती राहायला मिळेल कोण जाणे!

फोटोग्राफीच्या छंदापोटी म्हणण्यापेक्षा त्यातच काम मिळवण्यासाठी घराबाहेर पडलो. अपयशी होऊन माघारी जायचं नाही ही खुणगाठ मनाशी पक्की होती. सुरवातीला अधे मधे पुण्याला भेटायला जायचो. निघताना पाच दहा हजार रूपये पमामावशी गुपचुप रुमालात गुंडाळून माझ्या बॅगेत ठेवायची. मलाही ट्रेनमधे बसल्यावर ते शोधायचा चाळाच लागला होता. त्याकाळी पाच हजारात दोनतीन महिने भागायचं माझं. जर कफल्लक होऊन गेलो असतो तर मायानं ऑईलमिलच्या गल्ल्यावरच बसवलं असतं मला, पमामावशीच्या माघारी माया झक्क बिझनेस करतेय .आतातर खूपच वाढवलाय व्याप .नैना मदतीला आहे. उलट नैना तर तिच्यापेक्षा जास्त व्यवहारी. डिट्टो दूसरी पमामावशीच... कि पणजोबा? पठ्ठी अकरावीत असतानाच मला विचारत होती बाबा, तुझा इन्कमटॅक्स वेळेवर भरतोस ना?

आज एवढं कमावलं ते पमामावशीमुळं. दहावीनंतर बँकेत माझं खातं काढून त्यात ती माझ्या खर्चासाठी पैसे टाकू लागली. मीही तिच्याकडं थेट न मागता लागतील तसे बँकेतून काढायचो. जपून पैसे वापरायचो.

कोण होतो मी तिचा! पमामावशीच्या मैत्रिणीचा, सरूचा मुलगा. मी पाच वर्षाचा असताना आई काविळीनं आठवड्याभरातच गेली .बाबा भ्रमिष्टागत फिरू लागले. भाड्यानं द्यायच्या सायकलचं दूकान मोडून खायलाच आलं होतं. ते विकून मला आणि बाबाना राजन काका आणि पमामावशीनं लांज्यावरनं पुण्यात आणलं.

बाबा ऑईलमिलमधे सुपरवायजरचं काम करू लागले. पण दिवसेंदिवस पिणं वाढतंच होतं. मी पाचवीत असताना रक्ताची उलटी होऊन गेले आणि मी ऑईलमिलच्या आऊटहाऊसमधनं पमामावशीच्या घरात राहायला गेलो.
मायापेक्षा जास्त जीव लावला तिनं मला. राजनकाकाला आवडायचं नाही ते. पण पमामावशी त्याचा सगळा बिझनेस सांभाळायची. त्याला मोकाट सोडला होता. जे पमामावशीनं केलं राजनकाकासाठी तेच माया माझ्यासाठी अजून करतेय. काका कॅमेऱ्यात तासनतास रमायचा. कॅमेरा खोलून रिपेअर करणं हातचा मळ होता त्याच्या. मीही शिकलो तेच. सतत सोबत असायचो मी त्याच्या .

राजनकाका सिंधी. फाळणीनंतर ते कुटुंब कराचीतनं घरातलं जमेल तितकं धन, वस्तू गोळा करून भारतात आलं. निर्वासित कँपामधून इथून तिथं, तिथून तिथं करत पुण्यात स्थिरावलं .हळूहळू तिकडचा धंदाच इकडंही सुरू केला. पमामावशी दहावीनंतर लांज्याहून तिच्या मामासोबत कॉलेजसाठी म्हणून पुण्यात आली. सकाळी सात ते दहा कॉलेज करून नंतर पाच वाजेपर्यंत गोकुळदास माखिजांकडे कारकुनी करू लागली. गावभर फिरणाऱ्या उनाड मुलाऐवजी ही मुलगी लागेल ती सगळी मदत धंद्यात करू लागली.

एक दिवस लांज्यात बातमी आली. सावंतांच्या पद्मानं माखिजाच्या पोराशी लग्न केलं. घरच्यानी संबंध तोडला .पण माझ्या आईनं नाही तोडलं, उलट तिला जपलं. कागदपत्रांसाठी लांज्याला आली तरी तिच्या घरी न उतरता माझ्या आईकडंच उतरायची. वर्ष दोन वर्ष लांज्यात गदारोळ झाला. नंतर सगळं शांत झालं. कारण पुढच्या दहा वर्षात गावाकडची पाच पंधरा तरी मुलं पुण्यात तिच्यामुळं पोटाला लागली. मी त्यातलाच एक तिचा जावई. मायाच्यावेळी पमामावशीच्या बाळंतपणासाठी आई मला घेऊन पंधरा दिवस आधीच पुण्याला आली होती.

राजन काकाला जावून वर्ष झालं होतं. बी.कॉम सेकंड क्लासमधे मी पास झालो. आणि मावशीनं समोर बसवून विचारलं ,

“पुढं काय करणार आहेस?“

“नाही ठरवलं तसं खास! तू सांग काय करू?”

“मायाशी लग्न करतोस? हे बघ सक्ती आजिबात नाही.” हे म्हणजे माझ्यासाठी आंधळा मा गतोय एक डोळा देव देतोय दोन असं झालं होतं. राजनकाकासारखी गोरीपान धारदार नाकाची आणि मावशीसारखी उंचीपुरी शेलाट्या बांध्याची माया एखाद्या अप्सरेसारखीच होती. कदाचित मायाची आणि माझी जवळीक तिलाही दिसत असावी.

आमचं लग्न झालं. वर्षाच्या आत नैना झाली .माया लेकीत आणि बिझनेसमधे इतकी गुंतली कि आपल्याला नवराही आहे हेच विसरून जायची. माझा जास्तीत जास्त सुसंवाद फक्त मावशीबरोबरच होता. कुरबुरी सुरू झाल्या.

नैना आईबरोबर शाळेत जायची, आजीबरोबर घरी यायची. मग आजी जायची आई यायची .मायलेकी खेळत बसायच्या. बागेत जायच्या. मी कॅमेरे आणि राजनकाकाची जुनी बजाज चेतक घेऊन दिवसभर इथं तिथं फिरत राहायचो. फोटो काढत फिरायचो .घरातल्या एका खोलीत फोटो डेवलप ही करायचो. आता हे डिजिटल कॅमेरे आलेयत. माझी जुन्या कॅमेऱ्यातली फोटोग्राफीही सुंदर होती. नवी डिजिटल टेक्नॉलॉजी रॉबीनदांकडे शिकलो.

‘सावरियाँ तूझबिन चैन कहाँ से पाऊँ. ’ रिंगटोनवर निर्मला अरूण आणि लक्ष्मी शंकरची माझी आवडती ठुमरी वाजतेय.

” विक्रम, फोन वाजतोय घे की!” अंगणातून शिवराज ओरडतोय . रॉबीन दासगुप्तांचा फोन

”विकी, काँग्रॅटस!”
”क्यूँ दादा?”

”बिकी कहाँ हो तुम? टीवी, पेपर, न्यूज, देखते नहीं क्या ? ”

” नहीं दादा, लोणावळा में हूँ। एक महिना फुल्ल रेस्ट मिन्स रेस्ट। फोन को पकडा भी नहीं। सिर्फ आराम!”

”तभी त्तो. तुम्हारी ‘परिक्रमा ’ को ऑस्कर नॉमिनेशन मिला ये पक्का न्यूज है. ‘बरगद की बातें‘ को नॅशनल अवार्ड मिलनेवाला है बिटुआ! ये गॉसिप है! पक्का पता नहीं “

मी निशब्द. ऑस्करची फक्त स्वप्न बघायचो..

“साला तू भी ना एक तो लो बजेट फिल्म बनाता है ...दुगना तिगना पैसा कमाता है...अपनी मर्जी से फिल्म बनाता है ..प्रोड्युसर ,डायरेक्टर,स्क्रिप्ट रायटर , सिनेमॅटोग्राफर , साउंड रेकॉर्डिस्ट ,कास्टिंग डायरेक्टर सबकुछ तूही ..याने पाँचो उँगलियाँ ही नही पुरा का पूरा तूही घी में?”

रॉबिनदा धोधो बोलत सुटलेत .एक गुरू शिष्याचं कौतुक करतोय. अजून काय हवंय!

” दादा ,सबकुछ आपका ही है ! ”

”ठीक है. मेरा प्रॉफिट परसेंट भेज दो भाई!”

खो खो हसत दादा बोलत होते. मी जेमतेम पुढचे चार दात असणारे रॉबिनदा हसताना कसे दिसत असतील विचार करतोय.

” बिकी, एक बॅड न्यूज है रे! शर्वरी सिन्हा ने कल रात सोईसाईड किया .”

” ओ गॉड .आएम शॉक्ड. क्यूँ दादा ! बहुत अच्छी डिरेक्टर थी वो !”

”फ्रस्ट्रेशन था. उसके हिसाब से अच्छा काम नहीं हो रहा है ! मूँहफट तो थी ही पैलेसे. ऑफर्स कम मिल रहा था. काम कम हो गया. पिछली फ्लॉप फिल्म का कर्जा था. सुबोध से भी झगडा शुरू था. काय करती रे बॉबॉ ती बेचारी. सब तुम्हारे जैसे धूर्त, डाकू थोडे ही है?” मधेच एक मराठी वाक्य सोडत दादा खिन्नपणे हसतायत.

”दादा, अब मुझे भी थकान महसूस होती है. इसी लिए आराम कर रहाँ हूँ !” मी स्वतःशीच पुटपुटल्यासारखं म्हणालो. पण म्हाताऱ्याला बरोबर ऐकू गेलं.

” बिक्रम, कोई परेशानी होगी तो मुझे बताओ! तू सयाना है .... बीवी बच्चीवाला है. तुझे पता है जिंदगी क्या है। देख बेटा,अब इस बुढ्ढे को ज्यादा दर्द मत देना। ”

दादांचा आवाज कातर झाला . गंभीरपणे काही सांगायचं झालं तर सुरवात बिकी ऐवजी बिक्रमने करायचे दादा.
डाकू ,धूर्त ,बदमाश हे दादांचे कौतुकाचे शब्द. शर्वरी आणि मी दोघेही दादांचे एकेकाळचे असिस्टंट. शर्वरी मला बरीच सिनियर. दादांशीही खूप वाद घालायची ती. ‘पोगली बच्ची है!’ म्हणत दादा दुर्लक्ष करायचे.

‘बरगद की बातें’ चं स्क्रिप्ट घेऊन सुरवातीच्या उमेदीच्या काळात दादांकडं जाण्याआधी शर्वरीकडं मी गेलो होतो. वर वर चाळून म्हणाली, “दम नहीं है रे इसमें. कुछ मत बना इसका. विक्रम, तू सासू माँ का बिझनेस क्यूँ नहीं देखता वापस जा कर?” आउटडोअर स्पॉटवर, ज्या दगडावर पाय ठेवून बसली होती. तोच दगड उचलून डोक्यात घालावा वाटला होता तेव्हा. पण खरंच होतं तिचं. जसा शिकत गेलो तसं त्या स्क्रिप्टमधे बरेच बदल केले. टायटल सोडलं तर मूळ संहिता कुठंच राहिली नाही. पिक्चरच्या स्क्रिनिंग नंतर पहिलं कौतुक करणारी शर्वरीच होती. दादांचा असिस्टंट झालो .तिथंही फार मनस्ताप दिला हिनं. पण तिच्या क्रिएटिविटीचा जबाब नहीं. मनासारख्या एका शॉटसाठी दोन दोन दिवस घालवायची ती. एकच फिल्म ‘चेकमेट’ नं अढळपद मिळवून बसली.

चेकमेटच्या एडिटिंगच्या वेळी काहीतरी अजून हवं होतं तिला. मला बोलावलं. मलाही काही सूचत नव्हतं. क्लायमॅक्सवर एका ठिकाणी दोन मिनिटाचा रील मिळमिळीत वाटत होता. काहीतरी सूचवावं म्हणून मी माझ्याजवळचा डौलदारपणे येणारा नाग आणि नंतरची मुंगुसाची फाईट याचं ऍनिमेशन आणि पाठीमागे कुसुमाग्रजांची मराठी कविता अहि नकुलचं सादरीकरण तिला दाखवलं. दोन मिनिटाच्या जागी सात मिनिटाची ही भर तिला कितपत आवडेल मलाच अंदाज नव्हता. ते सगळं घेतलं आणि माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाली ,

“देअर यू आर ! लव यू विक्रम, तुला आठवतं मी तुला वापस जा म्हणाले होते. थँक गॉड, गेला नाहीस ! गॉड ब्लेस यू डिअर! रॉबीनदानी हिरा शोधला आहे.” मुंबईत वाढल्यामुळे शर्वरी मराठी छान बोलायची.

दादांकडं काय नाही शिकलो! शिव्या खूप देत पण हातचं काहीही न राखता सगळं शिकवत गेले. ए-टू झेड सगळं तिथंच शिकलो. सगळंच आवडीचं होतं.गेली बारा वर्षं त्यांच्याच सल्ल्याने ‘माया क्रिएशन‘चं स्वतंत्र युनिट बनवलं. फिल्मस, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंट्री, कॅटलॉग, कॅलेंडर, अॅड काय नाही बनवलं! कितीतरी नव्या जुन्या मॉडेल्सना पोर्टफोलिओ बनवून दिले. बांद्र्याला भाड्याच्या घरात राहणारा मी, ही लोणावळ्याची कॉटेज आणि चेंबूरला युनिअन पार्कमधे दोन बेडरूमचा आलिशान पण छोटा बंगला घेऊ शकलो.

सगळा वन मॅन शो. आता सर्व कर्जमुक्त ,पुढच्या फिल्मचं भांडवलही हातात. फ्रॉफिट लॉस सगळ्याला जबाबदार मी.
पण आता काही करू नये वाटतंय. जे गमावलंय त्याचाच जास्त विचार डोक्यात येतो. मायानंतर अनेकजणी आयुष्यात अळवावरच्या थेंबासारख्या आल्या नि गेल्या. कुठंही रमलो नाही मी. आजही डोळे मिटल्यानंतर डोळ्यापुढं येतात ते मायासोबतचेच क्षण. खूप काही मिळाल्यावर एक रिक्तता येते. विषाद येतो. यातून लवकर बाहेर पडायला हवं एवढं मात्र नक्की.

असो, गेल्यावर सुबोधला फोन तरी करायला हवा. कशीही असली तरी बायको होती त्याची शर्वरी! तिचा मुलगा अमेरिकेत असतो. तोही भेटला तर पाहू. अधे मधे आणायची त्याला सेटवर. सुरुवातीला एवार्ड फंक्शनलाही मुलाला घेऊन यायची. नंतर तिनं येणं बंद केलं. मीही बंद केलं समारंभाना जाणं. सगळा भंपकपणा असतो.

२.
का बरं केली असेल शर्वरीनं आत्महत्या? सुबोध एवढा मोठा उद्योगपती, त्यानं का तिला आवरलं नाही? फक्त आर्थिक कारण कि आणखी काही !” या इंडस्ट्रीला आत्महत्या नव्या नाहीत. कर्ज, फ्लॉप फिल्मचं फ्रस्ट्रेशन, असफल प्रेमप्रकरणं, ब्लॅकमेलिंग, जीवघेणी स्पर्धा, नातेसंबंधातला कोरडेपणा अशी अनेक कारणं आहेत.

माझ्या मनातले विचार थांबतच नाहीत. महिनाभर काय राहणार इथं मी? मन अशांत आहे .जावं का परत मुंबईला? मायाशी बोलू का? तिला जावून भेटू का? नाहीतरी मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.अत्यंत मानी आहे ती .का असू नये तिनं? हॉर्टिकल्चर डिग्री होल्डर ती. ते क्षेत्र सोडून तिला घरचा धंदा सांभाळावा लागला केवळ माझा छंद पुढे नेण्यासाठी. तिला एक एकर शेत घेऊन देऊन कर बाई तुला जे करायचंय ते असं का सांगितलं नाही मीही पुर्वीच! फोनवर रूक्ष बोलणं व्हायचं. फिल्मला अवार्ड मिळाला कि माया अभिनंदनाचा फोन आवर्जून करायची. नैना बीकॉम नंतर एमबीए की सीए काहीतरी करणार आहे ही कधीची बातमी बरं?

मीच सांगू का फोन करून तिला परिक्रमा ऑस्करला पाठवतायत म्हणून? मायाला फोन करताना ताण का येतोय बरं! खरंतर काहीच कारण नाही. जन्मल्या जन्मल्या जिला पाहिलं अशी बालमैत्रीण, बायको, माझ्या मुलीची आई आहे ती. जिच्याशी मनसोक्त भांडलो, बेभानपणे प्रेम केलं ,तनामनाने एक झालो ती आज इतकी दूर असल्यासारखं का बरं वाटतंय!

“विक्रम, मी विजापुरला जातोय. पल्लवीचं लग्न करतीय विजया. एक दोन तीन महिने तिथंच रहाणार आहे!” शिवू हातात पाण्याची झारी घेऊन हॉलमधे शिरताना म्हणाला. पल्लवी, शिवूची सर्वात लहान मुलगी लग्नाला आली?
“सगळे राग राग करतात रे माझा कुठलीच जबाबदारी मी घेत नाही म्हणून. पैसे देऊन कामं होत नाहीत. तुम्ही या आणि इथं थांबा म्हणून म्हणत होती फोनवर!” शिवू पुरवणी जोडत म्हणाला .

“जा तू. पैशाची काळजी करू नको. थांब जेवढे दिवस हवंय तेवढे दिवस ! नवरा मुलगा काय करतोय?”

“थोरल्या सूनबाईच्या नात्यातला आहे. जमखंडीजवळ खेड्यात चार पाच एकर शेतीवाडी आहे. हे दोन भाऊ. थोरला शेती बघतोय. म्हशी, बैलं आहेत. दूधाचा जोडधंदा आहे. दोन मोठ्या बहिणींची लग्नं झालीत. नवरा मुलगा आलमट्टी धरणावर इंजिनिअर आहे. डिप्लोमा झालाय. पल्लवीला पण तिथल्या कोऑपरेटिव बँकेत नोकरी मिळेल म्हणतात तिच्या सासरचे. आहे कुणीतरी नात्यातला तिथं.”
झारी आत ठेवून जवळच्या खुर्चीवर बुड टेकत शिवू म्हणाला .

“विक्रम, हल्ली घरी गेलं तरी उपऱ्यासारखं वाटतं बघ. विजया पोरा बाळांचं करून थकलीय .चिडचिड करते. आता बास करा तुमचे व्याप म्हणते. पोरंही परक्यासारखं वागतात रे. लांब लांबच असतात. थोरली दोघं जरा तरी बोलतात. पल्लू एकदम लांब असते. मी इकडं अडकलो. तिकडं ती बघता बघता मोठी झाली. निघाली आता तिच्या घरी!” शिवूचा गळा भरला होता.

“विजयाला इकडं घेऊन आलो तरी ती रमणार नाही. तिचा जीव तिथंच अडकलाय सुना नातवंडात. आता सोबत मी पण हवाय तिला!” बोलताना शिवराजला दम लागला.

“उद्या निघ तू! जाताना माझा हँडीकॅम घेऊन जा. छान शुटिंग कर. आपण अल्बम बनवू.” मी त्याला समजावतोय खरा. शिवू माझ्यापेक्षा दोन तीन वर्षं मोठा असेल पण लग्न, पोरं फार लवकर झाली. रॉबिनदांचा स्पॉटबॉय होता तो. सलग आठवडाभर मला त्यांच्याकडं नेत होता. माझे फोटोग्राफ्स, व्हिडिओ शुटिंग एकदा तरी बघा म्हणून त्याना गळ घातली. त्यानंच मला काम द्यायचा दादांकडे आग्रह केला. सगळं शिकायला लावलं. दादांकडून माझ्यासोबतच बाहेर पडला.
तपं उलटली.

काळाला कोण थोपवणार मलाच त्रेपन्न वर्षं होतील. माया पंधरा ऑगस्टची आणि मी डिसेंबरचा. पुढच्या आठवड्यात तिलाही एक्कावन्न पूर्ण होतील. थकली असेल तीही. माझं वेड जोपासण्यासाठी तिला सोडून निघालो मी. अनेक खस्ता खाल्या पण परत गेलो नाही. सगळा प्रपंच तिनं एकटीनं ओढला. एका दमड्याचीही अपेक्षा केली नाही .मी तरी कुठं विचारलं? आपल्याच कैफात होतो. आता सगळं सोडून तिच्याकडं जावं वाटतंय. नैनाला काय वाटत असेल माझ्याबद्दल ? जगाचे फोटो काढले. माझ्या लेकीचे वयात येतानाचे फोटो कुठायत माझ्याकडे? या ‘मी’ नं संपवलं मला. कमावलेल्यापेक्षा गमावलेलं जास्त टोचतंय मला आता. डायरी कुठं बरं ठेवलीय मी? काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडणार नाही मला.

बंद मुठीत अडके मिणमिणता प्रकाश
सैलावल्या गात्रामधे उगा रुततात पाश।।
किती दारे या वाड्याना बंद दारे उघडली।
पाय बाहेर टाकता आत रेंगाळे सावली।।
संधीप्रकाशाचा खेळ कसा संपता संपेना।
आणि पंख अंधाराचे उघडुनिया मिटेना ।।
कधी घुमतो पारवा कधी वाजते पावरी।
धास्तावला मनपक्षी कोण तयास सावरी।।

दोन दिवस झाले शिवूला जावून. ‘लग्नाला ये!’ असं सांगून गेला. कसं काय जमतंय बघू. काल आऊट हाऊसची कौलं बदलून झाली .पार्किंगचा पत्रा बदलला. जूनी मोटार पार कामातून गेली होती, नवीच आणली.अंग मोडून बागेत राबलो. खूप वेगवेगळी काम मन लावून केलीत मी या दोन दिवसात.

उद्या सतीश पालवे त्याची टीम घेऊन ‘गप्पागोष्टी’ सदरासाठी इंटरव्यू घेणार आहे इथंच. मी कधीच मुलाखती ,गप्पागोष्टी या फंदात पडत नाही. पण यावेळेला त्यानं आग्रहच धरला आहे. हीच मंडळी माझ्या सिनेमाचं परस्पर प्रमोशन करतात. माझी लफडी,व्यक्तिगत आयुष्य कमी आणि माझी कला, त्यातील बारकावे, सौंदर्य जास्तीतजास्त लोकांसमोर नेतात. का कोण जाणे पण यावेळेला खूप बोलावं वाटतंय, सांगावं वाटतंय, मनातली खंत मांडावी वाटते .चुकांची माफी जगासमोर मागावी वाटते. पडद्याआड जे व्यक्तिगत आयुष्य आहे ते येऊ दे लोकांसमोर. छंदाचं पॅशन कसं होतं, कलात्मकता जशी वाढते तसं यश येतं पण याची जबर किंमत कशी मोजावी लागते हे कळू दे जगाला .

3. नैना

अँब्युलन्सचा किती कर्कश हॉर्न आहे. मध्यरात्रीचा ससूनकडे कुणीतरी अंतिम प्रवासाचा जीव निघाला असावा बिचारा. नववीत असताना पमाज्जीला असंच रात्री नेलं होतं.झोपेत ठसका लागला.मम्मा उठून तिची पाठ थोपटतेय तोवर कोसळली. मम्मानं मला उठवलं. अँब्युलन्सला फोन केला. पंधराव्या मिनिटाला ससूनमधे पोचलो. अर्ध्या तासात गेली हे कळालं. घरीच गेली होती ती. पहिला फोन बाबाला केला. पहाटे पोचलासुद्धा तो. दवाखाना ,अँब्युलन्स हे कधी मी ऐकलं पाहिलंच नव्हतं.एका रात्रीत मोठी झाल्यासारखं वाटलं.

एखाद्या राजकन्येसारखं दोघीनी मला वाढवलं. बाबा आपल्याजवळ नाही याचं तेव्हा काहीच वाटायचं नाही. छान छान फ्रॉक्स ,फॅशनेबल शूज ,हेअरबँडस, लेडीबर्ड सायकलं एवढंच काय पहिला मोबाईल हे सगळं मम्मानं बाबानं पाठवलं असं सांगत स्वतःच आणलं. मलाही कळत होतं सगळं. पण खोटंखोटं,एकमेकाना फसवत जगण्यातही मजा असते हे तेव्हापासून कळतंय मला. पमाज्जी गेल्यावर मम्मा सून्न झाली होती काहीकाळ पण तिच्यातली आई मात्र कायम जागी. आजीचे दिवस झाल्यावर शांतपणे तिनं बाबाला व्यापातून मोकळं केलं. अलिकडं मात्र थकल्यासारखी वाटते. सोशल लाइफ असं नाहीच तिला .बागेतच जास्त वेळ रमते. केवढी नर्सरी वाढवलीय. आउट हाऊस तोडून तिथंही नवी कलमं लावलीत. रोज काही ना काही भर पडतेच त्यात.
मागच्यावर्षी तिची पन्नाशी दूर्वांकूर सेलेब्रेट केली तेव्हा मोतिया रंगाच्या प्युअर सिल्क साडीत कसली गोड दिसत होती! ते सगळे फोटो नीट प्रिंट काढून अल्बममधे लावले पाहिजेत. बाबा, आजोबासारखीच फोटोग्राफीची आवड माझ्यातही आलीय आणि आजीकडून बिझिनेस सेन्स आला. याचं केवढं कौतुक करत असते मम्मा.

मोबाईल वाजला. इतक्या रात्री कुणाचा मेसेज? अमोलचा. लिंक पाठवलीय यूट्युबची. बाबाचा इंटरव्यू आहे? छे असल्या फंदात कधीच नसतो तो. बापरे अर्ध्या तासाची क्लिप आहे. अमोल म्हणतोय सगळी नीट बघ. झोप येतेय. तरी बघू म्हणतोस? ओके बॉस.

अरे वा ,बाबाची परिक्रमा ऑस्करला नॉमिनेट झाली? क्या बात है! ...

मशीदीचा भोंगा वाजतोय पाच वाजले. थोडी बघू म्हणत रात्री लिंक पूर्ण बघितली. कितीवेळ रडत होते मी. बाबानं इमोशनल करून सोडलं मला. जेन्युइनली बोलत होता तो. आजिबात फेकत नव्हता. निम्म्याहून अधिक वेळ तो आमच्या दोघींबद्दल आणि पमाज्जीबद्दल बोलत होता. मी आणि मम्मानी त्याच्या करिअरपोटी किती सोसलंय हे सांगत होता. खरंच इतकं सोसलंय का आम्ही? मी तर नाहीच. जे कधीच फारसं बाहेरच्या कुणापुढं आलं नाही. ते जगासमोर त्यानंच आणलं. मम्माच्या आठवणी सांगताना त्याचाही गळा भरून आला होता.

आम्ही इकडं छान चमचमीत जेवत असताना तो तिकडं अर्धपोटी दिवस काढत होता. पैसे पुरवून वापरत होता. चाळीत राहिला . अपमान सोसले. यातलं काहीच आम्हाला माहित नाही. बाबा यू आर ग्रेट! मी कधी तुला एवढं मिस केलं नाही. माझ्या जगात तू जवळ नसण्याचं दुःख कधी नव्हतं. मम्मा आणि माझं स्वतंत्र जग मला पुरेसं होतं. सगळी मित्रमंडळी तुझ्या पिक्चरचं कौतुक करायची .तुझं कौतुक करायची. माझा हेवा करायची .मी मात्र माझ्याच मस्तीत. शाळेच्या ट्रीप्स ,कॉलेजच्या ट्रीप्स सगळीकडे मम्मानं मला पाठवलं. मित्रमंडळीत मजा करू दिली. खरंतर माझ्या जगात तू कुठंच नव्हतास. तुझ्या फिल्म्सही मी कधी पाहिल्या नाहीत. नावं फक्त ऐकून होते. मम्मा सगळ्या फिल्म्स बघायची. ती आणि अमोल चर्चाही करायचे त्यावर. मी माझं ऑडिट, बॅलन्सशीट यातच अडकलेली. खरं सांगायचं तर तुझ्यापेक्षा नवनवीन प्रयोगाना थेट भिडणारी मम्माच मला अजूनही ग्रेट वाटते .

पण ही मुलाखत ऐकल्यावर आता वाटतं मम्मानं तुला नक्कीच मिस केलं असणार .कारण तू जेव्हा जेव्हा यायचास तेव्हा मी आजूबाजूला आहे हे माहीत असून तू मम्माला कडकडून मिठी मारायचास. तीही सगळं विसरून तुला एखाद्या वेलीसारखी बिलगायची. तसा मलाही जवळ घ्यायचास तू. पण मला मात्र तू लवकर निघून जावंस असं वाटायचं. माझ्या आणि मम्माच्या मधे आल्यासारखा वाटायचास. ते अल्लड वय होतं, पण आज कळतंय तिला तुझी किती आठवण येत असावी! बाबा तू ये. दोघं एकमेकाजवळ रहा .माझी काळजी करू नका.

डोळ्यात अजून झोप आहे. नाहीतरी टॅक्स भरणं वगैरे सगळं आटोपलंय .जरा निवांतच उठावं.

“काय नैनुल्या, आज उठायचंय की नाही? नऊ वाजले बेटा. चल ऊठ. अमोल आलाय. चहा घेऊया चल” मम्माचा हात केसातून फिरतोय माझ्या. नेहमीसारखी मला अजूनच गुंगी येतेय. मी डोकं उचलून तिच्या मांडीवर ठेवलं. मला चापटी मारून उठवत म्हणाली ,” सवयी सगळ्या आपल्या बाबाच्या उचलल्यास हं तू अगदी!”

तिच्या गळ्यात हात टाकत मी म्हणाले, “बाबाची परिक्रमा ऑस्करला नॉमिनेट झाली.”

“ ग्रेट, खरंच भारी न्यूज आहे ही. तुला कुणी सांगितलं?”

“ अमोलनं बाबाच्या इंटरव्यूची यू ट्यूब लिंक पाठवलीय. अर्ध्या तासाचा इंटरव्यू आहे. मम्मा बघ तू सगळा. माझ्यासारखंच तुलाही रडायला येईल ग.”

मी मोबाईल तिच्या हातात देतेय. पण ती स्वतःच्याच तंद्रीत उठली. कदाचित त्यालाच फोन करायचा असेल तिला.
आता कदाचित बाबाला इकडंच बोलवेल थोडे दिवस. माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तिला अमोलकडं जायचंय. सोबत बाबा हवा असेल तिला.

मला लग्न वगैरे गोष्टीत इतक्यात अडकायचं नाही. पण गेले साताठ वर्षं मी आणि अमोल एकत्र फिरतोय. बिझिनेस वाढवण्याचे दोघांचे प्लॅन्स आहेत. शिरवळला त्यानं प्लॉटही घेतलाय इंडस्ट्रीसाठी. शेतजमीनही मिळाली तर घेणार आहे फळबागेसाठी. मम्मा आणि त्याचे बरेच प्लॅन्स आहेत. फक्त ऑईलमिल इथं ठेवून बाकी मसाले लोणची तिखट कडधान्य,डाळी, वगैरे प्रोसेसिंग युनिट तिकडं सुरू करूया म्हणतो तो. माझं काहीच अजून ठरत नाहीय. पण आता मम्मा ऐकणार नाही. या बाबतीत एकदम पारंपारिक आई आहे ती. काय होतं बघू.

४.माया
आज विक्रम येणार आहे. खरंतर खूप उत्साहानं त्याच्या आवडीची फिश करी मी बनवणार होते. पण अमोल आणि नैना दोघंही म्हणतायत आपण बाबाकडून पार्टी घेऊया. अमोलला दुखवायला आवडत नाही. जावई आहे तो लाडका. जावई लाडकाच असतो नेहमी म्हणा. विक्रम काय कमी लाडका होता माँचा. मी चिडवलं की विक्रम खिदळत ‘फू बाई फू’ गाणं जोरजोरात म्हणायचा. खासकरून त्यातलं कडवं

माय लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी
लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्या साठी

दोघंही जोरात खिदळायचे. माँ गेल्यानंतर जबाबदारीनं अधून मधून फोन करायला लागला विक्रम , पण त्याचं येणं कमी झालं. असं वाटायचं माँ हा एकमेव पाश होता त्याला आमच्याशी जोडून ठेवणारा. खूप मोठा झाला विक्रम. त्याच्या बद्दलचे गॉसिप्स कुणी ना कुणी सांगायचं. पण त्याला याबद्दल एका शब्दानंही विचारलं नाही मी.

माँ नेहमी सांगायची, ”त्याचं क्षेत्र निसरडं आहे. घसरू शकतो माणूस एखाद्यावेळी. मूळात तो एक वादळ आहे. मी लिहून देते माया. तो कुठंही रमणार नाही. तुझ्याकडेच येणार सगळी हौस फिटली की. तो मनानं फक्त तुझ्यात अडकलाय. त्याला कधीही जास्त प्रश्न विचारू नको. बांधून ठेवायचा प्रयत्न करू नको. जितका मोकळा सोडशील तितका तुझाच राहील.”

कधीकधी मला त्याची खूप आठवण यायची. पण नैनानं मला पूर्णवेळ कामात ठेवलं. तिची शाळा, स्पर्धा, चित्रकलेच्या परीक्षा, डान्सक्लास, नाटकं सगळ्याचा मीही एक भाग होते. आता नैनाचं लग्न झालं की मी विक्रमसोबत जायला मोकळी. पण त्यानं बोलावलं तरच. भले तो बोलावेलही पण मी माझी बाग, घरदार,माझं जग सोडून जाणार तरी कशी? काहीतरी सुवर्णमध्य काढूच.ही पोरं आहे तो धंदा नक्की वाढवतील.

विक्रम यायच्या आधी नैना आणि अमोल दोघेही आले तर बरं होईल. आता विक्रमचं भरभरून प्रेम, आवेग,झपाटा झेपणार नाही मला. हसायला येतंय मला. पण तो तसाच आहे. मला शाळेत न्यायचा सोबत. बाजुनं वेगात गाडी गेली तर त्याच्या दोन हातांच्या गोल कड्यात मला जपून ठेवायचा. मी दूसऱ्या मिनिटाला त्यातून बाहेर निसटायची.

खरंतर रक्षाबंधन, भाऊबीजेला पप्पा मुद्दाम काहीतरी सूचवायचे. पण माँनं जाणीवपूर्वक भाऊ वगैरे नात्यात त्याला अडकवला नाही. माझं सिंधी कम्युनिटीत लग्न होऊ न देण्यात माँचं धोरणच महत्वाचं. मुद्दाम आमच्यात जवळीक होईल हे तिनं पाहिलं. शेवटपर्यंत पप्पा सिंधी मुलं हेरत होता. आणि माँ मला विक्रमसोबत सिनेमा, नाटकाना, बाहेर फिरायला बिनधास्त पाठवत होती. पप्पा त्याचा राग राग करायचा. पण सोबतही ठेवायचा.

शेवटी पप्पाचं हागणं मुतणंही विक्रमनंच काढलं.सहा महिने अर्धांगवायूनं बेडवर पडला. हळूहळू एक एक अवयव गेला. आणि एक दिवस पप्पाही. जसं पप्पाचं आजारपण सुरू झालं तसं धोरणीपणे माँनं मृत्युपत्र बनवलं .त्याच्या सह्या घेतल्या. विक्रम मुंबईला गेल्यावर स्वतःचंही विल बनवून प्रॉपर्टीवर माझं नाव टाकलं. स्वतः मोकळी झाली. आता माझी पाळी आहे. नर्सरी तेवढी माझ्या नावावर राहू दे. एक एक करत जंगल झालंय त्या एवढ्याशा जागेचं.

“अरे राजू, त्या कुंडीतलं आलं आणि गवती चहा तोडून आण बरं! फार नको तोडू. डोळा नीट बघून आलं काप.” विक्रमला बाहेरचा विकतचा मसाला चहात नाही आवडतं. इतक्या दिवसात किती आणि काय आवडी बदलल्यात कुणास ठाऊक!

नैनानं त्याच्या इंटरव्यूची यूट्यूब लिंक बघायला सांगितलीय. निवांत विक्रमसोबतच पाहीन. गाडीचा आवाज येतोय . हे काय? तिघंही एकदमच आले?

चौघंही एकमेकांसमोर उभे आहोत. कुणीच काही बोलत नाहीय. विक्रम थकल्यासारखा दिसतोय. चेहरा रापल्यासारखा झालाय. केसही विरळ होत आलेत. महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचा आक्रमकपणाही कमी झालाय.

टेबलावर चहा घेता घेता सगळे हळू हळू बोलायला लागले आहेत. विक्रम राहून राहून नैनाजवळ उभ्या अमोलकडे रोखून बघतोय .अगदी पप्पा विक्रमकडे बघायचा तसंच.

“नैना, तुझ्या मित्राची ओळख तरी करून दे” विक्रमनंच संभाषणाला सुरुवात केली.

“फक्त मित्र?अरे तो मित्रापेक्षा जास्त आहे नैनाचा. बिझनेस पार्टनर आहे आणि लवकरच... ” मला मधेच थांबवत अमोल म्हणाला

“आंटी प्लीज मी बोलू?” मी मानेनंच हो म्हटलं.

“अंकल, मी आणि नैना शाळेपासूनचे मित्र. बीकॉमपर्यंत एकत्र होतो. ती सी.ए कडं गेली. मी एमबीएला ऍडमिशन घेतली. मधल्या काळात वाईट संगत लागली. रेव्ह पार्टीत पकडला गेलो. वडील पोलिस खात्यात आहेत. तेव्हा माझ्या जवळ ड्रग मिळालं नाही. ताकीद देऊन सोडलं. त्यानंतर शिक्षण थांबलं. घरातच सगळ्यांशी भांडत राहिलो. दारू पीत राहिलो. सगळ्यांसाठी बिनकामाचा झालो. सगळे कंटाळले. एक दिवस मायाआंटी आल्या घरी. आईबाबाना सांगून इथं आणलं. त्यांच्यासोबत बागेत काम करायला लागलो. नर्सरीतली वेगवेगळ्या आंब्यांची कलमं आंटीसोबत मीही तयार केली आहेत. मी काहीतरी छान करू शकतो असं वाटायला लागलं. आंटीबरोबर फिल्म्स बघायचो. आम्ही दोघं पेंटिंग्ज करायचो. गप्पा मारायचो. कमी होत होत पिणं पूर्ण थांबलं. हळू हळू नैनाबरोबर इथला बिझिनेस बघायला लागलो. मागच्या वर्षी एमबीए पूर्ण केलं. आता सगळ्याना वाटतंय आम्ही लग्न करावं. तुम्हाला सगळं माहिती असावं असं वाटलं म्हणून ... ”

तो बोलता बोलता मधेच थांबला.. थोडावेळ शांतता होती.

“नैनाला तू आवडतोस आणि तुला नैना आवडते ना! मग बास की. मियाँ बिवी राजी आहेत ना! तू तुझ्या आई वडिलाना घेऊन येतोस कि आम्ही येऊ तुझ्या घरी प्रस्ताव घेऊन?”

विक्रमनं एका झटक्यात सगळा ताण मोकळा केला.
हा असाच आहे. महिन्याभरात लग्न उरकून टाकतो की काय आता?

नैना अमोल जेवून शिरवळला गेले. घरीच साधा स्वैपाक केला मी. जेवण आवरून येईपर्यंत विक्रम सोफ्यावर लहान मुलासारखा शांत झोपलाय. असं वाटतंय त्याला जवळ घेऊन थोपटावं.

५.विक्रम

मायाचा हात माझ्या केसातून अलगद फिरतोय. उठूच नये वाटतं. गेले पंधरा दिवस नैनाचं लग्न उरकण्यात कसे गेले कळालंच नाही. जरा पोरीशी जवळीक होतेय तोपर्यंत पोर गेली सासरी. कधी नव्हे ते इतकी बिलगून रडली यावेळी. रजिस्टर मॅरेजचा तिचा हट्ट. अमोलच्या वडिलानी फार खळखळ केली नाही. आधीच मुलाच्या मनस्तापातून पोळून निघाले असावेत. खूप भरभरून मायाचं कौतुक करत होते नवरा बायको दोघंही. अशीच आहे माया अगदी स्वयंसिद्धा! अरे वा, तिच्यावरही एकादा सिनेमा निघू शकतो.

पुढं काय करायचं? महिन्याभरानंतर दोघंही इथंच राहायला येतील. तोपर्यंत राहीन इथंच. माया काय करणार? मीही परत जावं का? मनातलं थेट बोलू का?

“माया, पुढं काय करायचं? तू थोडे दिवस लोणावळ्याला येशील? तिथून मुंबईला जाऊ. थोडं फिरूया निवांत. येशील सोबत माझ्या ?”

बराचवेळ माया मला थोपटत राहिली .मला आत भरून येत होते. काळजात दबलेली जुनी जखम खपलीचे पापुद्रे काढत वर आली.

आम्ही दोघं लहान होतो. घरात पकडापकडी खेळत होतो. माझ्या पायापुढं राजन काकाच्या कॅमेऱ्याचं झाकण आलं आणि ते खाडकन उडालं. किंचित तडा गेला त्याला. काकानं खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. चौथीत होतो तेव्हा. मी होलपाटलो.डोळ्यापुढं अंधारी आली. गाल धरून मटकन खाली बसलो. डोळ्यात पाणी भरलं. माया इतकी संतापली.

“हात लावायचा नाही त्याला तू. तू मारलंच कसं पप्पा त्याला?” म्हणत काकाच्या अंगावर धावून गेली. ते झाकण अजून लांब फेकलं. रडून गोंधळ घातला. मी अजूनच घाबरलो. थरथरायला लागलो. तेव्हा मला जवळ घेऊन कितीतरी वेळ माझे डोळे पुसत थोपटत राहिली.

अशीच होती माया तेव्हाही. त्या आठवणीनं अजूनच डोळे अजून वाहायला लागले. सरणावर जाईपर्यंत आपल्यात कुठंतरी लहानपणात रमलेलं एक लहान मूल दडलेलं असावं.

आज आम्हाला संपूर्ण एकांत असूनही बोलायला शब्द सापडेनात.बघता बघता किती दूर गेलोय आम्ही. माझे डोळे पुसता पुसता ती म्हणाली.

“ विक्रम ,तू घर सोडून गेलास. बिझिनेस आणि नैनात मी स्वतःला गुंतवून घेतलं. माँ होती तोवर दिवसाचा काही वेळ बागेत काम करायची. फ्रेश वाटायचं. माँ गेली आणि मी बिझिनेसमधे अडकले.बागेत जायला वेळच मिळायचा नाही. नैना ग्रॅज्युएट झाली. सीए करतानाच ती पूर्णपणे बिझिनेस बघू लागली. मी दोनतीन तास तिथं जायची. बागेत नवीननवीन रोपं कलमं तयार करू लागले. अमोल आणि नैनानं सगळा बिझनेस हातात घेतला. मी नर्सरी वाढवली. तू बघतोयस ना किती वाढलीय नर्सरी. हेच माझं जग आहे रे आता.”

माझ्या लक्षात आली तिची अडचण. आता यांच्या जगात मला कुठंच जागा असणार नाही हे कटू सत्य पचवावंच लागेल मला. माझ्यापेक्षा शिवराज नशीबवान आहे. त्याची बायको त्याला सोडत नाहीय.

‘चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना’

मी नाटकीपणे गाणं म्हणत उठत असतानाच मायानं माझा हात हातात घेतला.

“विक्रम, मी तुला खूप मिस केलंय. तूही मिस करतोयस मला ते दिसतंय. जमेल तसा एकमेकाना वेळ देऊ .नैना परत आली की आपण तू म्हणतोस तसं फिरून येऊ. मग तू तुझ्या जगात परत जा. मी माझ्या विश्वात येते. तू मोकळा झालास कि इथं ये. अधे मधे मला मुंबई लोणावळ्याला घेऊन जा. ठीक आहे. ”

मी समंजसपणे मान डोलवत उठलो. दोन्ही हातानं तोंड झाकून घेतलं .दीर्घ श्वास घेतला.

“विक्रम, तू आधी थकलास तर मी तुझ्याकडं येईन आणि मी आधी थकले तरी मीच तुझ्याकडं येईन. नैनाला मी सांगितलंय. शेवटी आपण दोघानी एकत्रच राहायचंय एवढं लक्षात ठेव. जो आधी थकेल त्याचं सगळं दूसऱ्यानी करायचंय बरं का! आपण एकमेकांचं एवढं देणं लागतोच ना रे! ...आणि काही झालं तरी माझ्या सासूसारखी मीच आधी ....”

तिला गहिवरून आलं.

“स्वार्थी मुली! एक अक्षर बोलू नकोस... ”

म्हणत मी तिला जवळ घेतलं. परमेश्वरा, स्पर्शातून आश्वस्त कसं करायचं कितीतरी कलाकाराना शिकवलं मी. मलाही ते सहज साध्य होऊ दे. मायापासून सुरू झालेली माझी परिक्रमा मायाजवळ येऊन पूरी होऊ दे. एवढंच तुझ्याकडं मागणं. पुरं कर रे बाबा!

स्वाती ठकार
(ही कथा 2018 च्या पाक्षिक चिंतन आदेशच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे)


No comments:

Post a Comment